Skip to main content
x

दिवाण, रंगू शंकर

सुलोचना

     ‘हारथी कर्ण’ या हिंदी चित्रपटात एकत्र काम करताना - “या मुलीला उत्तमोत्तम भूमिका मिळाल्या, तर ती उद्या भारतीय चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री ठरेल” या शब्दात दुर्गाबाई खोटे यांनी वर्तवलेले भाकीत तंतोतंत खरे करून दाखवणाऱ्या सुलोचना यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील खडकलाट या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात नागपंचमीच्या दिवशी झाला. वडील फौजदार शंकरराव दिवाण व आई तानुबाई यांच्या अकाली निधनामुळे सुलोचनाबाईंचा सांभाळ त्यांच्या मावशी बनुबाई लाटकर यांनी केला. त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्यांचे शिक्षण मात्र चौथीपर्यंतच होऊ शकले.

     रंगू शंकरराव दिवाण या नावाच्या कोल्हापुरातल्या आडगावात राहणाऱ्या या मुलीने लहानपणापासूनच तंबूतील अनेकानेक चित्रपट पाहिले होते. त्यांचे चित्रपट पाहण्याचे वेड माहीत असल्यामुळे वडिलांच्या मित्राच्या ओळखीतून मा. विनायक यांच्या प्रफुल्ल चित्रमध्ये महिना तीस रुपये पगारावर त्यांना नोकरी मिळाली. तेव्हा मा. विनायक यांच्या ‘चिमुकला संसार’ या चित्रपटाचे काम चालू होते. त्यात सुलोचनाबाईंनी राजा गोसावी यांच्यासोबत एका दृश्यात काम केेले. या कामानेच त्यांचे चित्रपटसृष्टीत पर्दापण झाले. तेथेच लता मंगेशकर, ग.दि. माडगूळकर, दत्ता डावजेकर, दामूअण्णा मालवणकर, दिनकर द. पाटील, मीनाक्षी, सुमती गुप्ते, राजा गोसावी, वसंत जोगळेकर आदी थोरा-मोठ्या कलाकारांशी त्यांचा परिचय झाला.  

      एका लहान खेड्यात राहिलेल्या व प्रमाण मराठी भाषेशी परिचय नसणाऱ्या सुलोचनाबाईंना आपल्या ग्रामीण भाषा बोलण्याच्या पद्धतीमुळे काम करताना त्रास झाला. त्या वेळेस लताबाईंनी दिलेला धीर त्यांच्यासाठी मोलाचा ठरला व त्यातूनच लताबाईंबरोबरचा त्यांचा स्नेहबंध जुळला.

     प्रफुल्ल चित्र मा. विनायकांनी कोल्हापुरातून मुंबईला हलवले, पण सुलोचनाबाईं तेथेच राहिल्या. याच दरम्यान त्या आबासाहेब चव्हाण यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. भालजी पेंढारकर यांच्याशी मैत्री असणाऱ्या आबासाहेब चव्हाण यांनी सुलोचनाबाईंच्या अभिनयाला वाव मिळावा या उद्देशाने भालजींच्या जयप्रभा स्टुडिओत प्रवेश मिळवून दिला. तेथे त्यांची ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून पन्नास रु. पगारावर नेमणूक झाली. तेव्हा भालजी पेंढारकरांनी वयाच्या तेराव्या वर्षीच शालीन व सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्वाच्या सुलोचनाबाईंना ‘महारथी कर्ण’ (१९४३) या हिंदी चित्रपटात भूमिका दिली. त्यात पृथ्वीराज कपूर व दुर्गाबाई खोटे हे दोघे प्रमुख भूमिकेत होते. या काळात भालजींनी केलेल्या मार्गदर्शनामुळे प्रभावित झालेल्या सुलोचनाबाईंनी भालजींना आपले गुरू मानले, ते कायमचे. याच दरम्यान रेखीव व बोलक्या डोळ्यांच्या रंगू दिवाण यांचे भालजी पेंढारकरांनी ‘सुलोचना’ असे नामकरण केले व या नावानेच त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या.

