Skip to main content
x

देशपांडे, रमेश गणेश

     १९५५ साली पुणे विद्यापीठाची वास्तव रसायनशास्त्राची एम.एस्सी. पदवी मिळवली. लगेचच त्यांची १९५६ साली तुर्भे येथील अणुऊर्जा प्रकल्पात (आताचे भाभा अणू संशोधन केंद्र) शास्त्रज्ञ आणि प्रकल्पाधिकारी या पदांवर नेमणूक झाली, तिथे १९७६-१९८७ दरम्यान समस्थानिक विभागाचे प्रमुख, १९८७-१९८९ या वर्षांत प्रभागाचे संचालक अशा बढत्या मिळाल्या. १९८९ साली निर्माण झालेल्या ‘बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजी’ (ब्रिट) या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. आपल्या निधनापर्यंत देशपांडे या पदावर सक्रिय होते. ४ ऑगस्ट १९५६ रोजी भारताची पहिली अणुभट्टी ‘अप्सरा’ कार्यान्वित झाली. दक्षिणपूर्व आशियातील ती एकमेव अणुभट्टी होती. अप्सरा अणुभट्टीद्वारे किरणोत्सारी समस्थानिकांचे उत्पादन आणि अणुऊर्जा निर्मिती संबंधी संशोधन हे दोन प्रमुख उद्देश होते. प्रभादेवी येथील बॉम्बे डाइंगच्या रिकाम्या गोदामात अणुशक्ती खात्याचे बरेच विभाग होते. त्यांपैकी रसायनशास्त्र विभागात, दोन फ्यूमहूड आणि चार शास्त्रज्ञ यांचा ‘समस्थानिक विभाग’ १९५७ साली सुरू झाला. त्यांपैकी रमेश देशपांडे एक होते. १९५० च्या दशकातील हा मोठा टप्पा मानता येईल. आता समस्थानिक प्रभाग आणि ब्रिट यांचा विस्तार भारताच्या प्रमुख शहरांतच नव्हे, तर काही विदेशांतही झाला आहे. यासाठी देशपांडे यांचे अथक प्रयत्न, दूरदृष्टी आणि व्यवस्थापन कौशल्यच कारणीभूत आहे.

     ‘शांततेसाठी अणुशक्ती’ म्हणजे किरणोत्सारी समस्थानिकांचा बहुविध क्षेत्रांत, विशेषत: उद्योग, वैद्यक आणि कृषी या क्षेत्रांत वापर, असे समीकरण होते. त्यासाठी भारतातच किरणोत्सारी समस्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आवश्यक होते. तीच डॉ. भाभांची अपेक्षा होती. अप्सरा, सायरस आणि ध्रुव या अणुभट्ट्यांनी ती साकार केली. अणुवीज केंद्रातील अणुभट्ट्यांतही कोबाल्ट-६० आणि ट्रिशियम यांचे फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येते. १ जानेवारी १९७४ रोजी कार्यान्वित झालेल्या इरॅडिएशन स्टरिलायझेशन ऑफ मेडिकल प्रॉडक्ट्स (आयसोमेड) या वैद्यकीय साधने, वेष्टनात बंद केल्यानंतर, गामा किरणांद्वारे निर्जंतुक करण्याच्या प्रकल्पाचे कार्यकारी निदेशक या नात्याने त्यांचा यात महत्त्वाचा सहभाग होता. हा प्रकल्प युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (यु.एन.डी.पी.) आणि इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी (आय.ए.ई.ए.) यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.

     या संयंत्रामध्ये, वैद्यकीय उपचारात वापरण्यात येणारे पदार्थ आणि वस्तू, पुठ्ठ्यांच्या खोक्यांत घालून फिरत्या पट्ट्यावर ठेवतात. खोका जेव्हा संयंत्राबाहेर येतो, त्या वेळी त्या खोक्याच्या सहाही पृष्ठभागांवर प्रखर गामा किरणांचा मारा होऊन आतील पदार्थ निर्जंतुक झालेले असतात. माल आधीच वेष्टनात बंद केला असल्यामुळे, तो तसाच वैद्यकीय संस्थांत किंवा दुकानात पाठविता येतो.

