Skip to main content
x

हेब्बर, कृष्ण कट्टिनगेरी

स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक भारतीय चित्रकारांच्या पहिल्या पिढीतील महत्त्वाचे चित्रकार म्हणून हेब्बर यांचे स्थान आहे. त्यांचा कलाप्रवास बघताना जाणवते, की त्यांचे जीवन व अंतरंग जसजसे बदलत गेले, तसतशी त्यांची चित्रेही बदलत गेली. ग्रमीण जीवनापासून सुरुवात झालेल्या त्यांच्या चित्रात शहरी जीवन, भारतीय संस्कृती, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक विषयांचे पडसाद उमटलेले दिसतात. भारतीय व पाश्‍चात्त्य कलाप्रवाह आत्मसात करून, वर्णनात्मक (इलस्ट्रेटिव्ह) ते अभिव्यक्तिपूर्ण (एक्स्प्रेसिव्ह) असा प्रवास करणाऱ्या हेब्बर यांनी स्वतःची अशी शैली विकसित करून मोठाच नावलौकिक मिळविला.

कृष्ण कट्टिनगेरी हेब्बर यांचा जन्म दक्षिण कर्नाटकातील कट्टिनगेरी या खेडेगावात झाला. घरची अत्यंत गरिबी होती. मैलावरील उडुपी येथील मिशन स्कूलमध्ये त्यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले व ते अकरा  वर्षांचे असताना वडील निवर्तले. या काळात ते खेळणी बनवून, ती विकून व शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कसाबसा चरितार्थ चालवीत. वयाच्या  पंधराव्या वर्षी हेब्बर ज्या शाळेत शिकले, तिथेच त्यांना नोकरी मिळाली. ‘शाकुंतल’ हे काव्य चित्रांच्या साहाय्याने शिकवताना शाळा तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्याने ते बघितले व हेब्बर यांच्यातील कलागुण हेरून त्यांना कलाशिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना मदत देऊ केली व असे न करशील तर येथून निलंबित करीन, असे सांगून त्यांच्यातील कलागुणांची त्यांना जाणीव करून दिली. त्यानंतर एकविसाव्या वर्षी मॅट्रिक झाल्यावर म्हैसूरच्या चामराजेंद्र टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कलाशिक्षणाला प्रारंभ केला. पण अल्पावधीतच तेथील नीरस व शुष्क वातावरणामुळे कंटाळून हेब्बरांनी शिक्षण सोडले व उडुपी येथे एका छायाचित्रकाराकडे रिटचिंगचे काम करू लागले. त्यांनी हेब्बरमधील कलागुण हेरले व त्यांना मुंबईला जाऊन कलाशिक्षण घेण्याचा सल्ला दिला.

१९३३ मध्ये मुंबईत पोहोचल्यावर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्ही.टी. स्टेशन) समोरील कोपर्डे स्टुडिओत रिटचिंग व एन्लार्जमेंटची कामे करीत दंडवतीमठ यांच्या नूतन कला मंदिरात शिक्षण घेऊ लागले. आईच्या आग्रहामुळे १९३५ मध्ये त्यांना उडुपी येथील सुशीला नावाच्या तेरा वर्षांच्या मुलीशी विवाह करावा लागला. हेब्बरांनी १९३७ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला व १९३८ मध्ये जी.डी. आर्ट ही पदवी प्राप्त केली. या काळातील त्यांचे गुरू दंडवतीमठ यांना ते आपले पहिले गुरू मानत, तर जे.जे.मधील ब्रिटिश संचालक जेरार्ड यांच्यामुळे हेब्बरांना आधुनिक दृष्टिकोन मिळाला, म्हणून ते त्यांना आपले दुसरे गुरू मानत.

