Skip to main content
x

जोशी, ज्येष्ठराज भालचंद्र

     डॉ.ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील मसूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण जीवन शिक्षा मंदिर, मसूर येथे झाले (१९५५-६१). त्यानंतर यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयामधून त्यांनी १९६७ साली पदवी संपादन केली व त्यानंतर मुंबईतील युनिव्हर्सिटी डिपार्टमेन्ट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (यु.डी.सी.टी.) मधून रसायन अभियांत्रिकी (केमिकल इंजिनिअरिंग)मधील बी.ई. पदवी संपादन केली. त्याच शिक्षणसंस्थेत त्यांनी त्या विषयातील एम.ई. ही पदवी १९७२ साली मिळवली. १९७२ ते १९७७ दरम्यान तेथे त्यांनी या विषयातील संशोधन करून पीएच.डी. ही पदवी मिळवली. तेव्हापासून त्याच संस्थेमध्ये त्यांनी आपले संशोधन व अध्यापनकार्य चालू ठेवले. उपव्याख्याता, व्याख्याता, प्रपाठक, प्राध्यापक अशा एक-एक पायरीने वर चढत २००४-२००९ या काळात ते संस्थेचे संचालक होते.    

     रसायन अभियांत्रिकी या शास्रातील गेल्या ३५ वर्षांतील त्यांच्या संशोधनातून त्यांनी नानाविध प्रक्रियांची कारणमीमांसा शोधून काढली. उपलब्ध संयंत्रात सुधारणा करणे, त्यातील वीज व इंधन बचत करून प्रक्रिया सोपी व स्वस्त करणे, उत्पादनास लागणाऱ्या निरनिराळ्या टप्प्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करून उत्पादनक्रियेचा वेळ व खर्च कमी करणे ही त्यांच्या संशोधनामागील प्रमुख भूमिका आहे.

     या प्रकारचे संशोधन करताना, या प्रक्रियांच्या सखोल अभ्यासातून त्यांतील मूळ शोधून ते गणिती स्वरूपात मांडणे यात त्यांचा हातखंडा आहे व त्यांनी केलेल्या अशा संशोधनासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता व ख्याती मिळाली. रासायनिक प्रक्रिया होत असताना निरनिराळे घटक एकमेकांत कसे मिसळतात व त्यांची ही मिसळण्याची प्रक्रिया कशा प्रकारे सुधारून त्या जास्तीत जास्त परिणामकारक होतील, हे त्यांनी गणिती पद्धतीने दाखवून दिले व प्रायोगिक रितीने सिद्ध केले. द्रव, घन व वायू या तिन्ही रूपांतील रसायनांवरील प्रक्रियेत घडून येणाऱ्या प्रवाहाबद्दल संशोधन करून अशा प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर त्यांनी उत्तरे शोधून काढली. या कामाकरिता त्यांनी गणिताचा, तसेच संगणकशास्त्राचा उपयोग नवीन संयंत्र रचना करण्यासाठी केला.

     प्रा.जोशी यांनी दोनपेक्षा जास्त पदार्थांच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये त्या पदार्थांची मिसळण्याची प्रक्रिया जलद व सुलभ होण्याकरिता नवीन संयंत्र रचना शोधून काढल्या व त्या प्रक्रियांतील मिसळण्याचा वेग मोजण्याकरिता लेझर प्रणाली वापरली असता, प्रा.जोशींच्या सिद्धान्ताप्रमाणेच असल्याचे सिद्ध  झाले. रासायनिक प्रक्रियांमध्ये दाब, तापमान, मिसळण्याचा वेग इत्यादींमधील बदल अचूकपणे मोजण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले.

     ऊर्जानिर्मिती व ऊर्जाबचत या विषयांतील संशोधनाविषयी त्यांना विशेष आस्था आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संस्थेत सध्या सुधारित चुली, अन्न शिजविण्याच्या प्रक्रियेतील उष्णतेची बचत, सूर्यशक्तीवर चालणारे शितीकरण संयत्र, पवनशक्तीचा वापर इत्यादी विषयांवर संशोधन चालू आहे.

     संस्थेच्या स्थापनेपासून ही संस्था मुंबई विद्यापीठास संलग्न होती. गेल्या चार वर्षांत प्रा. जोशी यांच्या अथक प्रयत्नांस यश आले असून, आता या संस्थेस स्वायत्तता मिळाली असून तिचे नामकरण ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (आय.सी.टी.) असे झाले आहे. डॉ. जोशी यांच्या संशोधन कार्यातील विविधतेसाठी त्यांना देशातील व परदेशातील पुरस्कार मिळाले. त्यांतील काही उल्लेखनीय खालीलप्रमाणे आहेत : डॉ. जोशी यांच्या संस्थेने उत्कृष्ट शिक्षक पारितोषिक देण्याची प्रथा सुरू केली व पहिल्या वर्षीचे पारितोषिक त्यांना मिळाले. भटनागर पुरस्कार १९९१ साली मिळाला. ‘विविधलक्ष्यी औद्योगिक संशोधन केंद्र’ (वास्विक) तर्फे उत्कृष्ट औद्योगिक संशोधनाकरिता देण्यात येणारा पुरस्कार त्यांना १९९२ साली मिळाले. त्यांच्या संस्थेतील ‘हिरा’ म्हणून त्यांचा गौरव १९९४ साली संस्थेच्या हीरक महोत्सवात  करण्यात आला. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड सन १९९५ साली झाली. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार त्यांना २००४ साली देण्यात आला. २००५ साली ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स’ या संस्थेतर्फे डॉ. रेडी पुरस्कार देण्यात आला. २००७ साली ‘अमेरिकन केमिकल सोसायटी’तर्फे गेल्या ४० वर्षांतील पहिल्या १०० संशोधकांची यादी जाहीर करण्यात आली, त्यातही डॉ. जोशी यांचे नाव होते.

     संशोधनकार्य व संस्थेची प्रगती साधत असताना त्यांनी ५७ विद्यार्थ्यांना पीएच.डी. व ५६ विद्यार्थ्यांना एम.एस्सी. पदव्यांकरिता मार्गदर्शन केले. जगामध्ये संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकरिता एक मानक आंतरराष्ट्रीय संस्थेने निश्चित केलेला आहे व एखाद्या व्यक्तीचे प्रकाशित संशोधन इतर संशोधकांना किती वेळा उपयोगी पडले यावरून हा मानक (सायटेशन इंडेक्स) ठरवला जातो. डॉ.जोशींच्या संशोधनाचा मानाक हा ४००० पेक्षाही जास्त आहे.

     तरुण विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संशोधन हे आपले कार्यक्षेत्र निवडावे म्हणून भारतात काही प्रमुख शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत व त्यांतील डॉ. जोशी यांचा वाटाही खूप मोठा आहे. ते स्वत: तर हे प्रचारकार्य करतातच; पण त्यांच्या संस्थेतील शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी या कामात प्रोत्साहन दिले आहे.

     - डॉ. श्रीराम मनोहर

जोशी, ज्येष्ठराज भालचंद्र