Skip to main content
x

सोवनी, रामचंद्र विठ्ठल

      रामचंद्र विठ्ठल सोवनींचा जन्म साताऱ्याचा. वडील सरकारी डॉक्टर होते. त्यांचे वास्तव्य पुण्यातले, त्यामुळे त्यांचे न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग या शाळेत आणि फर्गसन व स. प. महाविद्यालयांत शिक्षण झाले. प्राणिशास्त्रात बी.एस्सी. करून ते स. प. महाविद्यालयात प्रयोग साहाय्यक म्हणून काम करू लागले. ही नोकरी करत असतानाच त्यांनी एम.एस्सी. करायचे ठरवले आणि पूर्णही केले. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीने पुण्यातील वाडिया महाविद्यालयानंतर मुंबईत रुपारेल महाविद्यालय सुरू केले. तिथे जीवशास्त्राचे व्याख्याता म्हणून सोवनी १९५४ साली रुजू झाले व ते १९७४ सालापर्यंत तिथेच अध्यापन करत होते. अध्यापनात ते रमत असत आणि विषय रसाळ करून सांगण्याची हातोटी त्यांनी आत्मसात केली होती. त्यामुळे कोणीच विद्यार्थी सोवनीसरांचे वर्ग बुडवत नसत.

     १९७५ ते १९८४ या कालावधीत ते होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या पाठ्यपुस्तक मंडळातील पाठ्यपुस्तकांचा दर्जा सुधारण्याच्या समितीवर तीन वर्षे काम केले. त्यांचे अध्यापनाचे कौशल्य विज्ञानप्रसारातही खूप उपयुक्त ठरले. लहान-मोठे कोणीही, विद्यार्थी किंवा प्रौढ त्यांच्याकडे विज्ञानाचा काही प्रश्‍न घेऊन गेला, तर तो सोवनींकडून उत्तर मिळवून समाधानाने परतायचा. याचे कारण त्यांनी शेवटपर्यंत जोपासलेली चिकित्सक वृत्ती आणि सतत अभ्यास करून नवनवीन गोष्टी जाणून घ्यायची त्यांची ऊर्मी होय. जीवशास्त्राचे प्राध्यापक असले, तरी त्यांना विज्ञानाचा कोणताच विषय वर्ज्य नव्हता, याचेही रहस्य त्यांच्या अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीत दडलेले दिसते.

     सोवनींचा मराठी विज्ञान लेखनाचा श्रीगणेशा अशाच एका कुलकर्णी नामक विद्यार्थ्यामुळे झाला. कुलकर्णी ‘चित्रा’ मासिकात काम करत होते. त्यांना सोवनींची विषय समजावून घेण्याची पद्धत चांगली माहिती होती. त्यामुळे त्यांनी सोवनींना एक लेख लिहून द्या म्हणून विनंती केली. सोवनींनी ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि माशावर एक लेख लिहून दिला. तो लेख कुलकर्णींना तर आवडलाच, पण संपादकांनाही आवडला आणि तो त्यांनी छापला. ही घटना १९५३ साली घडली. तेव्हापासून ते विज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमध्ये सातत्याने, २००७ सालापर्यंत मराठीत लिखाण करत होते. ५० वर्षांपेक्षा जास्त असे विविधांगी लिखाण करणारी व्यक्ती सहजी सापडणार नाही.

     त्या वेळी वर्तमानपत्र हे एकच प्रसारमाध्यम उपलब्ध होते. त्यामुळे विज्ञान लेखनाद्वारे नवनवीन शोधांची, तंत्रज्ञानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात झाली. त्या वेळेपासून सोवनी लिखाण करीत होते, याचा अर्थ असा की, ते पहिल्या पिढीचे विज्ञान लेखक होते. ‘अंडरस्टँडिंग सायन्स’ या पुस्तकाचे भाषांतर सोवनींनी केले आणि ते ‘विज्ञानाशी हितगुज’ या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांना ठिकठिकाणांहून आमंत्रणे येऊ लागली. दैनिकांत सातत्याने लिखाण येऊ लागले, तसे नवयुग साप्ताहिकात सोवनींचे लिखाण छापून येऊ लागले. आचार्य अत्र्यांनी सोवनींना निरोप पाठवला आणि बोलावून घेतले. दर रविवारी ‘विज्ञानाची क्षितिजे’ हे सदर लिहिण्यासाठी त्यांना विनंती केली. त्याकरिता लागणारा खर्च करायची तयारी दर्शविली. १९५७ साली अमेरिकेने अवकाशात पाठवलेल्या यानावर एक लेखमाला ‘लोकसत्ता’त आली. त्यातून ‘चंद्राची स्वारी’ हे पुस्तक पुढे तयार झाले. १९७७ साली त्यांनी किर्लोस्कर मासिकात १२ महिने डॉक्टरांवर मालिका लिहिली आणि ती पुढे ‘कन्सल्टिंग रूम’ या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. ‘भारतीय पक्षी’ आणि ‘आपले पर्यावरण’ ही दोन नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तके सोवनींनी भाषांतरित केलेली आहेत.

