Skip to main content
x

काळे, श्रीकांत मोरेश्वर

         हाराष्ट्र राज्यातील मेंढीपालनातील समस्या, रोगराई, आहार व्यवस्थापन व प्रजोत्पादन याबाबत सूक्ष्मस्तरावर सातत्याने अभ्यास करून यशस्वितेसाठीचे आराखडा स्वरूपात धोरण निश्चित करणाऱ्या व त्यानुसार कार्य करणाऱ्या पशुवैद्यक अधिकाऱ्यांपैकी डॉ.श्रीकांत मोरेश्वर काळे हे एक आहेत. त्यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालयात झाले. माध्यमिक शिक्षणाच्या वेळी त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अस्थिर झाली व आर्थिक आवक घटल्यामुळे, त्यांचे इ.अकरावीपर्यंतचे शिक्षण बेकरीमाल दारोदारी विकून त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर कसेबसे झाले. काळे यांनी पशुवैद्यक शिक्षण दरमहा  रु. ४०/- विद्यावेतन व पुस्तकांच्या खर्चामध्ये ५०% सवलत मिळते म्हणून स्वीकारले, पण पशुवैद्यक महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर मुक्या जनावरांचा अभ्यास करून निदान करणे व त्यानुसार उपचार करून त्यांना बरे करणे हे एक प्रकारचे देवदूताचे कार्य आहे, याची त्यांना प्रचीती आली. त्यांनी १९५४मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून बी.व्ही.एस्सी. पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. त्यानंतर काळे तत्कालीन धोरणानुसार शासकीय सेवेमध्ये ४ जून १९५४ रोजी नाशिक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये रुजू झाले. पुढे फेब्रुवारी १९५५मध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्या ठिकाणी त्वरित जाऊन निदान, चिकित्सा व इलाज करणाऱ्या विशेष पथकाचे पदाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या विभागामध्ये काम करत असताना डॉ.काळे यांना एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनास आली की, धनगर समाजाच्या शेळ्या व मेंढ्या साथीच्या रोगाने ग्रस्त झाल्यावर औषधोपचार न करता अंधश्रद्धेपोटी गंडेदोरे, धुपारे व अंगारे लावल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. त्यामुळे आर्थिक हानी होते.

         डॉ.काळे यांनी त्या काळात धनगर समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न केला. जानेवारी १९५८मध्ये कोल्हापूर व बेळगाव या भागांमध्ये ते ‘रिंडरपेस्ट निर्मूलन योजने’चे अधिकारी म्हणून रुजू झाले. अपुरा सेवक वर्ग व मोठे बाधित क्षेत्र असूनही त्यांनी नियोजनपूर्वक सर्व सहकार्‍यांना एकत्र आणून योजना यशस्वी केली. पुढे १९६४ ते १९६७ या काळात त्यांनी नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. या काळात विद्यार्थ्यांच्या वेळेची समस्या व कौटुंबिक समस्या यांचा विचार करून ते प्रसंगी जादा तास घेत, तर कधी सर्वांच्या सोयीने वेळापत्रकात बदल करत असत. यामुळे अल्पावधीतच ते विद्यार्थिप्रिय शिक्षक झाले. त्यांनी याच काळात मेंढ्यांना होणारे आजार व इलाज या संदर्भात मोठ्या प्रमाणावर लिखाण केलेले आहे.

         डॉ.काळे जानेवारी १९६७मध्ये पुण्यातील लोकर पृथक्करण प्रयोगशाळेत कार्यरत होते, तर ऑक्टोबर १९६८मध्ये त्यांनी पाषाण मेंढी फार्म, ताथवडे येथे विभागीय अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली. मेंढी फार्मवर त्यांनी मेषसंवर्धनाबाबत सर्व स्तरांवर काम केले. या कामाच्या अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा त्यांनी लिखित स्वरूपात कायमचा ठेवा तयार करून ठेवलेला आहे. पुणे व नागपूर आकाशवाणी केंद्रांवर सलग १० वर्षे त्यांनी धनगर व शेळीमेंढी पालकांसाठी व्याख्याने देऊन मार्गदर्शन केले. याच काळात त्यांनी भारतीय व परदेशी गोवंशाचा अभ्यासही केला व महाराष्ट्रातील भौगोलिक रचना, शेतीमधील बागाईत, जिराईत, कोरडवाहू क्षेत्र व त्यानुसार घेतली जाणारी वैरणीची पिके व अन्य वैरणीची उपलब्धता याचा अभ्यास करून प्रदेशानुसार संकरीकरणाच्या योग्य जाती कोणत्या असल्या पाहिजेत, याचा पहिला अहवाल तयार केला.

         डॉ.काळे प्रत्येक ठिकाणी आपले काम व त्या संदर्भातील शासकीय धोरणे याचा सर्वांगीण अभ्यास करून आपली वेगळी कार्यपद्धती निश्चित करत व त्याप्रमाणे काम करत. त्यांच्या या कार्यप्रणालीने पशुपालकांना मोठा फायदा  झाला आणि पशुसंवर्धन खात्याची प्रतिमा उज्ज्वल झाली. या कर्तृत्वामुळेच १९७६ ते १९८८ या काळात त्यांनी पशुसंवर्धन खात्यात अनेक वरिष्ठ पदे समर्थपणे सांभाळली. त्यांनी प्रदेशानुसार पशुधन, तेथील शेती पद्धती व शेतकरी यांचा केलेला अभ्यास पशुसंवर्धन खात्यास आदर्शभूत ठरला आहे.

- मानसी मिलिंद देवल

काळे, श्रीकांत मोरेश्वर