     या चित्रपटातील भूमिकेनंतर सुलोचनाबाईंसाठी भालजी पेंढारकर यांनी ‘सासुरवास’ नावाच्या चित्रपटात खास भूमिका तयार केली. या चित्रपटाचे नायक होते मा. विठ्ठल. पण त्यांचा अभिनयप्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला तो, भालजींच्या ‘जयभवानी’ या चित्रपटातील भूमिकेने. १९४९ साली त्यांनी भालजी पेंढारकर लिखित ‘मीठभाकर’ चित्रपटात पारूची मध्यवर्ती भूमिका साकारली. त्यात नायकाच्या भूमिकेत चंद्रकांत मांढरे होते, तर भालजींचा मुलगा प्रभाकर पेंढारकर व मुलगी सरोज चिंदणकर यांनीही यात काम केले. गांधीहत्येनंतर झालेल्या जाळपोळीत जयप्रभा स्टुडिओ भस्मसात झाला. त्यात या चित्रपटाची सगळी रिळे खाक झाली. सर्व कारभार अस्ताव्यस्त झाला, पण भालजींनी आपल्या स्टुडिओत कामाला असणाऱ्या सर्व कामगारांना दोन महिन्यांचा पगार देऊन नोकरीतून मुक्त केले व दुसरीकडे काम करण्याची परवानगी दिली आणि स्टुडिओ पुन्हा उभारल्यावर परत बोलावण्याचे आश्‍वासनही दिले. त्या वेळेस परत आपल्या गावी जायच्या तयारीत असणाऱ्या सुलोचनाबाईंना मा. विठ्ठल यांनी पुण्याच्या मंगल चित्रमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तेथे गेल्यावर राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जिवाचा सखा’ या चित्रपटात चंद्रा देशमुख नावाच्या नायिकेची भूमिका सुलोचनाबाईंना अप्रतिमरीत्या वठवली. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या निमित्ताने राजा परांजपे, ग.दि. माडगूळकर व सुधीर फडके ही त्रयी प्रथमच एकत्र आली व पुढे त्यांनी इतिहास घडवला. हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरल्यामुळे या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले. यादरम्यान भालजींनी जयप्रभा स्टुडिओ परत उभारल्यावर सुलोचनाबाईंना घेऊन ‘मीठभाकर’ हा चित्रपट पुन्हा नव्याने तयार केला व तो प्रदर्शित झाल्यावर बाईंच्या अभिनयगुणांचा ठसा मराठी चित्रपटसृष्टीवर उमटला. 

     या दोन ग्रामीण ढंगाच्या चित्रपटामंध्ये झळकलेल्या सुलोचनाबाईंना ‘बाळा जो जो रे’ या चित्रपटात विधवा ब्राह्मण स्त्रीची भूमिका मिळाली. पण ग्रामीण ढंगाचे बोलणे असणाऱ्या बाईंनी शुद्ध उच्चारांसाठी मेहनत घेतली व आपल्या उच्चारांवर लक्ष केंद्रित करून आपली वाणी स्वच्छ केली व ब्राह्मण स्त्रीची भूमिका, त्यातील उच्चारांसकट ताकदीने रंगवली. तसेच ‘पारिजातक’ या चित्रपटातील सत्यभामेच्या भूमिकेसाठी त्यांनी भालजींच्या सांगण्यावरून संस्कृतप्रचुर श्‍लोक पाठ केले. त्यामुळेच सदाशिवराव कवी यांच्या ‘वहिनीच्या बांगड्या’ (१९५३) या चित्रपटातील सुसंस्कृत कुटुंबातील वहिनीची भूमिका त्या नेटकेपणाने साकारू शकल्या. त्यांची ही भूमिका म्हणजे वात्सल्याचे मूर्तिमंत उदाहरणच होते. भारतीय संस्कृतीला, परंपरेला अभिप्रेत असणारा स्त्रीतील वात्सल्याचा प्रभाव त्यांच्या या भूमिकेवर असल्याने त्यांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली, यात वादच नाही. या चित्रपटाने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. मराठी माणसाच्या स्वयंपाकघरापर्यंत त्या पोहोचल्या. ५० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी अजूनही त्यांची वहिनी विसरली जात नाही. या भूमिकेमुळे केवळ ग्रामीण चित्रपटांची नायिका हा त्यांच्यावरील शिक्का पुसून गेला.

