Skip to main content
x

होवाळ, वामन गोविंद

     वामन होवाळ यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. १९५६ साली ते मॅट्रिक झाले. नोकरीनिमित्त वडील मुंबईत होते. त्यामुळे होवाळही मुंबईस आले. बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केली.

     बालपणी ‘किर्लोस्कर’ मासिकातील कथा वाचल्यामुळे त्यांना कथालेखक होण्याची प्रेरणा मिळाली. सन १९६३ साली ‘माणूस’ ही त्यांची पहिली कथा ‘कथालक्ष्मी’ अंकात प्रसिद्ध झाली. पुढे ‘धनुर्धारी’, ‘वसुधा’, ‘राजश्री’, ‘यशवंत’, ‘सत्यकथा’ यांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘बेनबाड’ १९७३ साली प्रकाशित झाला. ‘येळकोट’, ‘वारसदार’, ‘वाटा आडवाटा’ हेही कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथा मराठीचा उंबरठा ओलांडून अन्य भारतीय भाषांतही अवतरल्या. त्यांच्या ‘मजल्याचं घर’, ‘पाऊसपाणी’ या कथांचे अनुवाद इंग्रजी व फ्रेंच भाषांत प्रसिद्ध झाले.

     शाहीर अमरशेख यांच्या कलापथकाने त्यांचे ‘नाम्या म्हणे मी उपाशी’ हे लोकनाट्य सादर केले. ‘जपून पेरा बेणं’, ‘आंधळ्याची वरात, बहिर्‍याच्या घरात’ ही लोकनाट्ये रसिकांची वाहवा मिळवून गेली.

     त्यांच्या लेखनातून त्यांनी विषमता आणि अंधश्रद्धा यांवर धारदार हल्ला चढविला. समाजात मागे पडलेला माणूस, तळागाळातला माणूस हा होवाळांच्या कथेचा केंद्रबिंदू आहे. खेड्यातील सर्व घटकांची त्यांना कणव आहे. त्या वातावरणाबद्दल त्यांना जिव्हाळा आहे. तो त्यांच्या साहित्यातून सातत्याने दिसत राहतो. त्यांच्या कथेचा स्थायिभाव विशिष्ट जाती हा नसून विशिष्ट प्रवृत्ती हा आहे. प्रसंगी ती मिस्कील, विसंगती टिपणारी, विनोदाच्या अंगाने जाणारी होते. माणसाबद्दलची त्यांच्या मनातील कणव व्यापक आहे. महानगरातील झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस, पदपथावर आयुष्य कंठणारा बेघर हा त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. दाटून आलेल्या भावना शब्दबद्ध होतात.

     लेखणीप्रमाणेच विनोदी बाजाच्या त्यांच्या कथा खूप लोकप्रिय आहेत. प्रभावी वाणीचा वापर करून ते यशस्वी कथाकथनकारही झाले. वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणार्‍या साहित्याची निर्मिती होवाळ यांनी केली.

     - श्याम भुर्के

होवाळ, वामन गोविंद