     १९५० ते २००० या कालावधीत मराठीत छापलेल्या विज्ञानविषयक पुस्तकांची सूची राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी विज्ञान परिषदेने संयुक्तपणे प्रकाशित केली, त्याचे संपादन सोवनींनीच केले होते. दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट करून दाखवणार्‍या कोशाची कल्पना सोवनींचीच होती. भौतिक, रसायन व जीवशास्त्रावरील संकल्पना विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही स्पष्ट होतील हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून राज्य मराठी विकास संस्थेने मराठी विज्ञान परिषदेबरोबर संयुक्त विद्यमाने हा कोश प्रकाशित केला. त्यातील जीवशास्त्र विभागाचे संपादनही सोवनींनी केले. लोकवाङ्मय गृहाने त्यांच्या संपादनाखाली इंग्रजीतील ‘चिल्ड्रेन्स बिग बुक ऑफ फॅक्ट’चे मराठी भाषांतर चार शिक्षिकांच्या मदतीने प्रकाशित केले. कॅन्सरविषयक पुस्तिका मालिकेतील पाच पुस्तके सोवनींनी भाषांतरित केलेली प्रकाशित झाली आहेत. वर्तमानपत्रात नेहमी वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे लिखाण सतत प्रसिद्ध होत असे. मराठी विज्ञान परिषद ‘पत्रिके’चे ते अनेक वर्षे संपादक होते, तसेच जवळपास तीस वर्षे हक्काचे लेखक होते. अद्ययावत संशोधनावरचे ‘अवतीभवती’ हे सदर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच प्रिय होते, ते सोवनीच लिहीत असत.

    त्यांच्या लिखाणामुळे प्रभावित होऊन अनेक ठिकाणांहून वेगवेगळ्या कार्यक्रमांत त्यांना भाषणाकरिता बोलावणे येई. अनेक भाषणे त्यांनी दिलेली आहेत. १९५० सालापासून ते आकाशवाणीशी वक्ते म्हणून जोडले गेले होते. सर्व संपादक बदलले, विषयाला वेगवेगळ्या वाटा फुटल्या, तरी सोवनींचा लेखनप्रवास ५० पेक्षा जास्त वर्षे सुरूच होता. थोडक्यात लिहिणे, लोकांना समजेल असे लिहिणे, विषयाला न्याय देणे, हे सर्व सोवनींनी साध्य केले होते, म्हणूनच ते एवढी वर्षे टिकून राहिले. दूरदर्शनवरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ कार्यक्रमात १३ रविवारी ‘आकाशाशी जडले नाते’ ही मालिका गाजली. डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. शशिकुमार चित्रे या खगोलशास्त्रज्ञांना प्रश्‍न विचारून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सोवनींनीच केले. हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला होता.

     मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून त्यांचा जवळचा संबंध होता. तसेच, परिषदेच्या अनेक कार्यक्रमांत त्यांनी सहभाग दिला. मराठी विज्ञान परिषदेतर्फे जीवशास्त्राच्या संज्ञा तयार करण्याच्या भाषा संचालनालयाच्या समितीवर त्यांनी काम केले. परिषदेने त्यांच्या विज्ञान प्रसार कार्याचा ‘सन्मानकरी’ आणि सन्माननीय सभासदत्व देऊन गौरव केला. फाय फाउण्डेशन आणि महाराष्ट्र फाउण्डेशन यांनी पुरस्कार देऊन सोवनींच्या कार्याचा सन्मान केला. ते संगीताचेही भोक्ते होते. विज्ञानाचा चालता-बोलता ज्ञानकोश असणारे सोवनी म्हणजे अखंड विज्ञान प्रसाराचे कार्य व्रतासारखा करणारा एक सच्चा विज्ञान प्रसारक होता.     

दिलीप हेर्लेकर

सोवनी, रामचंद्र विठ्ठल