Skip to main content
x

इराणी, जमशेद फिरोजशाह

          क्षीतज्ज्ञ सालिम अली यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांच्या शास्त्रीय माहितीवर आधारित चित्रे आणि टपालखात्याच्या तिकिटांचे संकलन करणारे चित्रकार जमशेद फिरोजशाह इराणी यांचा जन्म देवळाली, नाशिक येथे झाला. सर  जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई येथून त्यांनी १९५८ मध्ये उपयोजित कलेतील पदविका  प्राप्त केली.

जाहिरातसंस्थांमधून सात वर्षे काम केल्यावर ते लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो कंपनीत रुजू झाले आणि १९९६ मध्ये सीनियर मॅनेजर, अ‍ॅडव्हर्टायझिंग या पदावरून निवृत्त झाले. लार्सन अँड टूब्रोच्या दिनदर्शिकेसाठी त्यांनी काही चित्रे केली, तीसुद्धा निसर्ग निरीक्षण आणि अभ्यास यांवर आधारित होती.

योगायोगाने त्यांची भेट डॉ. सालिम अली यांच्याशी झाली आणि पशुपक्ष्यांच्या निसर्ग-विज्ञान चित्रकलेचे नवे दालन इराणी यांना खुले झाले. द हॅण्डबुक ऑफ द बर्ड्स ऑफ इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तानया दहा खंडात्मक ग्रंथाचे काम चालू असताना सालिम अलींना पक्ष्यांची अभ्यासपूर्ण चित्रे काढणारा चांगला चित्रकार हवा होता. प्रभाकर बरवे यांनी इराणींचे नाव सुचवले. पहिल्या भेटीतच त्यांची चित्रे पाहिल्यावर सालिम अलींनी त्यांना काम दिले. सालिम अलींच्या हॅण्डबुकसाठी पाश्चात्त्य चित्रकारांची चित्रे प्रामुख्याने घेतलेली होती. इराणी हे एकमेव भारतीय चित्रकार त्यांत होते. द बुक ऑफ इंडियन बर्ड्स’, ‘बडर्स ऑफ ईस्टर्न हिमालयाजही सालिम अलींची, तर कॉमन बर्ड्स’, ‘अवर फीदर्ड फ्रेंड्सअशी इतर पक्षीनिरीक्षणावरील पुस्तके इराणी यांच्या चित्रांनी परिपूर्ण झालेली आहेत.

इराणी यांनी पुस्तकांची मुखपृष्ठे, ‘कबनियत-कालिकासाठी वन्यजीवनाची चित्रे आणि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड यांच्यासाठी भेटकार्डे अशी विविध प्रकारची कामे  केली.

इराणी यांचे दुसरे कार्यक्षेत्र म्हणजे स्टॅम्प डिझाइनिंग अथवा टपाल तिकिटांचे संकल्पन. डॉ. सालिम अली आणि धीरूभाई मेहता यांच्यामुळे ते या क्षेत्रात आले. भूतानचे राजे जिग्मे दोरजी यांना भूतानसाठी काही पक्ष्यांची चित्रे असलेली तिकिटे करून घ्यायची होती. सालिम अलींनी इराणी यांचे नाव सुचवले. इराणी यांनी हे काम उत्तम प्रकारे केले. डॉ. सालिम अली आणि धीरूभाई मेहतांमुळे त्यांना भारतीय टपाल तिकिटांची कामेही मिळत गेली.

पक्षी आणि फुलांच्या चित्रांचे प्रत्येकी चार-चार तिकिटांचे संच, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या शताब्दीनिमित्त प्रसारित करण्यात आलेले तिकीट, कोकण रेल्वे, गोदरेज आणि डॉ. सालिम अली यांच्या शताब्दी वर्षानिमित्त काढलेली तिकिटे अशा अनेक टपाल तिकिटांचे संकल्पन आणि चित्रांकन करून इराणी यांनी टपाल तिकिटांच्या क्षेत्रातही वेगळा ठसा उमटवला.

विज्ञान चित्रकलेत निसर्गातील पशुपक्ष्यांचे अभ्यासपूर्ण चित्रण करणार्‍या पाश्चात्त्य चित्रकारांची एक परंपरा आहे. आपल्याकडे ही शाखा पुरेशी विकसित झालेली नाही. इराणी यांच्याव्यतिरिक्त या क्षेत्रात काम करणारे चित्रकार अगदीच थोडे आहेत. इराणी ज्या पक्ष्यांची चित्रे रंगवायची आहेत, त्या पक्ष्यांची पूर्ण माहिती मिळवतात. विवक्षित पक्ष्यांची मोजमापे, शारीरिक रचना, त्यांचे व्यक्तिमत्त्व पकडणारी अचूक पोझ, शेपटीच्या पिसांची संख्या, डोळ्यांची रंगछटा, बदलत्या ॠतुमानानुसार अथवा परिसरानुसार होणारे शारीरिक बदल, चोचीचा आकार व रंग अशा सर्व तपशिलांचा अभ्यास करून ते जलरंग, पोस्टर कलर्स, जरूर पडल्यास स्केचपेनचे रंग अशी विविध माध्यमे वापरून चित्र रंगवतात. अभ्यास, तंत्रकौशल्यावरील  हुकमत आणि अभिजात चित्रकाराची सौंदर्यदृष्टी यांचा मिलाफ त्यांच्या चित्रांमध्ये झालेला आहे. टपाल तिकिटाच्या टीचभर अवकाशातही ते ज्या प्रकारे तपशील भरतात आणि तो अवकाश जिवंत करतात, ते पाहण्यासारखे आहे. दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) हा अशा चित्रांचा प्राथमिक उद्देश असला तरी शास्त्रकाट्याबरोबरच चैतन्यपूर्ण सौंदर्यतत्त्वाच्या झालेल्या स्पर्शामुळे इराणी यांची चित्रे कलाकृतीम्हणूनच पाहायला हवीत.

- रंजन जोशी, दीपक घारे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].