Skip to main content
x

कांबळे, शांताबाई कृष्णाजी

पूर्वाश्रमीच्या नाजुका (नाजाबाई) सखाराम बाबर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील (तालुका आटपाडी, मु. पो. करगणी) महूद या गावी झाला. या ठिकाणीच प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर पुणे येथे प्राथमिक शिक्षिका प्रशिक्षणाची २ वर्षे पूर्ण करून १९५२मध्ये त्या उत्तीर्ण झाल्या. प्राथमिक शिक्षिका म्हणून कुर्डूवाडी, आटपाडी, दिघंची, करगणी येथे अध्यापन केले. पुढे मुख्याध्यापिका, शिक्षणाधिकारी या पदापर्यंत प्रवास झाला.

दलित स्त्रीचे मराठी साहित्यातील पहिले आत्मकथन ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ त्यांनी लिहिले. या आत्मकथनाची भाषांतरे इंग्रजी, फ्रेंच, कानडी, हिंदी या भाषांमध्ये झाली. दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या हस्ते शनिवार वाड्यात संपन्न झाला. या आत्मकथनावर आधारित ‘नाजुका’ नावाची मालिका मुंबई दूरदर्शनवर सादर करण्यात झाली.

 ‘पूर्वा’ मासिकातून मार्च १९८३ पासून हे लेखन क्रमशः प्रसिद्ध होऊ लागले आणि १९८६ मध्ये पुस्तकरूपाने आले. ती केवळ दुःखाची गाथा नसून उत्कर्षाचीही कहाणी आहे. एका मनस्वी व्यक्तिमत्त्वाची ओळख यातून होते. नाजुका संवेदनशील आहे. समाजातील असमानतेचे दर्शन तिला लहानपणीच घडते. ‘ए, महाराच्या पोरे-- शिवशील.’ या शब्दांनी दुःख झाले असले, तरी त्याचा बडिवार माजवलेला नाही. ‘पंढरपूरला गेलो पण देवदर्शन घेतले नाही’ अशा काही गोष्टी तटस्थतेने येतात. पण पुढे-पुढे वागण्यात कणखरपणा आणि संयम यांचा समतोल त्यांनी दाखवला आहे. पतीला सोडायचे हा निर्धार त्या पाळतात, पण वेळ येताच सवतीच्या मुलांनाही आपलेसे करून त्यांची जबाबदारी उचलतात. आपल्या माहेरच्या व सासरच्या नातलगांची काळजी आपलेच कर्तव्य समजून मनापासून घेतात.

शिक्षिका झाल्यानंतर अर्थार्जनाचे साधन म्हणून नोकरीकडे न पाहता कर्तृत्व दाखवण्याची संधी हा आजच्या आधुनिक युगाच्या तरुणांचा विचार त्यांच्यात रुजला. त्यामुळे शाळेचा निकाल १०० टक्के लागावा, प्रौढ साक्षरता वर्ग चालवावे, शाळा जास्तीत जास्त चांगली, मोठी व अधिक सुविधा असणारी असावी, या दृष्टीने त्या प्रयत्नशील राहिल्या. पुढे ‘शिक्षण विस्ताराधिकारी’ झाल्यावर आपल्या अनुभवांचा फायदा त्या इतरांना देतात. छोटे-छोटे बदल करूनही आपण काय-काय करू शकतो, त्याची जाणीव करून देतात.

सुरुवातीच्या काळातल्या हाल-अपेष्टा, जातीनुसार आलेल्या कामांचे, देव-देवरुषी यांच्यावरील अंधश्रद्धेमुळे झालेल्या नुकसानीचे वेदनादायक चित्रण त्यांच्या आत्मकथनात येते. पण सहानुभूती मिळावी ही अपेक्षा न ठेवता मोजक्या रेषांनी काढलेली ती अनुभवांची चित्रे वाटतात. आजारात कोंबडा उतरवून टाकण्याऐवजी डॉक्टरी मदत घेण्याचे निर्णय शिक्षणामुळेच ठामपणे घेता आले. त्यात त्या यशस्वी झाल्या आणि त्यांनी इतरांसमोर आदर्श ठेवले. अशा लहान-सहान प्रसंगांद्वारेच त्या स्वतःच्या मानसिक आणि बौद्धिक उन्नयनाची जाणीव करून देतात.

१९३० ते १९५० ह्या सुमाराचे ग्रामीण जग कसे होते, त्याचे ठसठशीत दर्शन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य होय. समाजाचा गाडा कसा चालतो, देव-देवरुषी यांचा पगडा, तुलनेने स्वस्ताई असूनही अन्नाच्या दाण्या-दाण्याला पारखा झालेला गोर-गरीब, ढोरफाडीचे नियम, त्यातली हिस्सेदारी, पोलिसांची अरेरावी, जातीच्या-गावाच्या न्यायपद्धती, देवळात प्रवेश नसूनही विठ्ठलाची ओढ, त्याच्या वारीला यथाशक्य जाणे, मुसलमानांच्या पिराला नवस बोलणे, गरिबांच्या घरांच्या रचना, त्यातले सामान, पावसाळ्यात त्यांच्या वाढणार्‍या हालअपेष्टा, जातीयतेचे दृश्य स्वरूप, विद्यार्थी गळतीचे कारण, रोगराई, पिराला मलिदा देणे अशा सर्व तर्‍हांच्या विषयांना प्रसंगानुरूप स्पर्श करून त्या काळाचे कोरीव चित्र शांताबाईंनी साकार केले आहे, तेही अल्पाक्षरी शैलीत, संयमाने.

शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे हृदय कमजोर असूनही त्या नोकरीचा राजीनामा देत नाहीत आणि आपल्या तिन्ही मुलांना उत्तम शिक्षण देतात. मुलेही कष्टाचे चीज करतात. मोठा मुलगा धाकट्यांच्या शिक्षणाला मदत करतो. पतीचे चित्रणही ‘चरित्र’ म्हणून न येता ओघाओघात जसे आले तसे केले आहे. पतीच्या सुरुवातीच्या वागणुकीबद्दल अतिशय तटस्थपणे बाई बोलतात. पण पुढे त्यांचा सहभाग, त्यांचे कलावंतपण तितक्याच सहजपणे सांगतात.

आत्मकथनातील सुरुवातीचे निवेदन त्यांच्या बोली भाषेत असले, तरी पुढे त्यांनी प्रमाण बोलीचा वापर केला आहे. विलक्षण साधी, निरलंकृत आणि अल्पाक्षरी शैली आहे. याबद्दल पु. ल. देशपांडे म्हणतात, “लिळाचरित्रासारख्या महानुभावांच्या ग्रंथातल्या शैलीशी जुळणारी वाटते.”

- प्रा. मीना गुर्जर

 

कांबळे, शांताबाई कृष्णाजी