Skip to main content
x

हातकणंगलेकर,मधुकर दत्तात्रेय

     म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हातकणंगले येथे, माध्यमिक कोल्हापूरच्या आयर्विन ख्रिश्चन हायस्कुलात, तर सांगलीच्या प्रताप मॉडेल हायस्कूलमधून १९४४ साली ते मॅट्रिक झाले. ते इंटर आर्ट्स १९४६ साली व बी.ए. १९४८ साली पास झाले. सांगलीच्या विलिंग्डनमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. १९५२ साली त्यांनी इंग्रजीत एम.ए.ची पदवी प्राप्त केली. धारवाड (कर्नाटक) येथील शेतकी महाविद्यालयातून इंग्रजीच्या अध्यापनकार्याला त्यांनी प्रारंभ केला (१९५२ ते १९५६). याच काळात सुप्रसिद्ध कथाकार जी.ए. कुलकर्णी यांच्याशी त्यांचा स्नेहबंध जुळला. पुढे १९५६ ते १९८७ दरम्यान सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे अध्यापनकार्य करतानाच १९७३ ते १९७८ दरम्यान प्राचार्य म्हणून कार्य केले.

     हातकणंगलेकरांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातच लेखनाला प्रारंभ केला. त्यांनी सुरुवातीला इंग्रजी कथांचे अनुवाद केले. तत्पूर्वी त्यांनी शालेय जीवनात कथा व निबंधलेखनाचे प्राथमिक धडे गिरविले होते. ‘लास्ट अटेम्प्ट’ या इंग्रजी कथेचा ‘शेवटचा प्रयत्न’ हा अनुवाद ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाला. त्यानंतर इंग्रजी कथांचे अनुवाद विविध नियतकालिकांतून प्रकाशित होत राहिले. त्याच काळात ‘काव्य नवे आणि जुने’ हा काव्यपरीक्षणपर लेख ‘मनोहर’मध्ये, तर ‘हे दुःख आणि ते दुःख’ हा इंदिरा संत व मुक्तिबोधांच्या काव्यावरील तुलनात्मक समीक्षालेख ‘समाज प्रबोधन पत्रिके’त प्रसिद्ध झाला.

     आपली वैचारिक जडणघडण स्पष्ट करताना एम.एन. रॉय, प्रा. शहा, प्रा. मे.पुं. रेगे, लक्ष्मणशास्त्री जोशी आदींच्या मार्क्सवादी - समाजवादी प्रभावाची माहिती स्वतः म.दं.नी ‘उघडझाप’ ह्या आत्मकथनपर लेखसंग्रहात दिली आहे. त्यांच्या संपूर्ण समीक्षा लेखनातून मात्र वाद-विचार निरपेक्ष, वाङ्मयीन, समन्वयशील अशा विचारदृष्टीचा प्रत्यय येतो. इंग्रजी व मराठी साहित्याचा एैसपैस व्यासंग आणि विविधांगी अनुभवविश्व यांतून म.दं.ची उदार व समावेशक समीक्षादृष्टी घडली आहे असे दिसते.

     १९५० सालानंतरच्या दोन-तीन दशकांत विविध साहित्यकृतींचे आणि साहित्यकारांचे अंतरंग उलगडून दाखविणारे आस्वादपर दीर्घ लेख त्यांनी लिहिले. जी.ए. कुलकर्णी, श्री.दा. पानवलकर, सखा कलाल, चारुता सागर, श्रीनिवास कुळकर्णी, मर्ढेकर - सौंदर्यशास्त्र, श्री.के. क्षीरसागर - टीकाविवेक, प्रभाकर पाध्ये - सौंदर्यमीमांसा, मराठी लघुकथेचा प्रवास इत्यादी विषयांवरील त्यांची समीक्षा सदैव चर्चेत राहिली. त्यांचा पहिला लेखसंग्रह मात्र १९८० साली, ‘साहित्यातील अधोरेखिते’ या पुस्तकाच्या रूपाने सुपर्ण प्रकाशनाने प्रकाशित केला. याशिवाय, ‘मराठी कथा : रूप आणि परिसर’ (१९८६), ‘साहित्यविवेक’ (१९९७), ‘आठवणीतील माणसे’, ‘साहित्यसोबती’, ‘भाषणे व परीक्षणे’ (श्रीविद्या, २००८) व ‘उघडझाप’ (आत्मकथनपर लेखसंग्रह,२००५) ही त्यांची स्वतंत्र पुस्तके प्रकाशित झाली.

