Skip to main content
x

कामत, रामदास शांताराम

रामदास शांताराम कामत यांचा जन्म गोव्यातील म्हापसा या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यातच झाले. वडील शांताराम कामत शास्त्रोक्त गायन शिकले नव्हते; पण त्यांना रागांची माहिती होती. त्यांचा आवाज पहाडी होता. १९३८ साली, वयाच्या सातव्या वर्षी ‘बेबंदशाही’ या नाटकात रामदास कामतांनी बालराजेंची भूमिका केली. या नाटकात त्यांना पाच वाक्ये व दोन गाणी होती. हे त्यांचे रंगभूमीवरील पहिले पदार्पण होते.

ते १९४९ साली मुंबईला आले. त्यांनी १९५३ साली  विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली. वडील बंधू उपेंद्र कामत यांच्याकडे त्यांनी काही काळ शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतले. उपेंद्र कामत हे मा.नवरंग नागपूरकर यांच्याकडे गाणे शिकत होते.

त्यांनी १९५३ पासून १९६० पर्यंत ए.जी. या सरकारी कार्यालयात नोकरी केली. त्यांनी १९६० पासून १९८९ पर्यंत ‘एअर इंडिया’मध्ये सुरुवातीला ट्रॅफिक असिस्टंट व नंतर मॅनेजर म्हणून नोकरी केली.

पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असलेल्या ‘मत्स्यगंधा’ या नाटकातून रामदास कामतांचे नाव विशेष प्रकाशात आले. यापूर्वी त्यांनी राज्य संगीत नाट्यस्पर्धेतून ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’तर्फे ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मृच्छकटिक’ आदी नाटकांतून भूमिका केल्या होत्या. तसेच आकाशवाणीवरून कोकणी गीतेही ते गात होते. सुरेल, स्वच्छ, मोकळा आवाज, स्पष्ट व भावपूर्ण शब्दोच्चार व आटोपशीर गाणे यांमुळे रसिक प्रेक्षकांची त्यांना पुरेपूर दाद मिळाली.

‘मत्स्यगंधा’ या नाटकामुळे साठ-सत्तरच्या दरम्यानचा तरुण प्रेक्षकवर्ग संगीत नाटकांकडे पुन्हा वळू लागला, यात पं. जितेंद्र अभिषेकींच्या संगीताबरोबरच रामदास कामत यांच्या गायनाचा वाटा निश्चितच आहे. त्यानंतर त्यांनी ‘ययाती देवयानी’, ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मीरा मधुरा’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘मदनाची मंजिरी’ या नाटकांतूनही भूमिका केल्या. तसेच ‘मानापमान’, ‘होनाजी बाळा’, ‘संन्याशाचा संसार’, ‘एकच प्याला’ अशा काही जुन्या नाटकांतूनही भूमिका केल्या.

नाट्यसंगीत गायनात त्यांना प्रामुख्याने पं. जितेंद्र अभिषेकींचे मार्गदर्शन झाले. याचबरोबर पं. गोविंदराव अग्नी, भालचंद्र पेंढारकर व प्रभाकर भालेकर यांचेही मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांना गोपीनाथ सावकारांचेही मार्गदर्शन सुरुवातीच्या काळात, स्पर्धेच्या नाटकाच्या वेळी लाभले होते. याचबरोबर बालगंधर्व, छोटा गंधर्व, दीनानाथ मंगेशकर इत्यादींच्या ध्वनिमुद्रिकांतील गायनाचाही  त्यांनी अभ्यास केला. कुणाचीही नक्कल न करता त्यांनी आपला स्वतंत्र ठसा नाट्यसंगीतात उमटवला.

रामदास कामतांची अनेक नाट्यपदे लोकप्रिय झाली. ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘नको विसरू संकेत मिलनाचा’ (मत्स्यगंधा), ‘यती मन मम मानीत या’, ‘तम निशेचा सरला’ (ययाती देवयानी), ‘मीरा मधुरा’मधील ‘प्रेम वरदान’, ‘आनंद सुधा’ ही वेगळ्या गायकी वळणाची पदे, ‘हे बंध रेशमाचे’मधील ‘काटा रुते कुणाला’ इत्यादी.

त्यांच्या पदांच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या व त्यांना लोकप्रियताही लाभली. नाट्यसंगीताबरोबरच यशवंत देवांनी संगीत दिलेली भक्तिगीते, मा. कृष्णराव यांच्या कन्या वीणा चिटको यांचे संगीत असलेली भावगीतेही त्यांनी गायली आहेत.

अ.भा. मराठी नाट्यपरिषदेचे मा. दीनानाथ सुवर्णपदक (१९८६), संगीतभूषण राम मराठे पारितोषिक, महाराष्ट्र शासन पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा बालगंधर्व गौरव पुरस्कार (१९९५), असे अनेक पुरस्कार व पारितोषिकांचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांना ५ नोव्हेंबर  २००८ रोजी सांगली येथे विष्णुदास भावे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ नोव्हेंबर २००८ रोजी बीड येथे झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. २०१४ साली महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला . २०१६ साली सह्याद्री वाहिनीतर्फे त्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

- माधव इमारते/ आर्या जोशी

कामत, रामदास शांताराम