Skip to main content
x

कानिटकर, नारायण विनायक

         कोरडवाहू शेतीचा चालताबोलता विश्‍वकोश असणारे नारायण विनायक कानिटकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे दापोली तालुक्यातील पालशेत येथील असले; तरी त्यांचे वाडवडील चांदवड येथे स्थायिक झाले होते. कानिटकर यांचे बालपण पुणे येथील शनिवार पेठेतील आपटे वाड्यात गेले. ते १९०४मध्ये नूतन मराठी विद्यालयातून मॅट्रिक झाले. ते १९०५मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून प्रिव्हिअस व नवीन सुरू झालेल्या पुण्याच्या कृषी महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतून १९०९मध्ये बी.एजी. उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी ते डेमॉनस्ट्रेटर म्हणून कृषी महाविद्यालयात शिकवू लागले. ते १९१४मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.एस्सी. व १९२२मध्ये एम.एजी.उत्तीर्ण झाले. त्यांनी एम.एजी.संशोधनासाठी ‘जातेगाव बु.ता. शिरूर येथील जमिनी व कष्टकरी’ हा विषय घेेतला होता व डॉ.मॅन हे त्यांचे मार्गदर्शक होते. ते १९१९ ते १९२६पर्यंत पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी-रसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक होते. कानिटकर यांनी १९२६ ते १९३३ या काळात मृदाभौतिकी विशेषज्ञ म्हणून मांजरी येथे कोरडवाहू शेती संशोधनाचे काम केले. मांजरी येथील सुविधा व सोयी अपुर्‍या असल्यामुळे व दुष्काळी भागाचे अधिक प्रातिनिधिक ठिकाण म्हणून सोलापूरला कोरडवाहू संशोधन केंद्र सुरू करायचे ठरले. कानिटकर १९३०-३१मध्ये ७ महिन्यांच्या काळात अमेरिकेतील अरिझोना, उटाह, कॅन्सास, नेब्रास्का व कॅलिफोर्निया येथील कोरडवाहू शेती संशोधन पाहून आले. त्यांनी दिल्ली येथील इंपिरियल कृषी संशोधन परिषदेला सोलापूर व विजापूर येथे सुरू करावयाच्या कोरडवाहू संशोधन केंद्राचा प्रकल्प प्रस्ताव पाठवला. तो मंजूर होऊन निधी उपलब्ध झाल्यावर ऑक्टोबर १९३३मध्ये विजापूर व सोलापूरचे कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सुरू झाले आणि कानिटकर केंद्राचे प्रमुख संशोधक म्हणून तेथे रुजू झाले.

         कोरडवाहू प्रदेशाची व्याप्ती, हवामान, पर्जन्यमान व त्याची वैशिष्ट्ये, जमिनी व त्यांची वैशिष्ट्ये, मशागत व मशागतीची साधने, ज्वारी, बाजरीसारखी पिके व त्यांची शरीरक्रियाशास्त्रदृष्ट्या वैशिष्ट्ये, अवर्षणे,अपुरा व अनियमित पावसाचा सामना करून कोरडवाहू शेती यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते जमिनीवरील संस्कार व लागवडीचे फेरफार, पिकांचा लागवडीचा खर्च व फायदा अगर तोटा अशा सर्व अंगांनी त्यांनी कोरडवाहू शेतीचे संशोधन केले. पावसाचे पाणी व माती वाहून जाण्याचे मापन करण्यासाठी वाफे संशोधनासाठी आवश्यक सुविधा, प्रयोगशाळा, वेधशाळा अशा अनेक सोयी त्यांनी कष्ट घेऊन निर्माण केल्या. त्यांनी स्फूर्तिप्रद व अभ्यासपूर्ण नेतृत्व देऊन सहकाऱ्यांकडून काम करून घेतले. दख्खनच्या दुष्काळी भागाला संजीवनी ठरलेली ‘मुंबई कोरडवाहू शेती पद्धती’ या कामाचे फलित होय.

         डॉ. कानिटकर १९४२मध्ये सेवानिवृत्त झाले. भारतातील चार कोरडवाहू संशोधन केंद्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केल्यामुळे इंपिरियल कृषी संशोधन संस्थेने चारही केंद्रांच्या कामाचा समावेशक ग्रंथ लिहिण्याची त्यांना विनंती केली. ‘भारतातील कोरडवाहू शेती’ हा त्यांचा ग्रंथ भारतातील कोरडवाहू शेतीची ‘गीता’ ठरला व मुंबई विद्यापीठाने १९४५मध्ये या ग्रंथाबद्दल व त्यातील संशोधनाबद्दल त्यांना डी.एस्सी. पदवी दिली. डॉ. कानिटकर यांना १९४६-४७मध्ये मुंबई सरकारने जमीन सुधारणा समितीचे सदस्य नेमले.

         फलटण, कोल्हापूर व सावंतवाडी संस्थानांच्या आर्थिक पाहणी समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. ‘सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी’चे मासिक ‘शेती व शेतकरी’चे शेवटपर्यंत ते संपादक होते. त्यांनी शेतीचे संशोधन व शेतकर्‍यांच्या अभ्युदयाचा सातत्याने ध्यास घेतला होता. पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य (१९०७) व नंतर मुंबई प्रांताचे कृषि-संचालक असलेल्या डॉ. मॅन यांनी १९५८मध्ये नमूद केले आहे की, ‘त्यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या कामामध्ये सोलापूर केंद्रातील कोरडवाहू शेतीचे संशोधन हे सर्वोत्कृष्ट कार्य होय.’ सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र उभारण्यात डॉ. कानिटकर यांचा सिंहाचा वाटा होता, असे भारत सरकारचे निवृत्त कृषि-आयुक्त डॉ. डब्ल्यू बर्न्स यांनी म्हटले आहे.

         - डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

कानिटकर, नारायण विनायक