Skip to main content
x

गुप्ते, शंकर विनायक

      शंकर विनायक गुप्ते यांचा जन्म सावंतवाडीला झाला. त्यांचे वडील सावंतवाडी संस्थानाचे दिवाण होते. शंकर यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल आणि मुंबईचे रॉबर्ट मनी हायस्कूल येथे झाले. नंतर १९२७मध्ये मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.ए. आणि १९२९मध्ये शासकीय विधि महाविद्यालयामधून एलएल.बी. या पदव्या संपादन केल्या. नंतर लगेच त्यांनी सॉलिसिटरची परीक्षाही दिली. मात्र सॉलिसिटर म्हणून त्यांनी काम केले नाही. त्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेची अ‍ॅडव्होकेटची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मूळ शाखेत वकिली करू लागले. मूळ शाखेतील निर्भय आणि सचोटीचे वकील म्हणून त्यांचा लौकिक झाला.

अनेक कामगार संघटनांशी गुप्ते यांचा घनिष्ठ संबंध होता.मुंबईतील कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक ना.म.जोशी यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

१९६१च्या अ‍ॅडव्होकेट कायद्यानुसार स्थापन झालेल्या महाराष्ट्र  बार काउन्सिलचे गुप्ते पहिले अध्यक्ष झाले. १९५३पासून १९६३पर्यंत ते ‘इंडियन लॉ रिपोर्ट - बॉम्बे सीरिज्’चे संपादक होते. १९५२पासून १९६२पर्यंत ते ‘महाराष्ट्र अ‍ॅडव्होकेट असोसिएशन’चे आणि ‘लीगल एड सोसायटी’चे अध्यक्ष होते.

१९६३मध्ये त्यांची नियुक्ती भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर-जनरल म्हणून  झाली, पण नंतर त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १९७७पासून १९८०पर्यंत ते भारताचे अ‍ॅटर्नी-जनरल होते.

- शरच्चंद्र पानसे

गुप्ते, शंकर विनायक