     १९५४ साली आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘महात्मा फुले’ या चित्रपटात सुलोचनाबाईंनी सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली. त्यातील त्यांचा समाजकार्यकर्त्याच्या पत्नीचा सोशिक व सुहृद अभिनय खऱ्याखुऱ्या सावित्रीबाईंची आठवण करून देणारा होता.

     आपल्या भूमिकेत वैविध्य असावे या उद्देशाने त्यांनी ‘भाऊबीज’ (१९५५) या चित्रपटात तमासगीर नर्तिकेची भूमिका केली, पण त्यांच्या चाहत्यांनी त्याबद्दल नापसंती व्यक्त केली व ‘अशी भूमिका पुन्हा करू नका असे निक्षून सांगितले, तसेच ‘आम्हांला जशा आमच्या घरातील आई-बहिणी बोर्डावर नाचताना पाहणे आवडणार नाही, तसेच सुलोचनाबाईंनाही बोर्डावर नाचताना पाहवत नाही’, आपल्या प्रेक्षकांची ही इच्छा शिरोधार्थ मानून त्यांनी वात्सल्यमूर्ती भूमिकाच पुढील ७० वर्षे साकारण्याचे व्रत कसोशीने पाळले. लोकप्रिय कलाकारांनाही त्याच त्याच भूमिकांमध्ये, त्याच त्याच अभिनयाच्या साच्यात पाहणे रुचत नाही. पण सुलोचनाबाईंना सोज्ज्वळ, सात्त्विक, वात्सल्यपूर्ण आईच्या भूमिकेतच पाहण्याचा आग्रह प्रेक्षकांनी केला, हे बाईंच्या अभिनयाचे लक्षणीय वैशिष्ट्यच आहे.

     पुण्यात तयार झालेल्या, दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित ‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी’ या मराठी चित्रपटावरून केलेल्या ‘औरत तेरी ये कहानी’ या हिंदी चित्रपटातील कामाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीची दारे उघडी करून दिली. या चित्रपटाची निर्मिती रणजित स्टुडिओचे मालक सरदार चंदूलाल शहा यांनी केली होती. काही सामाजिक व धार्मिक चित्रपटातून नायिका म्हणून भूमिका केल्यावर १९५८मध्ये विमल रॉय यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या ‘सुजाता’ या चित्रपटातील भूमिका त्यांच्याकडे चालून आली आणि खऱ्या अर्थाने चरित्र अभिनेत्रीच्या पर्वाला सुरुवात झाली. पुढे त्यांनी हिंदीतील धमेंद्र, शशी कपूर, मनोज कुमार, सुनील दत्त यांसारख्या मातब्बर कलाकारांची आई पडद्यावर साकारली. मधुकर पाठक दिग्दर्शित ‘प्रपंच’ (१९६३) या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यावर सुलोचनाबाईंनी आपल्या अभिनयाच्या जोरावर यातील भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील अशी वठवली. याच वर्षी महाराष्ट्र राज्याचा चित्रपट महोत्सव सुरू झाला आणि ‘प्रपंच’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी पहिल्या वर्षीचा पहिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

