Skip to main content
x

हंसराज, स्वामी

वनांची राजवट असलेल्या तत्कालीन परभणी नगरात वडील गंगाधरपंत आणि आई रेणुकाबाई यांच्या पोटी श्री हंसराज स्वामी यांचा जन्म झाला. आश्वलायन शाखेचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण घराणे; परंतु त्यांची परिस्थिती फारच ओढगस्तीची होती. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना जगण्यासाठी गावोगावी फिरावे लागले. हंसराज स्वामींचे मूळ नाव नारायण. नारायणाचे शिक्षण होत नाही म्हणून आई-वडिलांचा जीव तीळतीळ तुटायचा. नारायण अतिशय देखणा व तेजस्वी होता. बुद्धिमान होता. आणि म्हणूनच रीतसर शिक्षण झाले नसले तरी आकलनशक्ती तेज असलेल्या एकपाठी नारायणाने धूळपाटीवर अक्षर-ओळख करून घेतली आणि त्यांनी ज्ञानेश्वरी, दासबोध, दीपरत्नाकर अशी विपुल ग्रंथसंपदा प्रथम वाचून काढली. या बोधामृतानेही त्यांचे समाधान होत नव्हते. आत्मज्ञान होणे महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटे. गुरूंनी ‘तत्त्वमसि’ची ओळख द्यायला पाहिजे ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते अस्वस्थ असत. भौतिक सुखे त्यांना निरस वाटू लागली. त्यांची अन्न-पाण्यावरची वासनाही उडाली.

परंतु आई-वडिलांनी यथावकाश, नारायणाला विवाहबंधनात जखडवलेच. लक्ष्मीबाई नावाच्या सुशील मुलीशी त्यांचा विवाह झाला. अपत्यप्राप्तीही झाली; परंतु बाळंतपणातच अपत्यासह लक्ष्मीबाई मृत्युमुखी पडल्या. या प्रकाराने नारायणाला पराकोटीच्या नैराश्याने ग्रसले. त्यामुळे वसमत गावातील ब्रह्मसाक्षात्कार झालेले महानुभाव सद्गुरू लक्ष्मणपंत यांच्यापाशी ते गेले. लक्ष्मणपंतांनी नारायणाच्या अंतर्मनातील नैराश्याचे मळभ त्यांना परमार्थ समजावून देऊन दूर केले. त्यानंतर मात्र नारायण शांत झाले. अध्यात्माचा वापर लोकाभिमुख कामांसाठी व्हायला हवा हा आपले गुरू लक्ष्मणपंत यांचा सल्ला आणि उपदेश घेऊन त्यांनी आपले मार्गक्रमण सुरू केले. त्यांनी घरदार जवळजवळ त्यागलेच. आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रथम माहूर येथे प्रस्थान ठेवले.

याआधी नारायणाच्या वडिलांनी त्याचा खूप शोध केला. नारायण पंढरपुरात सापडल्यानंतर त्यांनी सद्गुरू लक्ष्मणपंतांना मध्ये घालून नारायणास घरी चलण्याची विनवणी केली. परंतु काही दिवस गुरूंसोबत राहून ते देशाटनास निघाले. त्यांनी प्रथम मातापूर येथे श्रीदत्तांच्या तीर्थक्षेत्री वास्तव्य केले. त्यानंतर पुन्हा शेवाळ्यास येऊन आपल्या गुरूंची सेवा केली. सद्गुरू लक्ष्मणपंतांनी आपल्या शिष्याची पारमार्थिक उंची पाहून आश्चर्य आणि समाधान व्यक्त केले आणि त्यांना ‘तू गुरूंचा गुरू आहेस’ असे म्हणून गौरविले. त्यानंतर नारायणांनी विधिवत संन्यासाश्रमात प्रवेश केला तो पंढरपूरक्षेत्री जाऊन. आता त्यांचे नारायण हे नाव गळून पडले आणि ते श्री हंसराज स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले.

लोककल्याणार्थ फिरता-फिरताच त्यांची भेट सखारामबुवा डोमगावकर या रामदास स्वामींच्या भक्ताशी झाली. त्यांनी श्री हंसराजांस डोमगाव मुक्कामी येण्याचे निमंत्रण दिले. तेथे काही दिवस वास्तव्य केल्यानंतर श्री हंसराज स्वामींनी परांडे येथील अरण्य आपल्या मुक्कामासाठी निवडले आणि अखेरपर्यंत ते परांडेवासी झाले. त्यांनी त्यानंतर परांडे येथे मठ बांधला आणि लोकसेवेचे, लोकजागरणाचे काम सुरू केले.

वेदान्त संत म्हणून लौकिक मिळविलेल्या श्री हंसराज स्वामींनी ग्रंथलेखनाचे व त्या योगे लोकजागरणाचे महत्त्वाचे काम हाती घेतले. आपल्या भागवत धर्मात जुन्या वेदान्ताकडे, तसेच उपनिषदे आणि श्री शंकराचार्यांच्या विचारांकडे आणि तत्त्वज्ञानाकडे थोडे दुर्लक्ष झाल्याचे, त्यांना लोकाभिसरणापासून वंचित ठेवले गेल्याचे स्वामींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अशा उपेक्षित राहिलेल्या वेदविचारांचे पुनरुत्थान करण्याचा प्रकल्प उभा केला. त्यांनी ‘वेदेश्वरी’ या ग्रंथाचे लेखन केले. त्यामुळे ते एकोणिसाव्या शतकातील पहिले वेदान्तवेत्ते कवी ठरले. रामदासी परंपरेतील श्री हंसराज स्वामी हे श्री समर्थ शिष्य श्री उद्धव स्वामी यांच्या परंपरेतील सहावे स्वामी होत. सज्जनगडावर समर्थ समाधीच्या दर्शनार्थ ते गेले असता, त्यांना गर्दीमुळे समाधी दर्शन मिळाले नाही; तेव्हा समर्थांनी त्यांना दिव्यदर्शन दिले होते असे म्हणतात.

श्री हंसराज स्वामींच्या ग्रंथसंभारात त्यांनी शेवाळे मुक्कामी त्यांचे गुरू श्री लक्ष्मणपंत यांच्या सांगण्यावरून लिहिलेला ‘गुरुभक्तिसार’, त्याचप्रमाणे डोमगाव येथील वास्तव्यात त्यांच्याकडून ‘संकेतकुबडी’, ‘आगमसार’, ‘पूर्वारंभगाथा’, ‘स्वात्मदर्शन’, ‘सदाचार’ हे ग्रंथराज, तसेच परांडे येथील मठात ‘कथाकल्पलता’, ‘गद्यरूप तत्त्वज्ञान’, ‘हंसपद्धती’, ‘वेदेश्वरी’, ‘भक्तिज्ञान वैराग्यपर अभंग’, ‘वाक्यवृत्ती’, ‘वेदाज्ञा’, ‘चुडालाख्यान’ आदी मौलिक लेखनकार्य झाले. यांतील बरेच ग्रंथ हे तीन ते सहा हजार ओव्यांनी मंडित आहेत. ही सारी ग्रंथसंपदा परांडे येथे सध्या ‘श्री हंसमंडळ ट्रस्ट’च्या अखत्यारीत सुरक्षित आहे. श्री हंसराज स्वामी यांनी वैशाख शुद्ध अष्टमी, म्हणजेच १८५५ साली, ते पन्नास वर्षांचे होते तेव्हा परांडे येथे समाधी घेतली.

संदीप राऊत

हंसराज, स्वामी