कामटे, अशोक मारुतीराव
२६ नोव्हेंबर२००८ हा मुंबईच्या इतिहासातील एक काळा दिवस. संपूर्ण देशाला हादरा देणारा असा दहशतवादी हल्ला होता तो. या हल्ल्याचा प्रतिकार करताना देशाने अनेक लढवय्ये योद्धे गमावले. त्यांतीलच एक अशोक मारुतीराव कामटे होते. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातले हे कुटुंंब. आजोबा गणपतराव कामटे यांनी मुंबई प्रांताचे पहिले भारतीय इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून काम केले. वडील मारुतीराव कामटे भारतीय सैन्यात होते. अशा पिढ्यानपिढ्या देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या कुटुंबात अशोक कामटे यांचा जन्म झाला.
राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयातून १९७२-१९७७ या कालावधीत त्यांनी शिक्षण घेतले. १९८२ मध्ये त्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. १९८५ मध्ये सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथून त्यांनी पदवी मिळवली, तर दिल्ली येथील सेंट स्टिफन्स महाविद्यालयामधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८७मध्ये पेरू येथे झालेल्या कनिष्ठ पॉवर लिफ्टिंगमध्ये मध्ये अशोक कामटे यांनी भारताचे नेतृत्व केले होते. अशोक कामटे हे १९८९ सालच्या भारतीय पोलीस सेवेच्या महाराष्ट्र तुकडीतील अधिकारी होते. त्यांनी देशात अनेक ठिकाणी काम केले. सन १९९१ मध्ये भंडारा जिल्ह्यात त्यांची साहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. १९९४ ते २००८ या त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांत, पोलीस अधीक्षक, यूएन मिशन ऑफिसर, पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त अशा पदांवर काम केले. जून २००८ मध्ये त्यांची नियुक्ती अतिरिक्त म्हणून मुंबईतील पूर्व महामंडळावर झाली होती.
सांगली जिल्ह्यात नियुक्ती झाल्यानंतर थोड्याच कालावधीत कुख्यात गुंड राजू पुजारी पोलीस चकमकीत मारला गेला. धाडसी, करारी व्यक्तिमत्त्वाचे कामटे शांत स्वभावाचे होते. म्हणूनच अत्यंत बिकट परिस्थितीतसुद्धा ते शांतपणे आपले डावपेच तयार करत. याचा प्रत्यय २६ नोव्हेंबर २००८ रोजी प्रत्येक भारतीयाला आला. भंडारा जिल्ह्यासारखा नक्षलवादी भाग असो किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या शौर्याची गाथा ही युवकांना प्रेरणादायी आहे.
इंडी या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेलेे आमदार रविकांत पाटील यांना ऑगस्ट २००७ मध्ये अशोक कामटे यांनी अटक केली तेव्हा ते सर्वप्रथम प्रकाशझोतात आले. त्यावेळी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना ते म्हणालेे होते, “कायदा हा सर्वांना समान असतो. कोणालाही त्याचा भंग करण्याचा अधिकार नाही.”
२६नोव्हेंबर२००८ या दिवशी मुंबईतील गेटवे परिसरात काही दहशतवादी शिरले आणि त्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. एके-४७ सारखी अद्ययावत शस्त्रे, मुंबईतील विविध ठिकाणांचे इत्थंभूत नकाशे, सॅटेलाइट फोन अशी अद्ययावत सामग्री या दहशतवाद्यांकडे होती. या गंभीर व धीरोदात्त प्रसंगाला शांत डोक्याने, प्रसंगावधान राखून ज्या पोलीस अधिकार्यांनी तोंड दिले, त्यांतील अशोक कामटे हे एक होते. मुंबईच्या मेट्रो परिसरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अशोक कामटे हे हुतात्मा झाले.
अशोक कामटे यांनी त्यांच्या पोलीस दलातील कारकिर्दीत आपल्या भरीव कामगिरीने अनेक पुरस्कार मिळवले. १९९५मध्ये नक्षलवादविरोधी कारवायांसाठी ‘विशेष सेवा पुरस्कार’, १९९९मध्ये ‘संयुक्त राष्ट्र पुरस्कार’ आणि संयुक्त राष्ट्रासाठी ‘विदेश सेवा पुरस्कार’, २००५ मध्ये नक्षलवादविरोधी कारवायांसाठी ‘आंतरिक सुरक्षा पदक’ तर २००६ मध्ये ‘पोलीस पदक’, तर २००८ मध्ये मरणोत्तर ‘अशोकचक्र’ देऊन त्यांचा सन्मान केला गेला.