हेब्बरांनी १९३९ ते १९४६ पर्यंत जे.जे.मध्ये कलाशिक्षकाचे काम केले. त्यानंतरही कलाशिक्षणाशी त्यांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर सतत संपर्क होता. शिक्षणातील शिस्तीला ते नेहमीच महत्त्व देत. मात्र, शिक्षणातून एका छापाच्या शैलीचे कलावंत निघाल्यास ते शिक्षण व्यर्थ आहे, असे त्यांचे ठाम मत होते. प्रस्थापितांचे अनुकरण करणार्‍या नवोदितांबद्दल ते अनेकदा नापसंती व्यक्त करायचे.

जे.जे.मधून बाहेर पडल्यावर १९४९ ते १९५० या दरम्यान पॅरिसमध्ये अकॅडमी ज्यूलियनमध्ये पेंटिंगचा व एकोल एस्टीन या कलाशाळेत ‘प्रिंट मेकिंग’ या विषयाचा हेब्बरांनी विशेष अभ्यास केला. परदेशातून परतल्यावर हेब्बर यांनीच नोंदविले आहे की, ‘‘मी काहीशा अस्वस्थ व गोंधळलेल्या मनःस्थितीत होतो. शेवटी असा निर्णय घेतला, की मी जेथे थांबलो होतो, तेथून पुढे चित्र काढायला सुरुवात करायची व पश्‍चिमेस  शिकलेल्या गोष्टी आवश्यक तिथे एकत्रित करायच्या.’’

हेब्बरांच्या सुरुवातीच्या चित्रात प्रामुख्याने दक्षिण भारतातील ग्रमीण जीवनाचे चित्रण अधिक दिसते. खेड्यातील साधेभोळे कष्टकरी, नाचगाण्यांत दंग झालेले ग्रमीण स्त्री-पुरुष, सणाच्या निमित्ताने पूजाविधी करणारे गावकरी, अशा प्रकारचे विषय चित्रित केलेले असत. काही काळ त्यांच्यावर अमृता शेरगिल व फे्रंच चित्रकार पॉल गोगँ यांचा प्रभाव होता.

त्यांच्या प्रेरणा प्रत्यक्ष जीवन, आदिम, लोक व आधुनिक कला यांतून आलेल्या होत्या. त्यानंतरच्या काळात मात्र त्यांची चित्रशैली मुक्त होत, त्यांचे संपूर्ण व्यक्तित्व प्रकट होऊ लागले. त्यांची चित्रे टप्प्याटप्प्यांनी विकसित झालेली दिसतात. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांची चित्रे काहीशी वास्तववादी असत. त्यांपैकी ‘कार्ला केव्ह्ज’ हे चित्र प्रसिद्ध आहे. परंतु नंतरच्या काळात ते या शैलीत अडकले नाहीत. याच काळात भारतीय लघुचित्रणशैलीतील द्विमिती रंगपद्धती व रेखात्मकता यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. जैन मॅन्युस्क्रिप्ट, रजपूत, मोगल लघुचित्रे, तसेच अजिंठ्याची भित्तिचित्रे या सगळ्यांचा हेब्बरांनी अभ्यास केला. त्यांना १९४१ मध्ये कलकत्ता फाइन आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. या काळात त्यांचे ‘गुरांचा बाजार’ (कॅटल मार्ट) हे चित्र गाजले.  त्यांच्या ‘टू मेडनहूड’ या चित्राला १९४७ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक प्राप्त झाले.

परदेशाहून परतल्यानंतर राहण्याचा प्रश्‍न होताच. याच काळात त्यांना महाबळेश्‍वरला पाऊण वर्षे राहण्याची संधी मिळाली व त्यातून ते कलावंत म्हणून वेगळ्या प्रकारे व अधिक मोकळेपणाने विकसित होऊ लागले व त्यांच्या चित्रांत वेगवेगळे घटक येत गेले.