     त्यांच्या महत्त्वपूर्ण संपादित ग्रंथांमध्ये ‘मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूप’ (सहकार्य : गो.मा. पवार, १९८६), ‘विचारधारा’ (निवडक प्रभाकर पाध्ये, १९७९), ‘डोहकाळिमा’ (निवडक जी.ए. १९८७), ‘वाङ्मयीन शैली आणि तंत्र’ (१९८१), ‘श्री.दा. पानवलकर यांची कथा’ (साहित्य अकादमी, १९८९), ‘निवडक मराठी समीक्षा’ (सहकार्य : गो.मा. पवार, साहित्य अकादमी, १९९९), ‘जी.एं.ची निवडक पत्रे’ (खंड १ ते ४, मौज प्रकाशन), ‘निवडक ललित शिफारस’ (१९९०), ‘व्यंकटेश माडगूळकर : माणदेशी माणूस आणि कलावंत’ (२०००) या ग्रंथांचा समावेश होतो.

     हातकणंगलेकरांच्या आस्वादक समीक्षेने मराठी समीक्षेचा प्रवाह समृद्ध केला. रा.भा. पाटणकरांनी आस्वादक समीक्षेवर घेतलेल्या आक्षेपांना ‘आस्वादक समीक्षेची कैफियत’ या लेखातून त्यांनी समर्पक उत्तर दिले.

     ‘ललितकला, साहित्य यांचे स्वरूप बर्‍याच प्रमाणात अंतःप्रेरणेने जाणायचे असते. त्याची वस्तुनिष्ठता पदार्थ- विज्ञानातील तथ्यासारखी असत नाही. भाषा आणि विचार ही सत्यशोधनाची साधने असली तरी त्यात सर्वकाही पकडता येत नाही. आस्वादकाच्या भूमिकेवर त्यांचे समाधान असते. ही भूमिका अचिकित्सक अगर पोरकट नसते. ती वेगळी असते; पण हास्यास्पद अगर टाकाऊ असत नाही.’ (उघडझाप, पृ.२०३) अशी आपली भूमिका मांडताना, तीच आपली ‘सहजप्रेरणा’ होती, असे ते सांगतात. अनुवादातून विश्वसाहित्य व मराठी साहित्य यांत देवाणघेवाण घडविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. साहित्य अकादमीच्या ‘लिटररी जर्नल’मध्ये त्यांनी सलग दहा वर्षे मराठीतील साहित्यप्रवाहांवर लेखन केले.

     ‘वि.स. खांडेकर’ हे इंग्रजी पुस्तक साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित (१९८६), ‘माचीवरला बुधा’ (गोनिदा), ‘सती’ (व्यंकटेश माडगूळकर), ‘किरवंत’ (गज्वी) इ. वाङ्मयकृतींचे इंग्रजी अनुवादही त्यांनी केले. त्यांनी ‘क्वेस्ट’, ‘न्यू क्वेस्ट’, ‘थिएटर युनिट्स बुलेटिन’ यांतून इंग्रजीत लेखन केले. त्यांनी ‘उगवाई’ या मासिकाचे काही वर्षे संपादन केले, तसेच साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ इत्यादी संस्थांमध्ये सदस्य म्हणून भरीव कार्य केले.

     १९७६ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. १९९२ साली ‘तौलनिक साहित्याभ्यास : तत्त्वे आणि दिशा’ हा चंद्रशेखर जहागीरदार संपादित गौरवग्रंथ प्रकाशित झाला. सांगली येथे झालेल्या एक्याऐंशीव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करून मराठी वाङ्मयप्रेमी रसिकांनी हातकणंगलेकरांच्या प्रदीर्घ वाङ्मयसेवेचाच एक प्रकारे गौरव केला.

     इंग्रजीचे प्राध्यापक असल्याने, त्यांच्या मराठी समीक्षेला इंग्रजी वाङ्मयाच्या व्यासंगाची व्यापक, समावेशक आणि उदार बैठक प्राप्त झाली. आपल्या दीर्घ आयुष्यक्रमात, सातत्याने गेली ५० वर्षे आधुनिक मराठी साहित्यातील विविध प्रवृत्ती-प्रवाहांची सूक्ष्म, मर्मग्राही अन् स्वागतशील समीक्षा करणारे हातकणंगलेकर हे मराठी समीक्षेचे भीष्मपितामह ठरतात. जागतिक वाङ्मय आणि मराठी वाङ्मय यांच्यातील वाङ्मयमूल्यांचा एक सेतूच त्यांच्या समीक्षा-व्यापाराने सिद्ध केला आहे.

     - डॉ. राजेंद्र नाईकवाडे

हातकणंगलेकर,मधुकर दत्तात्रेय