Skip to main content
x

एल्फिन्स्टन, माऊंट स्टुअर्ट

शिक्षणतज्ज्ञ, लेखक, तत्त्ववेत्ता

     माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षणाचा शिल्पकार होय. अकरावा बॅरन जॉन एल्फिन्स्टन यांचे हे पुत्र होत. स्कॉटलंडमधील केन्सिंगटन व एडिंबरा येथील शाळेत त्यांचे शिक्षण झाले. इ.स. १७९५ मध्ये त्यांची ईस्ट इंडिया कंपनीत कारकून म्हणून नोकरी सुरू झाली. सुरूवातीला ते बनारसमध्ये कार्यरत होते. पण १७९९ मध्ये तेथील युरोपियन अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याने त्यांना तेथून पळून जावे लागले. नंतर ते दुसऱ्या बाजीरावाच्या दरबारातील इंग्लिश रेसिडंट क्लोज याचा मदतनीस म्हणून पुणे येथे रुजू झाले. जनरल वेलस्लीच्या बरोबर त्यांनी काही लढायांत भाग घेतला. पुढे त्यांची बदली नागपूरला झाली. सन १८०२ मध्ये ब्रिटिश प्रतिनिधी म्हणून ते काबूलला रवाना झाले. पण तेथील अशांत परिस्थितीमुळे त्यांना कामात यश आले नाही. सन १८११ मध्ये त्यांची पुण्यात रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली.

     एल्फिन्स्टनमुळे १८१७ मध्ये इंग्रज - मराठे यांच्यात तिसरे युद्ध झाले. त्यात इंग्रजांना विजय मिळाला व १८१८ मध्ये मराठेशाहीचा अंत झाला. ब्रिटिशांचा एकछत्री राज्यकारभार सुरू झाला. पेशवाईच्या अंतकाळात महाराष्ट्रात अशांतता व असुरक्षितता होती. तेव्हा जनतेला सुरक्षितता पाहिजे होती. एल्फिन्स्टन यांनी विविध आश्वासनांद्वारे पुण्याला सुरक्षितता व दिलासा दिला.  एल्फिन्स्टनच्या ह्या कार्याबद्दल त्यांना बढती मिळाली व  मुंबईचा गव्हर्नर म्हणून पद मिळाले. १८१९ ते १८२७ हा त्यांचा गव्हर्नर म्हणून कार्यकाळ होय.

      एल्फिन्स्टन यांनी पेशव्याचे राज्य बरखास्त केल्यावर पुण्याच्या लोकजीवनावर लक्षणीय परिणाम झाले. आता आपले पुढे काय? असा सर्वांपुढे प्रश्न उपस्थित झाला. विशेषतः शिक्षणकार्यात गुंतलेल्या ब्राह्मणांपुढे या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले. वेद, न्याय, आयुर्वेद, ज्योतिष, धर्मशास्त्र, अलंकार, व्याकरण, काव्य इत्यादी विषयात पारंगत असणाऱ्या ब्राह्मणांना पेशव्यांकडून दक्षिणा मिळत असे. त्यातील अनेकजण पाठशाळा चालवत असत. पेशवाई बुडाल्याने शिक्षणशास्त्रात कार्यरत असलेल्या या ब्राह्मणांचे उपजीविकेचे साधनच नष्ट झाले. देशातील सर्व भागातून हे ब्राह्मण पुण्यात श्रावण महिन्यात जमा होत असत. त्यावेळी पेशवे अंदाजे पंधरा लाख रूपये दक्षिणेद्वारा खर्च करत. चाळीस हजार ब्राह्मण दक्षिणा घेण्यासाठी जमा होत असत. यावरून प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात येईल.

      पुण्यातील ही अस्वस्थता लक्षात घेऊन एल्फिन्स्टन यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा दरबार भरवला व जाहीर केले की, कंपनी सरकार हे यापुढे पेशव्यांच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडेल. पुढे एल्फिन्स्टन यांची मुंबईला गव्हर्नर म्हणून बदली झाली. नव्या कमिशनरने हे आश्वासन पाळले नाही. म्हणून पुण्यात परत आंदोलन झाले तेव्हा एल्फिन्स्टन यांनी दक्षिणेसाठी रू. दोन लाख रूपये मंजूर केले. पण प्रत्यक्ष पैसे द्यायची वेळ आली तेव्हा फक्त रू. पन्नास हजारच दिले. ते कसे खर्च करावेत याविषयीही वाद झाला. पन्नास हजारांपैकी फक्त तीस हजार दक्षिणेसाठी देण्यात आले व उरलेले वीस हजार अन्य तर्‍हेने शिक्षणावर खर्च करायचे ब्रिटिशांनी ठरवले.