हेब्बरांना १९५९ च्या दरम्यान रेषात्मक लय सापडली आणि त्यांनी स्वतःच्या व्यक्तित्वातली लय सर्वसामान्यांच्या जीवनातून शोधायला सुरुवात केली. ही रेखाटने व ट्यूबमधील रंग थेट कॅन्व्हसवर पिळून तयार झालेल्या रेषांनी काढलेल्या चित्रांमध्ये वैविध्य आढळते. त्यांची ही रेखने वास्तवदर्शी तपशील देणारी नसतात. मानवाकार किंवा अन्य आकारांच्या नैसर्गिक घडणीतून विशिष्ट भावना व्यक्त करण्यासाठी ते पुनर्रचना करतात. आवश्यक तेथे अगदी अचूक शारीरिक घडणही ते रेषेत पकडतात. आवश्यक असेल तेथे वास्तववाद सरळ सोडून देतात. मात्र संपूर्ण रेषेच्या चलनातून रेषेचा ओघ अखंड चालू असतो. अशी लय त्यांच्या सर्व चित्रांतही उपजत असताना दिसते. हेब्बरांना संगीत आणि नृत्य यांची उत्तम जाण होती. ते स्वतः पंडित सुंदर प्रसाद यांच्याकडे दोन वर्षे कथक नृत्य शिकले होते. ‘सिंगिंग लाइन’ या १९६१ मधील पुस्तकात त्यांच्या रेषेचे विविध तरल आविष्कार बघता येतात. ‘द इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’ या साप्ताहिकात त्यांची रेखाचित्रे व जॉन केनेडी व जवाहरलाल नेहरूंसारख्यांची व्यक्तिचित्रे प्रकाशित होत असत. ‘तुलसीदास’ या फिल्म्स डिव्हिजन निर्मित लघुपटातील चित्रे त्यांची आहेत. तुलसीदासाचा संपूर्ण जीवनपट केवळ रेखाचित्रांतून त्यांनी फार प्रभावीपणे उलगडला आहे. यांतील रेषा केवळ हाताचे कसब नसून कलावंताच्या अंतःकरणातील लयच रेषेच्या रूपाने प्रकट होताना दिसते.

हेब्बरांची १९७० च्या नंतरच्या काळातील चित्रे जीवनाचे वास्तव प्रकट करणारी दिसतात. सभोवतालच्या जगात जे-जे घडते, त्याबद्दल ते सतत जागरूक असतात आणि त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या चित्रांत दिसते. त्यांना निसर्गासोबतच माणूस आणि त्याचा समाज यांबद्दल अधिक ओढ आहे. आणि म्हणून दैनंदिन जीवनातील विविध घटनांमधून त्यांचे चित्र निष्पन्न होते. बांगला देशातील पुराची भयानकता, अपघात, आखाती युद्धांची भीषणता, असे ज्वलंत विषय ते अस्वस्थ होऊन रंगवितात. त्यांना कष्टकरी व कामगारवर्गाबद्दल विशेष सहानुभूती होती. सतत लागणार्‍या वैज्ञानिक शोधांबद्दलही त्यांना कुतूहल होते व त्यातून ‘रॉकेट’ व ‘बर्थ ऑफ अ मून’ यांसारखी चित्रे निर्माण झाली. चित्रांत विशिष्ट दृश्यपरिणाम साध्य व्हावा म्हणून ते रंगलेपन विशिष्ट पद्धतीने करत. त्यांच्या चित्रांत कधी एका रंगाच्या थरावर दुसऱ्या रंगाचा थर देऊन रंगाची एक वेगळीच अभिव्यक्ती साधलेली दिसते. त्यामुळे त्यांचे चित्र परिपूर्ण दिसते. अखेरची काही वर्षे ते ‘एनर्जी’ या विषयावरील चित्रे रंगवीत होते. यात त्यांनी पंचमहाभूते या पृथ्वीच्या निर्मितीमागे असणाऱ्या पाच तत्त्वांना साकार करण्याचा प्रयत्न केला.

