Skip to main content
x

कालेलकर, दत्तात्रेय बाळकृष्ण

कालेलकर, काकासाहेब

काकासाहेब कालेलकरांना ९६ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभले. टिळक-आगरकरांच्या कालखंडापासून इंदिरा गांधींच्या कारकिर्दीच्या अनुभवापर्यंत! त्यांचे घराणे बेळगुंदीचे पण जन्म सातार्‍याला. फर्ग्युसन महाविद्यालयातून ते १९०७ मध्ये बी.ए. झाले आणि एल्एल.बी.चे पहिले वर्ष पूर्ण केले. त्यांच्या मनावर आधी सावरकरांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव, पण पुढे महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा संस्कार होऊन ते पूर्णपणे गांधीवादी झाले. ‘राष्ट्रमत’ नावाच्या दैनिकात ते काम करीत. १९१७ साली ते अहमदाबादच्या गांधीजींच्या साबरमती आश्रमात गेले. १९३७ मध्ये ते वर्धा-सेवाग्रामला आले. गांधीजींच्या ‘नवजीवन’ साप्ताहिकात ते लिहीत. गुजराती भाषा आत्मसात करून ते गुजरातीमधले नामवंत साहित्यिक झाले.

स्वातंत्र्याच्या आंदोलनात सतत भाग घेऊन त्यांनी बरेचदा कारावास सोसला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची दोन वेळा राज्यसभेत नियुक्ती झाली. अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमले गेले. गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष तसेच हिंदी विश्वकोश समितीचे ते सदस्य होते. त्यांना भारत सरकारची ‘पद्मविभूषण’, ‘साहित्य अकादमी’चे पारितोषिक व फेलोशिप असे बहुमानही मिळाले. त्याशिवाय अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य अशी ‘डी.लिट.’ची पदवीही अर्पण केली. त्यांना प्रवासाची विलक्षण हौस होती. हिमालय, ब्रह्मदेश, जपान, पूर्व आफ्रिका आणि संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केला आणि गुजराती भाषेत त्या प्रवासांची रसाळ आणि काव्यात्म वर्णने करून गुजराती साहित्यात प्रवास वर्णनांचे दालन समृद्ध केले. गुजराती भाषेतला पहिला शब्दकोश ‘जोडणी-कोश’ त्यांनीच तयार केला. तुरुंगात असतानाच त्यांनी ‘उत्तरेकडील भिंती’ (१९२३) नावाचे पुस्तक लिहिले.

त्याशिवाय ‘हिंडलग्याचा प्रसाद’(१९३४), ‘वनशोभा’(१९४४), ‘खेळकर पाने’(१९६४) ही ललितगद्यपर पुस्तके लिहिली. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’चा प्रभाव त्यांच्या मनावर होता व त्यातूनच ‘रवींद्रमनन’सारखे पुस्तक निर्माण झाले. विष्णुभट गोडसे ह्यांचे ‘माझा प्रवास’(१८५७ सालच्या बंडाची हकिकत) हे प्रवासाच्या हौसेमधूनच त्यांनी वाचले. ते वाचल्यावर त्यांना ते काल्पनिक पुस्तक -कादंबरी आहे, असे वाटले आणि त्यांनी इतिहासाचार्य चिं. वि. वैद्य ह्यांना पत्र लिहून तसे विचारले. ह्याचे कारण त्या पुस्तकाची भाषा हेही होते. त्यांच्या प्रवास वर्णनांची मराठीत भाषांतरे झाली व मराठी साहित्यात भाषांतरित प्रवास वर्णनांचे दालन खुले झाले. (अपवाद म्हणजे १८६७ साली भास्कर हरी भागवतांनी ‘इंग्लंडातील प्रवास’ नावाचे प्रवासवर्णन करसनदास मूळजी ह्यांच्या ‘मारा इंग्लंडना प्रवास’ ह्या गुजराती भाषेतील प्रवास वर्णन मराठीत भाषांतर करून प्रसिद्ध केले होते.) कालेलकरांची ‘आमच्या देशाचे दर्शन’ अनुवाद: वामन चोरघडे (१९४३) , ‘ब्रह्मदेशचा प्रवास’ अनुवाद: श्रीपाद जोशी (१९४३), ‘भक्तिकुसुमे’ अनुवाद: वामन चोरघडे (१९४५), ‘लाटांचे तांडव’ अनुवाद: वामन चोरघडे (१९४६) ही प्रवास वर्णने मराठीत आली. ‘लोकमाता’(१९३८) भारतातील नद्यांचे वर्णनही मराठीत आले होते.

त्यांच्या अगोदरच्या प्रवासवर्णनांचा अनुवाद नरेश मंत्र्यांनी करून ‘जीवनलीला’ (१९५८) प्रसिद्ध केले. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रवासवर्णनांतून निवडक प्रवासलेखांचे संस्कारित पुनर्मुद्रण ‘भारत दर्शन’ ह्या नावाने सहा भागांत प्रसिद्ध झाले. रवींद्र केळेकर ह्या सहा भागांचे संपादक असून ‘महाराष्ट्र भूमी’, ‘दक्षिण भारत’, ‘मध्य व उत्तर भारत’, ‘हिमशिखरांच्या सान्निध्यात’, ‘अर्णवाचे आमंत्रण’ (सागरदर्शन), ‘जीवनाचा कायोत्सर्ग’ (प्रतापदर्शन) अशी सहा पुस्तके आहेत. ती १९७० साली प्रसिद्ध झाली. ह्याशिवाय त्यांची ‘रामतीर्थ चरित्र’ (१९०७), ‘साहित्याचे मूलधन’ (१९३८), ‘साहित्याची कामगिरी’ (१९४८), ‘वासरी’ (१९७३) ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. लेखक सतत लिहिता राहावा, हे कालेलकरांच्या संदर्भात सत्य ठरते.

- डॉ. चंद्रकांत वर्तक

कालेलकर, दत्तात्रेय बाळकृष्ण