      एल्फिन्स्टनला हिंदू रितीरिवाज, हिंदू संस्कृती येथील भाषा व साहित्य याविषयी आदर होता. हिंदू लोकांच्या परंपरा जपणारे शिक्षण दिले जावे असे त्याला वाटे, परंतु त्याचबरोबर इंग्रजीतून उपलब्ध असणारे आधुनिक शास्त्रांचे ज्ञानही लोकांना मिळाले पाहिजे असे त्याला वाटे. पुण्यातील वातावरण इंग्रजी शिक्षणास पोषक नाही. पण मुंबईतील वातावरण नव्या शिक्षणास योग्य पोषक आहे असे त्याचे मत होते. त्यामुळे मातृभाषा व इंग्रजी भाषा यांच्या आधारे आधुनिक शिक्षण देण्यासाठी त्याने मुंबईची निवड केली व हिंदूंची पारंपरिक शास्त्रे शिकवण्यासाठी पुण्याची निवड केली.

      नव्या शास्त्रांचे हिंदुस्थानी लोकांना शिक्षण देऊ नये कारण त्यामुळे इंग्रजांचे येथील राज्यच धोक्यात येऊ शकेल. असे अनेक युरोपियनांचे मत होते.  हिंदुस्थानातील लोकांना नव्या शास्त्रांची ओळख व्हावी म्हणून त्याने येथील लोकांच्या मातृभाषेत पुस्तके निर्माण केली पाहिजेत असे त्याचे मत होते व ईस्ट इंडिया कंपनीला आपले मत त्याने सन १८१३ मध्येच कळवले होते. बाँम्बे एज्युकेशन सोसायटीची मदत घेऊन त्याने ‘नेटीव एज्युकेशन अँड स्कूल बुक कमिटी’ स्थापन केली. तसेच हैंदशाळा शाळापुस्तक मंडळी त्याने स्थापन केली व कोश, व्याकरण, भाषा, गणित, शिल्पकला, ज्योतिष, रसायन, पदार्थविज्ञानशास्त्र, वैद्यक, राजनीती इत्यादी विषयांवर मराठीत शालोपयोगी पुस्तके तयार केली. त्याने शिक्षणकार्यात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मुंबईच्या नागरिकांनी एल्फिन्स्टन महाविद्यालय स्थापन केले.

      पुण्याचे पुना महाविद्यालय तथा संस्कृत महाविद्यालय सन १८२१ मध्ये सुरू झाले. पण पुण्यातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या संस्कृत महाविद्यालयाविरूद्ध आघाडी उभारली. त्या महाविद्यालयात शिकवण्यात येणारे विषय निरूपयोगी आहेत व तेथील विद्यार्थी व शिक्षक हे ब्रिटिश विरोधी कारवाया करतात. त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरकडे महाविद्यालय बंद करण्यासंबंधात प्रस्तावही पाठवला. (१८२३) त्यावेळी मुंबईचा गवर्नर एल्फिन्स्टन होता. त्याने महाविद्यालय बंद कऱण्याचा प्रस्ताव अमान्य केला. पुण्यातील शिक्षण संस्कृती खंडीत न होता पुढे चालू रहाण्यात एल्फिन्स्टनचे योगदान मोठेच आहे.

      त्यांना भारताचे गव्हर्नरपदही देऊ केले होते पण ते त्याने स्वीकारले नाही. १८२७ मध्ये त्याने कंपनीच्या नोकरीतून निवृत्ती घेतली व तो इंग्लंडला परत गेला. उर्वरित आयुष्य त्याने अभ्यास व लेखनात घालवले. पेशव्यांकडून जिंकलेल्या प्रदेशाविषयी अहवाल, ‘हिंदुस्थानचा इतिहास’, ‘पूर्वेकडील ब्रिटीश साम्राज्याचा उदय' ही त्यांची गाजलेली पुस्तके होत. एक ज्येष्ठ तत्ववेत्ता म्हणूनही त्याचा नावलौकीक आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्याचे निधन झाले. त्याच्या गौरवानिमित्त सेंट पॉल कॅथडू्रल मध्ये त्याचा पुतळा उभारण्यात आला.

       - डॉ. नीलकंठ बापट

एल्फिन्स्टन, माऊंट स्टुअर्ट