हेब्बरांना अनेक पारितोषिके, मोठेमोठे मानसन्मान मिळाले. त्यांना १९४१ मध्ये कलकत्ता अकॅडमी ऑफ फाइन आर्ट या संस्थेचे सुवर्णपदक मिळाले, तसेच १९४७ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. त्यांना १९५६ ते १९५८ या तीनही वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

त्यांना १९७६ मध्ये म्हैसूर विद्यापीठात मानद डी.लिट. देऊन सन्मानित केले गेले व याच  वर्षी त्यांना ललित कला अकादमीची फेलोशिप देण्यात आली. १९८० ते १९८४ या कालावधीत दिल्लीच्या ललित कला अकादमीचे ते अध्यक्ष होते. कर्नाटक ललित कला अकादमीत १९८५ मध्ये महत्त्वाचे चित्रकार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना १९९० मध्ये शासनातर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला. १९६१ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने, तर १९८९ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांना भूषविण्यात आले. कलेबद्दलची आस्था, कलावंतांबद्दलची आपुलकी आणि सामाजिक बांधीलकी या गोष्टींची जपणूक करणाऱ्या कृष्ण हेब्बरांना अनेक कला संस्थांमध्ये आणि विद्यापीठांत प्रमुख सल्लागार म्हणून महत्त्वाचे स्थान होते.

हेब्बरांना १९८३ मध्ये सोविएत लॅण्ड नेहरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हेब्बरांची चित्रे देशविदेशांतल्या अनेक महत्त्वाच्या प्रदर्शनांत प्रदर्शित झाली. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात १९६५ मध्ये पहिल्यांदा त्यांचे चित्र प्रदर्शित झाले. व्हेनिसच्या बेनालेमध्ये, तसेच  टोकिओ बेनाले, साव पावलो अशा कितीतरी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत त्यांची चित्रे प्रदर्शित झाली. युरोपमधील महत्त्वाचे देश आणि अमेरिका, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया अशा देशांत त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली.

दिल्लीच्या रवींद्र भवनात १९७१ मध्ये सिंहावलोकनी प्रदर्शन (रिट्रॉस्पेक्टिव्ह) झाले. दिल्लीच्या संसद भवनात हेब्बर यांनी काढलेले मौलाना आझाद यांचे व्यक्तिचित्र असून, त्यांची चित्रे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी संग्रह करून ठेवलेली आहेत. दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, ललित कला अकादमी, पंजाब, कर्नाटक, तामीळनाडू या ठिकाणची शासकीय संग्रहालये, कोलकाता येथील अकॅडमी ऑफ फाइन आर्ट, बिर्लाअकॅडमी ऑफ फाइन आर्ट, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई, गोवा कला अकादमी अशा भारतातल्या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची चित्रे आहेत. परदेशात म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट, पॅरिस, सोविएत रशिया, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, जर्मनी या देशांतल्या संग्रहालयांतून हेब्बरांची चित्रे आहेत. ऑस्ट्रेलिया कॉमनवेल्थ कलेक्शन ड्रेसडेन गॅलरीतही आणि अमेरिकेच्या स्टॅटेन आइसलॅण्ड इन्स्टिट्यूट ऑफ आटर्स अ‍ॅण्ड सायन्समध्येही त्यांची चित्रे संग्रहित आहेत.

हेब्बर कलाशिक्षणासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप झाले. ते  मुंबईत वांद्रे येथील कलानगरात राहत. तिथेच त्यांचा स्टूडिओही होता. त्यांचा कर्नाटकातील संस्कृतीशीही सतत संपर्क होता. शिवराम कारंथांसारखे प्रतिभावंत त्यांच्या मित्रपरिवारात होते.

हेब्बरांच्या कन्या रेखा राव यासुद्धा एक समकालीन चित्रकर्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. हेब्बरांचे १९९६ मध्ये   वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही मुंबईत व दिल्ली येथे खाजगी आर्ट गॅलरींनी त्यांची अनेक प्रदर्शने आयोजित केली.  त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून ‘के.के. हेब्बर फाउण्डेशन’ची स्थापना झाली आहे. त्याद्वारे दरवर्षी सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, तसेच बुजुर्ग चित्रकाराचा सन्मान केला जातो आणि कलाविषयक कार्यशाळेचे आयोजनही केले जाते.

- ज्योत्स्ना कदम

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].