Skip to main content
x

जोशी, वसंत अंबादास

          वसंत अंबादास जोशी यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाशिक येथेच झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी १९६१मध्ये प्राप्त केली. एम.एस्सी. पदवी म.फु.कृ.वि. संशोधनाद्वारे १९७९मध्ये मिळवली. जोशी यांची १९६१मध्ये कृषी खात्यात कृषी पर्यवेक्षक पदावर खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे प्रथम नेमणूक झाली. तेथे त्यांनी क्षार जमीन सर्वेक्षण, मृदा संधारण, क्षारता कमी करणे, उपाययोजना व भात जातींचा अभ्यास यावर ३ वर्षे संशोधन कार्य केले.

          जोशी यांची १९६४मध्ये कृषी महाविद्यालय, धुळे येथे डेमॉन्स्ट्रेटर पदावर बदली झाली. १९६८मध्ये कृषी अधिकारी पदावर गहू संशोधन केंद्र निफाड (जि. नाशिक) येथे जोशी यांची बदली झाली. येथे त्यांनी गव्हाच्या निरनिराळ्या जातींसाठी खतांचे नियोजन यासंबंधी संशोधन कार्य केले. १९७०मध्ये पदोन्नतीवर साहाय्यक प्राध्यापक म्हणून कृषि-रसायनशास्त्र व मृदाशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथे नेमणूक झाली.

          सेंद्रिय खतांचा वापर, अ‍ॅझोटोबॅक्टर नत्रखते, जमीन सुपीकता, कृषी हवामान विभागानुसार पीक पद्धती यावर त्यांनी काम केले. त्यांचे ४ मराठी लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. जोशी यांची १९८०मध्ये केळी संशोधन केंद्र, यावल येथे कृषि-रसायनशास्त्रज्ञ पदावर बदली झाली. जळगाव जिल्ह्यातील केळी क्षेत्राचे सर्वेक्षण, खतांचे नियोजन यावर त्यांनी काम केले. १९८१मध्ये पदोन्नतीवर मृदा विशेषज्ञ, सोलापूर येथे त्यांची बदली झाली. १९८४मध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे ‘अखिल भारतीय पीक समन्वय योजना ऊस’ मृदाशास्त्रज्ञ पदावर बदली झाली.

          युरिया खताबरोबर निंबोळी पेंडीचा वापर करताना युरियाच्या शिफारशीत मात्रेबरोबर निंबोळी पेंड ६ : १ या प्रमाणात चांगले मुरवून वापरल्यास नत्राचा ऱ्हास कमी होऊन पिकास हळूहळू उपलब्ध होते. नत्र खतास बचत होऊन ऊस उत्पादन चांगले येते. दर हेक्टरी ३०० ते ४०० किलो नत्र निंबोळी पेंडीबरोबर वापरावे. सरासरी १ मे. टन ऊस उत्पादन मिळण्यासाठी १.८२ किलो नत्र, ०.७८ किलो स्फुरद व ३.९२ किलो पालाश प्रति हेक्टरी पुरेसे आहे. मसुरी रॉक फॉस्फेट खताचा वापर करताना आडसाली उसासाठी मसुरी रॉक फॉस्फेट एकाच हप्त्यात देण्याची शिफारस केली.

          पूर्वहंगामी लवकर पक्व होणारी को ७२१९ जातीसाठी खत वापरण्याच्या योग्य वेळा देताना असे आढळले की, २५% नत्र प्रत्येकी ४ हप्त्यांत लावणीच्या वेळी, ४५ दिवसांनी, ९० दिवसांनी व १२० दिवसांनी विभागून दिल्यास उसाचे जास्त उत्पादन मिळते व रसाची गुणवत्ता चांगली मिळते. जमिनीची सुपीकता टिकून राहते.

