गांधी, वासुदेवदास विठ्ठलदास
नगर जिल्ह्यातील बियाणे व खतविक्रीपासून हरितक्रांती व धवलक्रांतीपर्यंतचा तोंडपाठ इतिहास सांगणारा ज्ञानकोश म्हणून वासुदेवदास विठ्ठलदास गांधी ओळखले जातात. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांचे वडील कापड विक्रेता होते. त्यांच्या कुटुंबावर फार मोठ्या सावकारी कर्जाचा बोजा होता. बाळासाहेबांचे चौथीपर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळा क्र. दहामध्ये झाले. नंतर इंग्रजी तिसरी (आठवी) सोसायटी हायस्कूलमध्ये झाले. बाळासाहेब घरातील बेताच्या आर्थिक स्थितीमुळे आठव्या वर्षातच मधल्या सुट्टीत शाळेतील मुलांना गोळ्या, बिस्किटे विकू लागले व स्वतःच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भागवू लागले. मानसिक ताणामुळे अभ्यासात लक्ष न लागल्यामुळे त्यांनी जुलै १९३९मध्ये आठवीत असताना शाळेला रामराम ठोकला.
बाळासाहेबाच्या वडिलांचा बियाणांच्या व्यवसायात जम बसू लागला. बाळासाहेबही वडिलांना मदत करू लागले. नगर जिल्ह्यात १९६७-१९७० हा काळ कंबोडिया (सी ओटू-१७०) कापसाच्या विक्रमी उत्पादनाचा होता. त्या काळात बाळासाहेबांनी सरकी बियाण्यांची व औषधांची विक्रमी विक्री केली.
बाळासाहेबांकडून खरेदी केलेल्या बी-बियाणांच्या चांगल्या अनुभवामुळे केवळ नगर जिल्ह्यातीलच नव्हे, तर बाहेरचेही असंख्य शेतकरी त्यांचे ग्राहक बनले. अनेक ग्राहकांना बाळासाहेबांकडून शेतीविषयक अचूक सल्ला मिळाला. पुढे त्यांनी नगर तालुक्यातील सोनेवाडीला जमीन खरेदी करून स्वतः शेतीत प्रयोग सुरू केले.
बाळासाहेब जिल्ह्याचे पर्यावरण, जैव विविधता, पीक पद्धती, शेतीतील नफा-तोटा, दुष्काळ व पाणकळे, हवामानाचा अंदाज, बाजाराचा कल, हंगामातील पिकांचे भवितव्य अशा विषयांचा अचूक वेध घेत. ते समोरच्या सामान्य शेतकर्यांच्या पिकांच्या प्रगतीबद्दलही आस्थेने चौकशी करत. बाळासाहेब श्री. रामकृष्ण सेवा ट्रस्टचे कार्याध्यक्ष आहेत. तसेच, ते श्री रामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. श्री. रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटीतही संस्थापक संचालक म्हणून ते काम पाहतात.
बाळासाहेबांना पत्नी हिराबार्ई यांची उत्तम साथ लाभली. त्यांचे तिघे चिरंजीव वडिलांच्या संस्कार व शिकवणुकीतून तयार होऊन नगरलाच व्यवसायवृद्धी करत आहेत. बाळासाहेबांवर आधारित ‘जगन्मित्र कर्मयोगी’ हा गौरवग्रंथ २००१मध्ये प्रकाशित झाला. तसेच, त्यांना ‘नगरभूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.