     या तंत्रामुळे वैद्यकीय साहित्य आणि उपकरणे यांचा, दुर्गम प्रदेशातील सैनिकांसाठी वापर शक्य झाला. प्लॅस्टिकचा वापर केलेले वैद्यकीय साहित्य निर्जंतुक अवस्थेत एकदाच वापरून फेकून देणेदेखील शक्य झाले. ही दैनंदिन जीवनातील मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. भारतातील हा एकमेव प्रकल्प आहे. त्यासाठी गामा किरणोत्सार आणि कोबाल्ट धातूचे वजन यांचे गुणोत्तर खूप जास्त असण्याची आवश्यकता असते, आणि किरणोत्साराची मात्राही मोठ्या प्रमाणावर लागते. कोबाल्ट-६० या समस्थानिकाचे अर्धायू केवळ पाच वर्षेच असल्यामुळे, जुने कोबाल्ट-६० चे उद्भव काढून ताजे उद्भव वर्षा-दोन वर्षांनी भरावे लागतात. हे सर्व व्याप समस्थानिक प्रभागात यशस्वीपणे करता आले.

     किरणोत्सारी पदार्थांच्या उत्पादनाविषयी संशोधन, प्रत्यक्ष उत्पादन आणि विक्री हा व्याप समस्थानिक विभागात सांभाळणे अवघड होऊ लागल्यामुळे, किरणोत्सारी उत्पादने मोठ्या प्रमाणावर निर्माण करणे आणि त्यांची विक्री करणे यांसाठी, १९८९ साली ‘बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजी’ (‘ब्रिट’) ही स्वतंत्र संस्था, अणुशक्ती खात्याच्या अखत्यारीत स्थापन करण्यात आली. या संस्थेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली. १९९४ साली निधन होईपर्यंत याच पदावर देशपांडे कार्यरत होते. या पाच वर्षांच्या काळात, ‘ब्रिट’चा कार्यविस्तार खूपच झपाट्याने झाला. समस्थानिक विभागाने संशोधन करून नवी आणि अतिशय उपयुक्त अशी किरणोत्सारी उपयोजित उत्पादने निर्माण करायची आणि ती ‘ब्रिट’ने देशविदेशांतील संस्थांपर्यंत पोहोचवायची, असे सहकार्य होत गेले. किरणोत्सारी औषधे, कार्बन-१४ आणि ट्रिशियमने सूचित (लेबल्ड) केलेली संयुगे, इम्युनो अ‍ॅसे संच, सील्ड रेडिएशन उद्भव, रेडियोग्रफी उद्भव आणि संबंधित उपकरणे वगैरेंच्या मागण्या, ‘ब्रिट’द्वारे वेळच्यावेळी पुरविल्या गेल्यामुळे अणुशक्ती खात्याच्या मिळकतीत लक्षणीय वाढ झाली. बांगलादेश, सीरिया, कॅनडा, व्हिएतनाम वगैरे देशांतही ‘ब्रिट’चा सहभाग आहे.

     अमेरिकेत निर्यात केलेले हापूस आंबे जास्त काळ टिकावेत यासाठी ते लासलगाव येथे, गामा किरणांच्या साहाय्याने निर्जंतुक करण्यात आले. देशपांडे यांनी एशिया-पॅसिफिक प्रदेशातील अनेक देशांना, तसेच आय.ए.ई.ए.मार्फतही अनेक देशांच्या अणुप्रकल्पांना, समस्थानिक आणि विकिरणांच्या वापरासंबंधी सल्ला आणि सहकार्य दिले आहे. देशपांडे यांनी अणुशक्ती खात्याच्या समस्थानिक आणि औद्योगिक कमिटीचे, हैद्राबादच्या रेण्वीय जीवशास्त्र संस्थेच्या नियामक परिषदेचे आणि किडवाई स्मारक ऑन्कॉलॉजी संस्था, बंगळुरू यांच्या समस्थानिक वापरासंबंधीच्या सल्लागार समित्यांचे सभासदपद भूषविले आहे. किरणोत्सारी समस्थानिकांचे उत्पादन, त्यांचे शुद्धीकरण, त्याच्या विशिष्ट वापरासाठी, त्याचे विशिष्ट रासायनिक किंवा कायिक स्वरूपात परिवर्तन करणे, किरणोत्सारी समस्थानिकांच्या वापरासंबंधी सल्ला देणे, वगैरे बाबतींत देशपांडे यांचे योगदान स्पृहणीय आहे. हृदयविकाराने १९९४ साली त्यांचे अकाली निधन झाले आणि, समस्थानिक आणि विकिरण तंत्रज्ञान क्षेत्रातील एक कार्यक्षम व्यक्तिमत्त्व नाहीसे झाले. देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, नॅशनल असोसिएशन फॉर अ‍ॅप्लिकेशन्स ऑफ रेडिएशन्स अँड रेडियो आयसोटोप्स (नारी) संस्थेतर्फे १९९४ सालापासून प्रतिवर्षी समस्थानिक आणि विकिरण यांच्या वापरासंबंधी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देण्यात येतो.

     — गजानन वामनाचार्य

देशपांडे, रमेश गणेश