Skip to main content
x

गुप्ते, सुमती

     ‘फोटोजेनिक  चेहरा असणारी एकमेव मराठी अभिनेत्री’ असा बाबूराव पटेलांसारख्या दिग्दर्शकाकडून अभिप्राय मिळवणाऱ्या सुमती गुप्ते यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाला. परंतु त्यांचे बालपण बडोदा संस्थानात गेले. त्यांचे वडील न्यायाधीश होते. बडोदा येथेच त्यांचे शिक्षणही पार पडले. पदवी प्राप्त होताच त्यांनी प्रभात फिल्म कंपनीत प्रवेश केला. प्रभात कंपनीच्या ‘संत ज्ञानेश्‍वर’ चित्रपटात ज्ञानेश्‍वर महाराज नदीत स्नान करून परतताना उमटलेल्या त्यांच्या ओल्या पायाच्या ठशांवर हाताच्या ओंजळीतून फुले वाहताना दिसतात, या दृश्यातले हात सुमती गुप्ते यांचे होते. प्रभात फिल्म कंपनीतले त्यांचे हे एकमेव काम. त्या अगोदर सरस्वती सिनेटोनने दादासाहेब तोरणे यांनी सुमती गुप्ते यांना ‘नवरदेव’ चित्रपटात नायिकेची भूमिका दिली होती. १९४१ साली ‘नवरदेव’ प्रदर्शित झाला.

      भालजी पेंढारकर आणि शिराज अली हकीम यांनी पुण्यात फेमस अरुण चित्रची स्थापना करून कवी बी यांच्या दीर्घकाव्यावर आधारित ‘थोरातांची कमळा’ (१९४१) हा चित्रपट काढण्याचे ठरवले आणि कमळाच्या भूमिकेसाठी सुमती गुप्ते यांची निवड केली. याच चित्रपटाद्वारे त्यांचे पडद्यावर सर्वप्रथम दर्शन झाले. याच संस्थेने पुढचा चित्रपट प्रदर्शित केला ‘सूनबाई’ (१९४२). जुने आणि नवे यातला संघर्ष दाखवणाऱ्या या चित्रपटात सुमती गुप्तेंनी आधुनिक तरुणीची भूमिका केली. त्यांची ही भूमिका पाहून मा. विनायकांनी त्यांना ‘गजाभाऊ’ (१९४४) चित्रपटात काम दिले. त्याच सुमारास मा. विनायक यांच्या ‘चिमुकला संसार’ (१९४३) या चित्रपटाचे काम सुरू होते. त्यांचे दिग्दर्शक होते वसंत जोगळेकर. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्याशी सुमती गुप्ते यांनी विवाह केला.

       १९४५ सालात सुमती गुप्तेंना प्रकाश पिक्चर्स, वाडिया मुव्हीटोन आणि जनक चित्र अशा मोठ्या चित्रसंस्थांमध्ये कामासाठी बोलवणे आले. चित्रपट होते ‘हमारा संसार’, ‘शरबती आँखे’ व ‘संतान’. यापैकी पहिल्या दोन चित्रपटांत त्यांनी सहनायिकेची भूमिका केली. ‘संतान’ चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली होती. त्यानंतर सुमती गुप्ते यांनी वसंत जोगळेकरांबरोबर मीरा चित्र ही संस्था स्थापन केली. मीरा हे त्यांच्या मुलीचे नाव होते आणि मीरा चित्रतर्फे ‘साखरपुडा’ (१९४९) हा चित्रपट काढला. हा चित्रपट लिहिला होता विभावरी शिरूरकर अर्थात मालतीबाई बेडेकर यांनी. संजीवनी मराठे यांनी त्यातील गीते लिहिली होती. हा चित्रपट चांगला चालला.

         नंतर विश्राम बेडेकर यांच्या ‘वासुदेव बळवंत’ या चित्रपटात सुमती गुप्ते यांनी वासुदेव बळवंत यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ‘जय मल्हार’ या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या चित्रपटात सुमती गुप्ते यांनी पाटलाच्या सोशिक पत्नीची भूमिका साकारली. या चित्रपटात सूर्यकांत यांनी खलप्रवृत्तीच्या पाटलाची भूमिका केली. हा चित्रपट ग्रामीण चित्रपटांचा जनक ठरला.

     १९५४ साली प्रदर्शित झालेल्या ‘ऊनपाऊस’ चित्रपटात राजा परांजपे आणि सुमती गुप्ते यांनी म्हाताऱ्या नायक-नायिकेच्या भूमिका आपल्या कसदार अभिनयाने उत्कृष्टपणे साकारल्या.  दरम्यान ‘नंदकिशोर’ (१९५१), ‘प्रतापगड’ (१९५२), ‘श्यामची आई’ (१९५३), ‘स्वयंवर झाले सीतेचे’ (१९६४), ‘शेवटचा मालुसरा’ (१९६५), ‘पवनाकाठचा धोंडी’ (१९६६), ‘मानला तर देव’ (१९७०), ‘हा खेळ सावल्यांचा’ (१९७६), ‘दोस्त असावा तर असा’ (१९७८), ‘जानकी’ (१९७९) अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांत अभिनय केला. ‘समाज’, ‘नंदकिशोर’, ‘कारीगर’ वगैरे हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. १९६५ साली त्यांनी मधू मूव्हीज ही स्वत:ची चित्रसंस्था स्थापन केली आणि ‘शेवटचा मालुसरा’ (१९६५), ‘कारीगर’, ‘आँचल’, ‘आज और कल’, ‘एक कली मुस्काई’, ‘प्रार्थना’ (१९६९), ‘हा खेळ सावल्यांचा’ (१९७६), ‘जानकी’ (१९७९) असे चित्रपट निर्माण केले. त्यांनी ‘एक कली मुस्काई’ या चित्रपटातून आपली कन्या मीरा हिला नायिका बनवले. तसेच कथा-पटकथा लिहिल्या. चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम करून त्यांच्या वाट्याला फारसे मान-सन्मान आले नाहीत. प्रदीर्घ आजाराने त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

    - द.भा. सामंत

गुप्ते, सुमती