     ‘साधी माणसं’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात गावातून नोकरीच्या निमित्ताने शहरात आलेल्या पण खलप्रवृत्तीच्या माणसामुळे वाताहत झालेल्या कुटुंबाचे चित्र रेखाटलेले आहे. यात सुलोचनाबाईंनी रंगवलेली प्रेमळ भावजय लक्षणीय ठरली. जयश्री गडकर व सुलोचनाबाईं यांच्या अभिनयातून नणंद-भावजय नात्यातील व्यक्त होणारी हृद्यता प्रेक्षकांच्या मनाला दिलासा देणारी आहे. १९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या ऐतिहासिक चित्रपटातही त्यांनी जिजाबाईंची भूमिका सर्वांच्या लक्षात राहील अशीच साकारली. याच वर्षी तयार झालेल्या ‘संत गोरा कुंभार’ या चित्रपटातही गोरा कुंभाराच्या पत्नीची त्यांनी केलेली भूमिका त्यांच्या सहज, संयमी तरीही धीरगंभीर अभिनयामुळे सरस ठरली व विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावून गेली. १९६८ मधला ‘एकटी’ हा चित्रपट संपूर्णपणे सुलोचनाबाईंभोवती फिरणारा होता. त्यातील विधवा परंतु स्वत:च्या कर्तृत्वावर घर व मुलाचा सांभाळ करणारी स्त्री विलक्षण होती. वागण्या-बोलण्यातील सौजन्य, आपल्यावर ओढवलेल्या संकटाची जाणीव व तरीही स्वत:च्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची एकट्या स्त्रीमधील सक्षमता त्यांनी आपल्या अभिनयातून जिवंत केली व एकट्या स्त्रीचे भावविश्‍व या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवले.

     या व्यतिरिक्त सुलोचनाबाईंनी ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘ओवाळणी’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘धाकटी जाऊ’, ‘सतीची पुण्याई’ व ‘मराठा तितुका मेळवावा’ इत्यादी १५० हून अधिक मराठी व २५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच त्यांनी ‘बंदिनी’, ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’, ‘कुणासाठी कुणीतरी’ आदी मराठी मालिकांमध्येही काम केले आहे.

    त्या काळी सुलोचनाबाईंना ‘लेखकांची नायिका’ असाही गौरव प्राप्त झालेला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर ठेवून कथा-पटकथा लिहिणारा लेखकवर्ग त्या काळात अस्तित्वात होता, ही गोष्ट त्यांच्या अभिनयक्षम व्यक्तिमत्त्वाची दखल घेतली जाणारी म्हणून मुद्दाम नोंदवता येण्यासारखी आहे. पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, अरविंद गोखले, ग.ल. ठोकल, पु.भा. भावे, शांताराम आठवले, वि.वि. बोकील, नामदेव व्हटकर, गो.गं. पारखी, महादेवशास्त्री जोशी, य.ग. जोशी, ज्योत्स्ना देवधर, शकुंतला गोगटे, इत्यादी नामवंत साहित्यिकांच्या साहित्यकृती त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारल्या.

    सुलोचनाबाईंच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांना अनेकानेक पुरस्कार लाभले. ‘प्रपंच’ (१९६३)साठी उत्कृष्ट अभिनेत्री व ‘गोरा कुंभार’साठी (१९६८) विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना लाभला. तर १९७२ मध्ये त्यांना ‘जस्टीस फॉर द पीस’ या पदवीने सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकिर्दीसाठी १९९७ मध्ये त्यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार’ दिला गेला, १९९९ मध्ये राष्ट्रपती के.आर. नारायण यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. २००३ मध्ये त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रभूषण’ पुरस्कार लाभला. २००४ मधला फिल्मफेअरचा ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड’ त्यांना मिळाला होता. २०१० साली त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्रभूषण’ हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार देण्यात आला. त्यांना लाभलेल्या पुरस्कारांची संख्या ७५ हून अधिक आहे. चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या या अभिनेत्रीचे मन सामाजिक कार्यातही तितकेच रमते, हे १९६१ साली चिनी आक्रमणाच्या वेळी भारत सरकारच्या आवाहनानुसार सुलोचना यांनी संरक्षण कार्यासाठी घरातील सोन्याचे दागिने व निधी उपलब्ध करून दिला, यातूनच दिसते.

      सोज्ज्वळ, भावस्पर्शी चेहरा व बोलके डोळे असणाऱ्या  सुलोचनाबाईं मुख्य नायिका, आई, बहीण, वहिनी, भावजय या सर्व नात्यातील परस्परसंबंध जाणूनच अभिनय करताना आढळल्या. त्याचे मूळ त्यांच्या वास्तव जीवनातच आढळते. वास्तवता व चित्रपटातल्या भूमिका यांचा मेळ घालत त्यांनी आपल्या भूमिका अजरामर केल्या, हे निर्विवाद.

- डॉ. अर्चना कुडतरकर

दिवाण, रंगू शंकर