Skip to main content
x

झुरळे, महाराज

झुरळे व.न.

त्तसंप्रदायाचे प्रचारक अशी ख्याती असलेले व.न. झुरळे तथा झुरळे महाराज यांचा जन्म त्यांच्या आजोळी, नृसिंहवाडी येथे झाला. त्यांचे घर कोल्हापुरात होते. ऋग्वेदी ब्राह्मण घराण्यात जन्मलेल्या झुरळे महाराजांना अध्यात्माचा वारसा त्यांच्या आजोळहून मिळाला. आजोळी दत्तभक्ती होती. परंपरेने चालत आलेली कर्‍हाडची रेणुकादेवी, करवीरनगरीची अंबाबाई आणि आजोळची नृसिंह ही कुलदैवते त्यांच्या घरात पुजली जात होती. कोल्हापुरात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणाच्या मिषाने ते मुंबईला आले खरे; परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. तरीही त्यांनी जिद्दीने बाहेरून अभ्यास करून साहित्य विशारदआणि वाङ्मय विशारदया प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्या. उदरनिर्वाहासाठी त्यांनी मुंबईत आयकर विभागात नोकरी पत्करली. त्यांनी ३९ वर्षे आयकर विभागात सेवा केली.

आपल्या सरकारी सेवेला उत्तम न्याय देत त्यांनी दत्तसंप्रदायाचा प्रचार अधिक जोमाने केला. त्यांच्या तेथील प्रबोधनाने त्यांचा शिष्यगण तयार झाला आणि सरकारी कामातील सत्शील प्रतिमा बर्‍याच जणांच्या वर्तनातून दिसू लागली. झुरळे महाराजांची ओळख एक संतसज्जन म्हणून होऊ लागली. यासाठी त्यांना कोणताही चमत्कार करण्याची गरज भासली नाही. नामस्मरण आणि शुद्ध चित्तवृत्ती यांच्या जोपासनेतून एक सुदृढ, आध्यात्मिक आदर्श माणूस घडू शकतो ही सहजसोपी शिकवण त्यांनी शिष्यांना दिली. त्यासाठी दत्तसंप्रदाय हे माध्यम वापरले. दत्तसंप्रदायाच्या विस्तृत आणि प्रभावी प्रचारासाठी त्यांनी संप्रदायाचा अधिक सखोलपणे अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी दत्तवाङ्मयाचे वाचन, मनन, चिंतन, विविध ग्रंथांचे वाचन केले. त्यांनी श्रीनृसिंह सरस्वती सेवा मंडळही आध्यात्मिक संस्था स्थापन केली. त्याचबरोबर, आध्यात्मिक विचार प्रसृतीसाठी त्यांनी १९५७ साली स्वत:ची प्रकाशनसंस्थाही स्थापन केली. त्यातून दत्तसंप्रदाय, तसेच तदनुषंगिक विषयांवरील पुस्तके प्रकाशित केली.

श्री सप्तशती गुरुचरित्रसार’, ‘श्री सुधारस’, ‘वासुदेव सप्तर्षी’, ‘श्री सत्यदत्तात्रेय सार्थ पूजा’, ‘श्री गुरुलीलामृत’, ‘श्री दत्तप्रबोध’, ‘श्री दत्तमाहात्म्य’, ‘श्री दत्तपुराण’, ‘श्री गुरुचरित्रग्रंथ, अनेक स्तोत्रे, अष्टके, पदे, त्याचप्रमाणे श्री वासुदेव चरितामृत’, ‘भगवान तिरुपती व्यंकटेश लीलाचरित्र’, अशा अनेक भक्तिरसपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन संस्थेअंतर्गत केले आणि विशेष म्हणजे ही पुस्तके त्यांनी भक्तगणांमध्ये विनामूल्य वितरित केली.

त्यांना १९७१ सालात श्रीनृसिंह सरस्वती यांचा आदेश मिळाला, की त्यांनी ध्यान आणि दत्तनामाचा प्रसार करावा. त्यानुसार महाराजांनी दर गुरुवारी भाविकांना सोबत घेऊन ध्यानधारणेचा उपक्रम सुरू केला. पुढे या सत्संगाला उदंड प्रतिसाद मिळत गेला आणि रविवारीदेखील हे ध्यानवर्ग सुरू करण्यात आले. या ध्यानवर्गातील साधकांची अशी स्थिती होई, की महाराजांना ध्यानमग्न साधकांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भानावर आणावे लागे. महाराजांनी १९८१ सालापासून सातत्याने श्रीदत्तयाग, श्रीशतचंडी, श्री सहस्रचंडी, संहिता स्वाहाकार अशा प्रकारचे याग, नृसिंहवाडी आणि कोल्हापूर या तीर्थक्षेत्री केले. त्यांच्या डोंबिवली येथील निवासस्थानी श्रीगुरुपौर्णिमा, श्रीदत्तजयंती, श्रीरामनवमी, श्रीनृसिंहजयंती, श्रीगुरुप्रतिपदा असे उत्सव त्यांचे शिष्य आणि श्रीदत्तभक्त मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरे करतात. याच ठिकाणी महाराज लोकांना त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय, ध्यानधारणा, मंत्रघोष असे मार्गदर्शन करतात. त्यांनी आजवर अनेकांना समस्यांमधून बाहेर काढून भक्तिमार्गाने जगायला लावले आहे. नेटका, किंबहुना उच्च दर्जाचा प्रपंच झुरळे महाराजांनी केला आणि प्रपंचात राहूनही उच्च कोटीची आध्यात्मिक पातळी गाठता येते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांना या अध्यात्मकार्यात त्यांच्या खर्‍या अर्थाने सहधर्मचारिणी ठरलेल्या लक्ष्मीबाई, तसेच श्री. अविनाश आणि श्री. देवदत्त यांचे सहकार्य लाभले. जनसामान्यांपेक्षा खूपच भिन्न जीवनशैली आणि आचारविचार, ‘आधी आचरले, नंतर सांगितलेया नियमानुसार ते जगले.

ऐहिक गोष्टींची उपलब्धी, इंद्रियसुख, सृष्टीतील साधनांमधून मिळविणे सहजसोपे असते. ते कुणीही मिळवू शकते, अगदी प्राणी, जनावरेसुद्धा. परंतु, या ज्ञानाच्या मायावी मुखवट्याआडचे अलौकिक जग व ज्ञान मिळविण्यासाठी जर तुम्हांला ते नेत्र हवे असतील, तर अध्यात्माचा अंगीकार तुमच्या रोमारोमांत झाला पाहिजे, जगण्याचे सार्थक त्यातच आहे आणि त्यासाठी म्हणूनच ध्यान, नामसाधना हे मनोभावे केले पाहिजे हे झुरळे महाराजांचे सांगणे होय.

संदीप राऊत

झुरळे, महाराज