Skip to main content
x

जोशी, वामन मल्हार

     वामन मल्हार जोशी यांचा जन्म आजोळी, तळे या गावी झाला. वडील जोशीपण, याज्ञिकी करीत. वामनरावांचे प्राथमिक शिक्षण कोकणातील गोरेगाव येथे झाले. पुढील शिक्षण पुणे व अहमदनगर येथे झाले. एम.ए.च्या अभ्यासक्रमात त्यांनी तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र हे विषय अभ्यासले. त्यानंतर कोल्हापूर येथील समर्थ विद्यालयात ते शिकवू लागले. ध्येयनिष्ठ गुरू म्हणून त्यांचा नावलौकिक झाला.

‘विश्ववृत्त’ मासिकाचे ते संपादक झाले. ब्रिटीशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ३ वर्षे शिक्षा भोगावी लागली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या हिंगणे येथील पाठशाळेत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.

‘रागिणी उर्फ काव्यशास्त्रविनोद’ ही त्यांची पहिली कादंबरी. स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-शिक्षण, द्विपतीकत्व, स्त्रियांचा सामाजिक दर्जा, ज्ञानाची श्रेष्ठता, ईश्वराचे अस्तित्व या विषयांचा ऊहापोह त्यांच्या ‘आश्रमहरिणी’, ‘नलिनी’ या कादंबर्‍यामधून केलेला आढळतो. ‘सुशीलेचा देव’ या कादंबरीत नव्या काळातील स्त्रीचे प्रगल्भ चित्र त्यांनी रेखाटले. ‘इंदू काळे सरला भोळे’ या कादंबरीत नीती, ध्येयप्रवणता, घटस्फोट याविषयीची त्यांची सुधारक मते व्यक्त होतात. पत्रात्म कादंबरीचा नवा प्रयोग त्यांनी या कादंबरीत केला.

‘विस्तवाशी खेळ’ हे नाटक आणि ‘नवपुष्पकरंडक’ हा कथासंग्रह त्यांनी लिहिला. अध्यात्मशास्त्राचा ऊहापोह ‘नीतिशास्त्रप्रवेश’ या ग्रंथातून केला. ‘विचारविलास’, ‘विचारलहरी’, ‘विचारविहार’ या ग्रंथांतून त्यांनी वाङ्मयविषयक विचार मांडले आहेत. ‘सॉक्रिटीसाचे संवाद’ या अनुवादित पुस्तकातून त्यांची चिंतनशीलता प्रत्ययास येते. ‘तात्त्विक कादंबरीचे जनक म्हणजे वामनराव’ असे गौरवोद्गार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी काढले. वामनरावांची वाङ्मयीन भूमिका ही एकांगी नाही. ती व्यापक, उदार, सर्वसमावेशक आहे. १९३० मध्ये मडगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. “वाङ्मयाचा उगम सत्यसंशोधन, सौजन्यबोध आणि सौंदर्यमीमांसा करण्याच्या लेखकाच्या ऊर्मीमध्ये असतो,” हे त्यांचे विचार साहित्य जगताला अनुकरणीय आहेत. कादंबर्‍यांच्या माध्यमातून वा.म.जोशी यांनी आपले नीतीविषयक विचार प्रकट केले. विवाहसंस्था, घटस्फोट  यांसंबंधीचे त्यांनी व्यक्त केलेले विचार आजच्या काळातही पुरोगामी वाटतात.

- श्याम भुर्के

जोशी, वामन मल्हार