डवरी, तानूबाई भैरू
चित्रपटसृष्टीत जिजाई म्हणून ओळखल्या गेलेल्या गौरी उर्फ तानूबाई भैरू डवरी यांचा जन्म कोल्हापूरमधील कागल जिल्ह्यातील गरीब कुटुंबात झाला. कोणतेही शालेय शिक्षण न घेतलेल्या तानूबाई यांना चरितार्थासाठी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नव्हते. त्या काळात कोल्हापूर ही चित्रकर्मींची नगरी असल्यामुळे फारसे कष्ट न घेता त्यांना बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत काम मिळाले. त्या वेळेस त्या तेथे रु. पाच पगारावर कामावर रुजू झाल्या. येथे एक्स्ट्रा म्हणून काम करताना कोणतीही महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या वाट्याला न येताही त्या तेथे काम करतच राहिल्या.
१९३५ सालच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटातील एकनाथांच्या घरी श्राद्धाच्या स्वयंपाकाच्या दृश्यात गौरी यांच्या तोंडच्या ‘सासू माझा जाच करते लवकर निर्दळी तिला’ या छोट्या पण ठसकेबाज संवादामुळे त्या लक्षवेधी ठरल्या. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण संवादफेकीच्या लकबीमुळे संगीत दिग्दर्शक मा. कृष्णराव यांनी प्रभात कंपनीच्या ‘संत तुकाराम’ चित्रपटातील कर्तव्यदक्ष, ओढगस्तीच्या संसाराला कंटाळलेली व म्हणून सदैव आपला वैताग व्यक्त करणारी संत तुकारामांंची पत्नी जिजाई यांच्या भूमिकेसाठी तानूबाईंचे नाव सुचवले.
प्रभातच्या तालमी घेण्याच्या प्रक्रियेतून तानूबाईंना संवादाची वही दिली गेली. परंतु लिहिता-वाचता न येणार्या तानूबाईंनी वही परत केली. त्या वेळेस ‘संत तुकाराम’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे आणि कवी शांताराम आठवले यांनी तानूबाईंकडून संवाद पाठ करून घेतले. याच दरम्यान शांताराम आठवले यांनी तानुबाईंचे नामकरण ‘गौरी’ असे केले. गावकुसाबाहेर स्मशानाच्या जवळ राहणार्या तानूबाईंनी गौरी या शब्दाचा संबंध शेणाच्या गोवर्यांशी जोडला, त्यातल्या अमंगलाने भेदरलेल्या तानूबाईंनी या नावाला विरोध केला, पण शांताराम आठवले यांनी त्यांच्या मनात असलेल्या सांस्कृतिक भेदाचे निराकरण केल्यावर व त्या नावातले मांगल्य जाणून घेतल्यावरच तानूबाईंनी ‘गौरी’ या नावाला संमती दिली. यातूनच त्यांच्या तल्लख बुद्धीची आणि स्वअस्मितेची जपणूक करण्याच्या स्वभावाची ओळख पटते. साध्या आणि निरागस चेहऱ्याच्या गौरीबाईंनी निभावलेली आक्रस्ताळी व कजाग स्वभावाची ‘संत तुकाराम’ चित्रपटातील जिजाई त्यातल्या अभिनयाच्या समर्थ साकारणीमुळे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हेच गौरी यांच्या अभिनयाला मिळालेले पारितोषिक आहे, असे म्हणता येते.
गौरी यांच्या अभिनयातील सामर्थ्य लक्षात घेऊन प्रभातने त्यांना शिकवणी लावली. आपल्याबद्दल दाखवलेल्या या आपुलकीने भारावलेल्या गौरी यांनीही प्रभातला कधीही अंतर दिले नाही. म्हणूनच त्यांना ‘कुंकू’, ‘माणूस’, ‘शेजारी’, ‘संत सखू’, ‘रामशास्त्री’ अशा चित्रपटांतून दुय्यम, पण महत्त्वपूर्ण भूमिका मिळाल्या. तसेच त्यांनी प्रभातच्या हिंदी चित्रपटातूनही भूमिका केलेल्या आहेत. त्यांच्या या भूमिकांमधून कधी खाष्टपणा दिसला, तर कधी आपुलकीही प्रत्ययाला आली, अशा या विरोधाभासात्मक भूमिकाही त्यांनी तितक्याच ताकदीने रंगवल्या, हे विशेष. कालांतराने त्यांनी इतर कंपन्यांच्या ‘भाग्यरेखा’, ‘जरा जपून’, ‘मानाचं पान’, ‘गंगेत घोडं न्हालं’, ‘दोन घडीचा डाव’ अशा चित्रपटांतूनही दुय्यम भूमिका केल्या.
चित्रपटसृष्टीत वावरणाऱ्या गौरी यांना रंगमंचावर आपल्या अभिनयाची चुणूक फार कमी वेळा दाखवता आली, पण जेव्हा दाखवली तेव्हाचा त्यांचा अभिनयही जिवंत होता. म्हणूनच ‘करायला गेलो एक’ या विनोदी फार्समधील गोवेकरणीची गौरी यांनी तंतोतंत वठवलेली भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात राहिली आहे.
१९६१ साली आलेल्या पानशेतच्या पुरात गौरीबाई यांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाल्यामुळे त्या आपल्या जन्मगावी, कागलला आल्या. तल्लख बुद्धीच्या या अभिनेत्रीला आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये स्मृतिभ्रंश झाला आणि वयाच्या ५७व्या वर्षीच त्यांचे निधन झाले.
- संपादित