काकोडकर, चंद्रकांत कल्याणदास
चंद्रकांत काकोडकर यांचा जन्म काकोडे, गोवा येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गोव्यात व नंतरचे अत्यंत खडतर, कष्टमय परिस्थितीत मुंबईच्या ओरिएन्ट व चिकित्सक हायस्कूलमध्ये करून ते १९४३ साली मॅट्रिक झाले. साइझिंग मटेरियल्स या एकाच कंपनीत त्यांनी १९७०पर्यंत नोकरी केली. सुरुवातीला सानेगुरुजी, वि.स. खांडेकर, ना.सी. फडके यांच्या साहित्याचा व नंतरच्या काळात प्रसिद्ध बंगाली लेखक शरच्चंद्र चटर्जींच्या लेखनाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. गांधीजींच्या राजकीय विचारसरणीचाही प्रभाव काकोडकरांवर होता. ललित लेखकाचा पिंड, सळसळते रक्त, विशिष्ट वाचकवर्ग नजरेसमोर ठेवून रंजन करण्याची चिकाटी यांमुळे त्यांची लेखननिष्ठा अभंग राहिली. त्यांच्या कथावस्तूंमध्ये सुशिक्षित मध्यमवर्गीय संस्कृती, संगीत, चित्रकला, काव्य इत्यादी कलांचे क्षेत्र चित्रित आहे. त्यांचे नायक जसे जिद्दीचे, गुणी, कर्तबगार, मनस्वी व प्रेमातल्या निष्ठेवर जीव ओवाळून टाकणारे आढळतात; तशाच नायिकाही सुस्वरूप, देखण्या, व नायकांच्याच तोडीच्या वाटतात. कुशल आविष्कार करणारे लेखन असले, तरी विशिष्ट चाकोरीतच ते फिरत राहते, त्यामुळे नंतर कंटाळवाणे होऊ लागते. त्यांचे साहित्य उत्तम स्वप्नरंजन करते.
एखाद्या राजकीय समस्येच्या सूत्राशी सामाजिक कथा गुंफण्याचा लेखकाचा प्रयत्न ‘निसर्गाकडे’ (१९४४) ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी’ (१९४८) व ‘गोमांतका जागा हो’ (१९५०) या कादंबर्यांतून प्रतीत होतो. यांतील शेवटच्या कथेत गोमांतकाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न व देवदासींचा प्रश्न हे दोन्ही त्यांनी नायक व नायिका ह्यांच्या प्रेमकथेच्या माध्यमातून मांडले आहेत. प्रेमकथेला प्राधान्य मिळाल्याने प्रश्न गौण बनले व त्यांना अपेक्षित उठाव मिळाला नाही. त्यांच्या कादंबर्यांतून प्रेमभावनेची मोकळेपणाने केलेली वर्णने आहेत. यौवनमत्त शरीरसौंदर्याच्या उत्तान वर्णनात काकोडकर कसबी आहेत. त्यात तोचतोपणा जाणवतो व कलात्मक सौंदर्य जाणवत नाही. त्यांच्या लेखनाची लोकप्रियता अमान्य करता येत नाही. प्रीतीला केंद्र कल्पून त्यांची कल्पक प्रतिभा जगातील विविधता टिपते व कथेत जीवनाचा हवा तसा उपयोग करून कादंबरी पूर्णत्वास नेते. वाचकांचा अनुनय ते कुशलतेने साध्य करतात.
‘अनुराग’, ‘अनिता’, ‘अबोल झालीस का?’, ‘अमरप्रेम’, ‘आधार’, ‘आनंदभैरवी’, ‘गुंतता हृदय हे’, ‘दैव जाणिले कुणी’, ‘प्रीत रंगली ग’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘संकेत मीलनाचा’ इत्यादी कादंबर्यांची शीर्षके त्यांच्या अंतरंगाची सूचक आहेत. झपाटलेल्या गतीने ते लेखन करतात.
१९४४ ते १९६० या काळात ‘पुनर्मीलन’, ‘प्रीतीची ओढ’, ‘कीर्तिमंदिर’, ‘अग्निदिव्य’, ‘क्षण आला भाग्याचा’ इत्यादी सुमारे तीस कादंबर्या त्यांनी लिहिल्या. नंतरच्या काळात कादंबर्यांव्यतिरिक्त ‘अरेबिअन नाइट्स’ या कथांचे नीटस भाषांतर (भाग १ ते ५) त्यांनी केले. शरच्चंद्रांचा अभ्यास करून त्यांचेच नाव घेऊन ‘सुचिता’ ही बंगाली कादंबरी प्रसिद्ध केली व हे गुपित नंतर फोडले. त्यांच्या ‘श्यामा’(१९६३) कादंबरीने अश्लीलतेच्या विषयावर खळबळ माजवली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले व काकोडकरांच्या बाजूने निकाल झाला. त्याच कादंबरीच्या १९७१च्या आवृत्तीत त्यांनी या खटल्याचे साद्यंत वर्णन दिले आहे. काकोडकरांच्या ‘नीलांबरी’ कादंबरीवर निघालेला ‘दो रास्ते’ हा हिंदी चित्रपट गाजला. कथालेखनाचे पारितोषिक त्यांना मिळाले. ‘कीर्तिमंदिर’ला ‘गोमांतक साहित्य संमेलना’चे पारितोषिक मिळून तिचे हिंदीत भाषांतरही झाले. गोमंतक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना मिळाले. शालेय जीवनातच लेखनाचा शुभारंभ करणार्या काकोडकरांनी काही कथाही लिहिल्या होत्या. काही कादंबर्यांच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या, यावरून त्यांची लोकप्रियता ध्यानात येते.
काहीशी एककल्ली व एकमार्गी प्रवृत्ती असलेल्या काकोडकरांनी ३०० हून अधिक कादंबर्या मराठी वाङ्मयाला दिल्या. इतक्या संख्येने कादंबर्या लिहिणारा लेखक मराठीत दुसरा नाही. तरीही साहित्यिकांच्या कुठल्याही मेळाव्यात त्यांनी कधीही हजेरी लावल्याचे ऐकीवात नाही. त्यांनी १९६०नंतर आपल्या लेखनाचा वेग वाढवला. एकत्रित चार-पाच कादंबर्या देणारे ‘चंद्रकांत’ व ‘काकोडकर’ हे दिवाळी अंक उल्लेखनीय आहेत.
२. देशपांडे अ.ना.; ‘आधुनिक मराठी साहित्य-भाग दुसरा’; व्हीनस प्रकाशन, पुणे; १९७०.