गुंजाटे, रामचंद्र तातोबा
जामनगर-गुजरात येथे १ लाख ३५ हजार कलमी झाडांची आशिया खंडातील सर्वात मोठी आमराई उभी आहे. सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावर उभारलेली ही बाग जगातील सर्वोत्तम बागांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या बागेचे शिल्पकार आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे फलोद्यानतज्ज्ञ रामचंद्र तातोबा गुंजाटे. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील समडोळी गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण समडोळी आणि माध्यमिक शिक्षण सांगली येथे झाले. त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून १९६८मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केल्यानंतर दिल्ली येथील भा.कृ.अ. संस्थेमधून १९७०मध्ये एम.एस्सी. (कृषी) आणि १९७३मध्ये पीएच.डी. (फलोद्यान) पदवी मिळवली. त्यांना बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच एम.एस्सी.साठी भा.कृ.अ.प.ची संशोधक शिष्यवृत्ती मिळाली होती.
डॉ. गुंजाटे यांनी ऑक्टोबर १९७३ ते मार्च १९८४ पर्यंत बा.सा.को.कृ.वि., दापोली येथे उद्यानविद्या विभागात तीन वर्षे साहाय्यक प्राध्यापक आणि ८ वर्षे सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले. या कालावधीत त्यांनी आंबा पिकावर अतिशय मोलाचे संशोधन केले. कोकणातील शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे आंबा हे झाड आहे, परंतु ४० वर्षांपूर्वी व्यापारी दृष्टिकोनातून आंबा लागवडीकडे पाहिले जात नसे. चांगल्या जातीची झाडे फारच कमी क्षेत्रावर दिसून यायची. हेक्टरी आंबा उत्पादन खूपच कमी होते. शेतकऱ्यांकडे आंबा लागवडीची योग्य पद्धत नव्हती. आंब्याची कलमे जुन्या भेट अथवा व्हिनियर कलम पद्धतीने तयार केली जायची. या पद्धती अवघड आणि खर्चीकही होत्या. कलमांची मर जास्त होती, त्यामुळे शेतकरी या पद्धतींचा वापर कमी करायचे.
डॉ. गुंजाटे यांनी या समस्येचा विचार करून कलम पद्धतीच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले. त्या वेळी फारशी प्रचलित नसलेली कोयकलम पद्धत त्यांनी संशोधनासाठी निवडली. ही पद्धत कोकणातील शेतकऱ्यास उपयुक्त ठरावी, या दृष्टीने त्यात प्रयोगाद्वारे अनेक सुधारणा केल्या आणि अनेक वर्षांच्या संशोधनानंतर एक सोपी, स्वस्त आणि खात्रीशीर अशी कोयकलम पद्धत कोकणातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. या पद्धतीने कृषी विद्यापीठाच्या क्षेेत्रावर आंब्याची दर्जेदार कलमे तयार करण्याचा फार मोठा कार्यक्रम घेण्यात आला. एका वर्षात ७-८ लाख कलमे तयार होऊ लागली. हे कोयकलम पद्धतीचे तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या प्रशिक्षणामुळे कोकणात अनेक खासगी रोपवाटिका सुरू झाल्या. मोठ्या प्रमाणात आंबा कलमे उपलब्ध होण्याची शक्यता पाहून महाराष्ट्र शासनाने कोकणातील पडीक क्षेत्र आंबा लागवडीखाली आणण्याचा प्रकल्प राबवण्याचे ठरवले. त्यात मोठ्या प्रमाणात यश आले.
महाराष्ट्रात १९९१मध्ये सुरू झालेल्या रोजगार हमी योजनेंतर्गत जो आंबा लागवडीचा मोठा कार्यक्रम यशस्वी झाला त्याचे श्रेय या सुधारित कोयकलम पद्धतीला जाते आणि ही पद्धत डॉ. गुंजाटे यांच्या संशोधनाचे फलित आहे. त्यांना या योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दापोली येथील ११ वर्षांच्या कारकिर्दीनंतर डॉ. गुंजाटे बा.सा.को.कृ.वि.च्याच वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे १९९४मध्ये सहयोगी संचालक म्हणून रुजू झाले.