          माती परीक्षण व पीक प्रतिसाद समन्वयावर आधारित खतांच्या शिफारशी व अपेक्षित ऊस उत्पादन मिळण्याचे तंत्र याअंतर्गत आडसाली ऊस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन, अधिक साखर व आर्थिक फायदा मिळण्यासाठीची सूत्रे तयार करण्यात आली. सुमारे ३७७ किलो नत्र, १६२ किलो स्फुरद व १६४ किलो पालाश प्रति हेक्टर सर्वसाधारण सुपीक जमिनीसाठी योग्य ठरते व १५० ते १७५ मे. टन अपेक्षित उत्पादन मिळू शकते.  सदर कामास डी.एस.टी.ए.अ‍ॅन्यु. कन्व्हेन्शनमध्ये प्रसिद्धी मिळून या कार्याबद्दल संबंधित सहयोगी शास्त्रज्ञांना के.पी. देशमुख पुरस्कार मिळाला.

          साखर कारखान्यातील व मद्यार्क बनवणार्‍या औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारे स्पेंटवॉश प्रेसमेड केक कंपोस्ट व नेहमीचे कंपोस्ट खत यांच्या वापराचा मातीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मावर परिणाम, याचा अभ्यास करून दर हेक्टरी ५ ते ७.५ मे. टन स्पेंटवॉश प्रेसमेड केक कंपोस्ट खत वापरल्यास नत्र खतात सुमारे ७० किलो, स्फुरदात सुमारे ७० किलो व पालाश खतात सुमारे ५० किलोंची बचत होते.  सदर कामास डी.एस.टी.ए अ‍ॅन्युअल्ड कन्व्हेन्शनमध्ये प्रसिद्धी मिळून वसंतदादा पाटील मेमोरियल प्राउज व जे.ए. हुजा रोटेटिंग शील्ड मिळाले. ऊस खोडवा पीक नियोजन - एक नवीन अभ्यासतंत्र या प्रयोगात स्पेंटवॉश प्रेसमेड केक व शेणखत तसेच उसाच्या पाचटाचा आच्छादनाचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली. यामुळे ऊस उत्पादनात सुमारे २५ ते ४० मे. टन वाढ होते. नुसते पाचट जाळून वापरण्यापेक्षा हे तंत्र सरस दिसून आले. तसेच खर्चात सुमारे २४ टक्के बचत आढळून आली. मातीची सुपीकता टिकून राहिली. सदर कामास डी.एस.टी.ए. अ‍ॅन्युअल्ड कन्व्हेक्शनमध्ये प्रसिद्धी मिळून वसंतदादा मेमोरियल प्राउज व जे.ए. हुजा रोटेटिंग शील्ड मिळाले.

          मृदा परीक्षण अहवालानुसार कमतरता आढळल्यास प्रति हेक्टरी २५ किलो लोह (फेरस सल्फेट) २० ते २५ किलो जस्त (झिंक सल्फेट), १० किलो मंगल (मँगनीज सल्फेट), ५ किलो बोरॉन (बोरॅक्स), १० किलो तांबे (कॉपर सल्फेट) व ३ किलो मॉलिबडेनम (सोडियम अमोनियम मॉलिबडेट) हे सर्व चांगल्या कुजलेल्या १ टन कंपोस्ट (शेणखतात मिसळून/ मुरवून) रांगोळी पद्धतीने वापरण्याची शिफारस करण्यात आली.

          वरील कार्याखेरीज उसासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर, महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्याची कारणे व उपाययोजना, ओलिताच्या पाण्याची तपासणी, पाडेगाव येथील ऊस संशोधनांचे स्थापनेपासूनचे सुमारे ५५ वर्षांचे निष्कर्ष, याविषयी एक प्रदीर्घ अहवाल शासनास सादर करण्याच्या कामात योगदान; अनेक शेतकरी मेळाव्यांतून सहभाग, तसेच शेतकर्‍यांच्या शेतावर पीक प्रात्यक्षिके यातही वसंत जोशी यांचा सहभाग होता.

वसंत जोशी ३० नोव्हेंबर १९९६ रोजी म. फु. कृ. वि. येथून ३५ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाले.

- संपादित

जोशी, वसंत अंबादास