Skip to main content
x

कांगा, जमशेदजी बेहरामजी

     जमशेदजी बेहरामजी कांगा यांचा जन्म पुणे येथे झाला. एकूण चौदा भावंडांमध्ये ते सर्वात धाकटे होते. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन उच्च माध्यमिक शाळेमध्ये झाले आणि पुढे  महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथील विल्सन महाविद्यालयामध्ये झाले. एम.ए. आणि एलएल.बी. या पदव्या मिळवल्यानंतर नोव्हेंबर १९०३मध्ये कांगा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत वकिली सुरू केली. तेव्हाचे मुंबई प्रांताचे अ‍ॅडव्होकेट-जनरल सर बेसिल स्कॉट यांच्या चेंबरमध्ये त्यांनी सुरुवातीस काम केले. त्या काळात जेव्हा प्रत्यक्ष काम नसेल तेव्हा ते प्रिव्ही कौन्सिलचे आणि भारतातील विविध उच्च न्यायालयांचे निर्णय वाचीत असत व त्यांचा अभ्यास करीत. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. काही वर्षांतच त्यांचा वकिलीत जम बसला आणि न्यायालयांच्या निर्णयांचे (केस लॉ) अफाट ज्ञान असलेले व कसलेले वकील अशी त्यांची ख्याती झाली.

     १९२१मध्ये कांगा यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. परंतु सुमारे दीड वर्षांनंतर, म्हणजे १९२२मध्ये ते न्यायासनावरून पायउतार झाले आणि त्यांची नियुक्ती मुंबई प्रांताचे अ‍ॅडव्होकेट जनरल म्हणून झाली. मुंबई प्रांताचे ते पहिले भारतीय अ‍ॅडव्होकेट-जनरल होत. न्यायाधीशपद सोडून अ‍ॅडव्होकेट  जनरलचे पद स्वीकारण्याचे हे पहिले आणि बहुधा एकमेव उदाहरण आहे. १९३५मध्ये वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर कांगा अ‍ॅडव्होकेट-जनरलपदावरून निवृत्त झाले.

     तथापि त्यानंतरही तीस वर्षांहून अधिक काळ ते वकिली करीत होते. सुमारे पासष्ट वर्षे सलग वकिली करीत असल्याने त्यांना मुंबईच्या वकीलवर्गाचे भीष्मपितामह (डॉयेन ऑफ द बॉम्बे बार) असे सार्थपणे संबोधण्यात येई. नंतर प्रसिद्धीस आलेल्या अनेक नामांकित वकिलांनी आणि न्यायाधीशांनी आपल्या वकिलीची सुरुवात कांगा यांच्या चेंबरमध्ये केली होती. एच.एम.सीरवाई, नानी पालखीवाला, फली नरिमन आणि सोली सोराबजी, त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश न्या.हरिलाल कानिया ही त्यांपैकी सर्वश्रेष्ठ नावे म्हणता येतील.

     कांगा यांचे पहिल्यापासून व्यापारविषयक व करविषयक कायद्यावर, विशेषत: आयकर कायद्यावर, विशेष प्रभुत्व होते. त्यांचे शिष्य नानी पालखीवाला यांनीही आपल्या गुरूंचे अनुसरण करीत या क्षेत्रात (व अर्थातच घटनात्मक कायद्याच्या क्षेत्रात) नेत्रदीपक कामगिरी केली. १९५०मध्ये पालखीवाला यांनी आयकर कायद्यावर एक पुस्तक लिहिले आणि त्यावर स्वत:च्या नावाच्या आधी कांगा यांचे नाव असावे, अशी विनंती कांगा यांना केली. कांगा यांनी ती मान्य केली. ही पालखीवालांनी कांगांना दिलेली एक आगळीवेगळी गुरुदक्षिणाच होती, असे म्हणता येईल. तेव्हापासून गेली साठ वर्षे ‘कांगा अ‍ॅण्ड पालखीवाला ऑन इन्कम टॅक्स’ हा भारतीय आयकर कायद्यावरील प्रमाणभूत ग्रंथ म्हणून  जगभरात मान्यता पावला आहे. त्याच्या नव्या सुधारित आवृत्त्या नियमितपणे निघतात.

     १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारताच्या संरक्षण खर्चाची भारत आणि ब्रिटन यांच्यात विभागणी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला होता. त्या आयोगासमोर भारताची बाजू कांगा यांनी मांडली होती. कांगा यांना इंग्रजी व फारसी (पर्शियन) साहित्याची आवड होती. फारसीवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांना चौर्‍याणव्या वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. शेवटपर्यंत त्यांची प्रकृती उत्तम होती, बुद्धी तल्लख होती व स्मरणशक्तीही पहिल्याइतकीच तीव्र होती.

- शरच्चंद्र पानसे

संदर्भ
१. बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९६९.
कांगा, जमशेदजी बेहरामजी