शेतकरी, कृषितज्ज्ञ आणि आंबा ग्राहकांनीही गौरवलेले वेंगुर्ला येथील उल्लेखनीय संशोधन म्हणजे बिनकोयीचा आंबा उत्पादित करणे. डॉ.गुंजाटे यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञांनी रत्ना आणि हापूस या जातींच्या संकरीकरणातून ‘सिंधू’ ही जात विकसित केली आणि १९९२मध्ये ती प्रसारित केली. या जातीला दरवर्षी फलधारणा होते व फळ चवीला चांगले असते. कोय फारच लहान आणि पातळ असल्याने या जातीचा आंबा ‘बिनकोयीचा आंबा’ म्हणून प्रसिद्ध झाला. हापूस आंब्याला एक वर्षाआड फळधारणा होते. हापूससारख्या जातीमध्ये जिब्रेलीनसारखा वाढ उत्तेजक संजीवक फारच जास्त प्रमाणात आढळतो. याचा परिणाम म्हणजे अवाजवी शाखीय वाढ होते. मात्र मोहोर व फळधारणा होत नाही. या समस्येवर उपाय म्हणून डॉ. गुंजाटे आणि त्यांच्या सहकार्यांनी काही वाढनिरोधक संजीवके वापरून प्रयोग केले. त्यांच्या संशोधनातून पॅक्लोब्यूट्रोझोल हा प्रमुख क्रियाशील घटक असलेले ‘कल्टार’ नावाचे वाढनिरोधक संजीवक उपयुक्त असल्याचे आढळून आले. त्यांनी कल्टारच्या वापराची पद्धत प्रमाणित केली. त्याचा शेतकर्यांमध्ये प्रसार केला. गेल्या काही वर्षांमध्ये कल्टारचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही पद्धत आंबा उत्पादकांना परिचित झाली आहे. कल्टारच्या वापराने हापूस जातीच्या झाडांना दरवर्षी फळधारणा तर होतेच, परंतु आंबा उत्पादन २ ते ३ पटीने वाढल्याचे दिसून येते. या संशोधन कार्याबरोबरच काजूच्या अभिवृद्धीसाठी मृदुकाष्ठ कलम पद्धती प्रमाणित करणे, काजूच्या वेंगुर्ला - ६, वेंगुर्ला - ७ आणि वेंगुर्ला - ८ या जाती विकसित आणि प्रसारित करण्यामध्ये सहसंशोधक म्हणून डॉ.गुंजाटे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.
डॉ.गुंजाटे यांची मे १९९४मध्ये बा.सा.को.कृ.वि.च्या दापोली येथील उद्यानविद्या विभागाचे प्रमुख म्हणून पदोन्नती झाली. तेथे त्यांनी फक्त ५ महिनेच काम केले आणि वयाच्या ५०व्या वर्षी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर फळलागवड तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून काम करायचे ठरवल्यावर खासगी फळउद्योग कंपनीच्या मुंबई आणि चेन्नई या ठिकाणी ३ वर्षे काम केले आणि जुलै १९९७मध्ये ते रिलायन्स उद्योगाच्या गोवा प्रक्षेत्रावर सल्लागार म्हणून रुजू झाले. डिसेंबर १९९८मध्ये रिलायन्स उद्योगाच्या जामनगर (गुजरात) प्रक्षेत्रावर उपाध्यक्ष म्हणून ते नियुक्त झाले. त्यांनी रिलायन्स उद्योगाच्या ४०० हेक्टर जागेत कृषी उद्योगाचा पथदर्शक प्रकल्प उभा केला आहे. त्यामध्ये ३१ जातींची फळझाडे, ४ जातीची इमारती लाकडाची झाडे, ५ जातींची औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड केली आहे. जामनगर येथेच सुमारे २०० हेक्टर जागेवर १ लाखाच्यावर आंब्याची झाडे असलेली आशिया खंडातील सर्वात मोठी आमराई उभी केली आहे. जामनगरसारख्या अवर्षणप्रवण भागातील या बागेमधून लागवडीनंतर ६ व्या वर्षापासून हेक्टरी १५ टनांपेक्षा जास्त आंबा उत्पादन मिळू लागले आहे.
शास्त्रज्ञ म्हणून कोयकलम योगदानाबद्दल डॉ.गुंजाटे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कोयकलम पद्धतीवरील संशोधनाबद्दल त्यांना १९८१मध्ये हरी ओम आश्रम, गुजरातचा डॉ.जे.एस.पटेल पुरस्कार मिळाला. १९९२मध्ये फळपिकांवरील संशोधनासाठी भारतीय फलोद्यान सोसायटीचा गिरिधरलाल चढ्ढा स्मृती पुरस्कार मिळाला. कोयविरहित आंब्याची जात विकसित करण्यासाठी फाय फाऊंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार १९९४मध्ये मिळाला, तर त्यांच्या कारकिर्दीमध्येच प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला संस्थेस महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार मिळाला.
डॉ.गुंजाटे यांनी आपल्या संशोधन कार्याच्या संबंधाने अमेरिका, इस्राएल, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड येथे भरलेल्या आंबाविषयक परिषदेमध्ये लेख सादर करून आंतरराष्ट्रीय मान्यता आणि ख्याती प्राप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकािंलकांमध्ये त्यांचे ६०च्यावर संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी २९ एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे.