Skip to main content
x

कालेलकर, नारायण गोविंद

      नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म रत्नागिरीतील बांबुळी येथे झाला. बडोदे, मुंबई व पॅरिस येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी फ्रेंच साहित्यातील पदविका, पॅरिस विद्यापीठाची डी.लिट. पदवी व ‘रॉकफेलर सीनियर फेलो’ हा सन्मान संपादन केला होता. १९४० ते १९५६ पर्यंत त्यांनी बडोद्यात फ्रेंच भाषा-साहित्याच्या व भाषाशास्त्राच्या अध्यापनाचे कार्य केले. १९७३ मध्ये त्यांनी पुण्यात डेक्कन महाविद्यालयामध्ये इंडो-आर्यन व इंडो-युरोपियन भाषाशास्त्राचे प्राध्यापक आणि मग मराठी महाशब्दकोशाच्या योजनेचे प्रमुख संपादक, तसेच महाराष्ट्र राज्यभाषा मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम सांभाळले.

     ‘ध्वनिविचार’ (१९५५), ‘भाषा आणि संस्कृती’ (१९६०) आणि ‘भाषा : इतिहास आणि भूगोल’ (१९६०) हे त्यांचे ग्रंथ फार महत्त्वाचे असून यापैकी पहिल्या दोन ग्रंथांना महाराष्ट्र राज्य पारितोषिके आणि शेवटच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. अनेक प्रकारच्या फ्रेंच साहित्याचे त्यांनी भाषांतरही केले. ‘युद्धकालीन भारतीय समाज’ (१९३५) आणि ‘कम्पॅॅरेटिव्ह मेथड इन हिस्टॉरिकल लिगंवीस्टीक्स’ (१९६०) ही पुस्तकेही त्यांनी भाषांतरित केली. मराठी विश्वकोशात त्यांनी अनेक लेख लिहिले.

      भाषेचा व बोलींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास व्हावा, असा डॉ. कालेलकरांचा आग्रह होता. भाषेच्या शुद्धाशुद्धतेच्या कल्पना बोलींच्या व पर्यायाने भाषेच्या विकासासाठी मारक आहेत, हे त्यांनी जागोजागी सांगितले आहे. बोलींच्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून भाषेला समृद्ध करावे, नवीन अवजड शब्द तयार करून नव्हे, असे त्यांचे मत होते. भाषेची परिवर्तनशीलता लक्षात घेऊन दर वीस-पंचवीस वर्षांनी भाषेच्या नियमांचा पुनर्विचार व्हावा असे ते म्हणतात. भाषा आणि समाज यांचा घनिष्ठ संबंध त्यांनी ठिकठिकाणी स्पष्ट केला आहे. भाषेचे स्वरूप, व्याकरण, साहित्य, लेखन आणि भाषा-संस्कृती-संबंध अशा अनेक विषयांवर त्यांनी विवेचन केले आहे. जिज्ञासू वाचकाला भाषाशास्त्राबद्दल सहजसोप्या भाषेत ओळख करून देतानाच भाषा व भाषाशास्त्र यांबद्दलच्या दुराग्रहांचा ते परखडपणे समाचार घेतात. व्याकरण शुद्धतेच्या कल्पनांमध्ये आणि पांडित्यामध्येच अनेक विद्वान अडकून पडले होते, अशा काळात शुद्ध भाषाशास्त्रीय दृष्टिकोनाचा आग्रह धरणारा दूरदृष्टीचा भाषाशास्त्रज्ञ म्हणून त्यांची कायम ओळख राहील.

ऋता पराडकर

कालेलकर, नारायण गोविंद