Skip to main content
x

गोडबोले, परशुराम बल्लाळ

     परशुराम उर्फ तात्या गोडबोले यांचा जन्म १७९९ मध्ये वाई (जिल्हा सातारा) येथे झाला. गोडबोले मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील पावसगोळण या गावचे; पण त्यांचे खापर-पणजोबा गाव सोडून वाई येथे सरदार रास्त्यांच्या आश्रयास येऊन राहिले. ‘नवनीत’कार गोडबोले यांचा विद्याभ्यास, विशेषतः संस्कृत भाषेचा अभ्यास, वाई येथे नारायणशास्त्री देव यांच्याकडे झाला. पुण्यास आल्यावर ते त्यांच्या मामाच्या पेढीवर कारकुनी करू लागले. त्यांचे मोडी अक्षर सुरेख होते. जमा-खर्चाचीही चांगली माहिती होती.

     त्यांचे भाऊ दाजिबा यांच्यामुळे त्यांना मोरोपंतांदी जुन्या मराठी कवींच्या कवितेची गोडी निर्माण झाली. त्यांनी पाठांतरही खूप केले. मुंबईच्या ‘शाळा पुस्तक मंडळी’ने ‘मराठी भाषेचा कोश’ तयार करण्याचे कार्य इ. स. १८२४ च्या सुमारास जेव्हा हाती घेतले, तेव्हा हा अभ्यास लक्षात घेऊन त्यांचा समावेश संपादक मंडळात करण्यात आला. हा कोश इ.स. १८२९ मध्ये प्रसिद्ध झाला. १८३१ मध्ये या कोशाची पुरवणी प्रसिद्ध झाली. हा कोश ‘पंडित मंडळींचा महाराष्ट्र भाषेचा कोश’ म्हणून त्या काळी ओळखला जात असे. मराठी भाषेची व्याख्या, मराठी भाषेच्या कोशाची आवश्यकता, कोशात उपयोजिलेल्या शब्दांची व्याप्ती इत्यादींची सविस्तर चर्चा यात केली आहे.

     कोश प्रसिद्ध झाला, त्या सुमारास १८४७ मध्ये पुण्यात विश्रामबाग वाड्यात सरकारी छापखाना सुरू झाला. मेजर थॉमस कॅण्डी यांची त्यासाठी मराठी ट्रान्सलेटर व रेफरी म्हणून नेमणूक झाली. परशुरामपंत उर्फ तात्यांचा मराठी भाषेचा व्यासंग लक्षात घेऊन, मेजर कॅण्डी यांनी त्यांना आपल्या हाताखाली पंडित म्हणून नेमून घेतले. या कॅण्डीचा ते उजवा हात होते. या जागेवर तात्या अखेरपर्यंत कार्यरत होते. त्या वेळच्या मराठी क्रमिक पुस्तकांतील सगळ्या  कविता  तात्यांच्या लेखणीतून उतरलेल्या आहेत. सरकारी काम सांभाळून तात्यांनी अनेक मराठी ग्रंथ रचले. संस्कृतमधून मराठीत भाषांतरित केलेल्या ग्रंथांत- ‘शाकुंतल’, ‘वेणीसंहार’, ‘नाग नेर’, ‘उत्तररामचरित्र’, ‘मृच्छकटिक’  ही नाटके प्रमुख आहेत. शब्दशः केलेले भाषांतर नव्हे तर रसपरिपोषासह केलेले रसाळ भाषांतर, हे तात्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. जुन्या कवींच्या काव्यांच्या संग्रहात ‘केकादर्श’, ‘नवनीत’ इत्यादींचा समावेश आहे. रामदास, तुकाराम, श्रीधर, मोरोपंत, वामन पंडित इत्यादींच्या साहित्याचा परिचय ‘नवनीत’मध्ये करून दिला आहे, तर दादोबा पांडुरंग तर्खडकरांचा ‘यशोदा पांडुरंगी’ हा ग्रंथ सामान्य लोकांना सहज समजावा म्हणून त्यांनी ‘केकादर्श’ हा ग्रंथ सहजशैलीत  लिहिला. 

     नवीन ग्रंथातील ‘मराठ्यांच्या इतिहासावर लहान मुलांकरिता सोपी कविता’ (१८६४), ‘संक्षिप्त भूगोलवर्णन’ (१८६५), ‘बालबोधामृत’ (१८७४), ‘वृत्तदर्पण’ (१८६७- याच्या २९ आवृत्त्या निघाल्या.), ‘श्रीमच्छंकराचार्यकृत श्रीपांडुरंग स्तोत्राची टीका’ मराठी गद्यात्मक (१८०५) ही त्यांची पुस्तके म्हणजे वाचकांसाठी एक फार मोठा ज्ञानलाभ आहे. हे सारे ग्रंथ म्हणजे मूळातील रस कायम राखून, सुंदर शब्दयोजना करून, कविता कशी रचावी? गूढार्थ सुलभ कसा करावा? याची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. अशा प्रकारे मराठी भाषेची निष्ठापूर्वक विपुल सेवा त्यांनी केली. प्राचीन मराठी कवितेचा त्यांचा प्रगाढ व्यासंग होता. अव्वल दर्जाचा रसिक व मार्मिक पंडित म्हणून त्यांचा लौकिक महाराष्ट्रभर होता. स्वभावाने गोड, मनमिळाऊ असलेले तात्या सर्व थरांतील मंडळीत प्रिय होते. महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने त्यांचे लेखन हे एकोणिसाव्या शतकात ‘प्रबोधनयुग’ म्हणून महत्त्वपूर्ण ठरते.

- प्रा. मंगला गोखले

गोडबोले, परशुराम बल्लाळ