Skip to main content
x

कांटावाला, रमणलाल माणेकलाल

    मणलाल माणेकलाल कांटावाला यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण कँबे हायस्कूलमध्ये झाले आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादचे गुजरात कॉलेज आणि मुंबईचे एल्फिन्स्टन कॉलेज येथे झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून ते बी.ए.ची परीक्षा गणित विषय घेऊन विशेष गुणवत्तेसह प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले आणि त्यांना दक्षिणा फेलोशिप मिळाली. त्यानंतर त्यांनी एम.ए.ची पदवी आणि शासकीय विधि महाविद्यालयामधून एलएल.बी. पदवीही विशेष गुणवत्तेसह प्रथम वर्गात संपादन केली. १९४१ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. १९४३ मध्ये मूळ शाखेच्या अ‍ॅडव्होकेट परीक्षेत ते सर्वप्रथम आले. त्या वर्षी त्यांच्याबरोबर ही परीक्षा देणाऱ्यांत आर. जे. जोशी, बी. जे. दिवाण, जी. ए. ठक्कर आणि आर. एल. दलाल वगैरे मंडळी होती, तर परीक्षकांमध्ये एस. व्ही. गुप्ते, एच. एम. सीरवाई आणि एस. टी. देसाई अशी मंडळी होती.

     सप्टेंबर १९४३ मध्ये कांटावाला मूळ शाखेत वकील म्हणून रुजू झाले. अगोदर ते एन.एच.भगवती यांच्या चेंबरमध्ये काम करीत; भगवती उच्च न्यायालयावर गेल्यावर ते एम.पी.अमीन यांच्या चेंबरमध्ये काम करू लागले. मौजेची गोष्ट अशी की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होईपर्यंत कांटावाला अमीन यांच्या चेंबरमध्येच काम करीत होते. एम.पी.अमीन मध्यंतरी अनेक वर्षे मुंबई राज्याचे अ‍ॅडव्होकेट-जनरल असल्याने कांटावाला यांना राज्य सरकार,केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम या सर्वांच्या विविध स्वरूपाच्या कामाचा अनुभव मिळाला. त्यांनी मुख्यत: मूळ शाखेत काम केले. ९ फेब्रुवारी १९६२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कांटावाला यांची नियुक्ती झाली. ६ फेब्रुवारी १९६४ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. २७ ऑक्टोबर १९७२ रोजी त्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून झाली. ५ ऑक्टोबर १९७८ रोजी ते सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले.

     न्या.कांटावाला मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतानाच जून १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाली. आणीबाणी आहे, या कारणाखाली घटनेने हमी दिलेले नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा हक्क हाही एक मूलभूत हक्क आहे; तोही स्थगित केला गेला. सभा घेण्यावर बंदी घालण्यात आली होती व वृत्तपत्रांवर ‘सेन्सॉरशिप’ लादण्यात आली. या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी अनेक वकिलांनी व निवृत्त न्यायाधीशांनी ऑक्टोबर १९७५ मध्ये एक खाजगी सभा आयोजित केली. या सभेचे निमंत्रक मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या.एन.पी.नाथवानी हे होते. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सभेवर बंदी घातली. न्या.नाथवानी यांनी या बंदीविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली. न्या.कांटावाला आणि न्या.तुळजापूरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आणीबाणी लागू असल्याने व राष्ट्रपतींनी सर्व मूलभूत हक्क स्थगित केलेले असल्याने, सभाही घेता येणार नाही व न्यायालयात दादही मागता येणार नाही, असा युक्तिवाद सरकारने केला. तो पूर्णत: अमान्य करून, आणीबाणी लागू असली आणि मूलभूत हक्क स्थगित असले, तरीही सभा घेता येईल व दादही मागता येईल, असा सुस्पष्ट निर्णय न्या.कांटावाला व न्या.तुळजापूरकर यांनी दोन स्वतंत्र निकालपत्रांद्वारे देऊन, पोलीस आयुक्तांनी सभेवर घातलेली बंदी रद्द केली.

     याव्यतिरिक्तही न्या.कांटावाला यांच्यासमोर अनेक महत्त्वाचे खटले आलेे आणि त्यांचे  त्यांनी अचूक निर्णय दिले. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निवडणुकीविरुद्ध स. का. पाटील यांनी दाखल केलेला दावा हा असा एक खटला. लंडनमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाने एका पोलिश (पोलंड देशातील) मुलीशी लग्न केले होते, त्याने घटस्फोटासाठी लावलेला दावा हा दुसरा असाच महत्त्वाचा खटला. प्रश्न किंवा वाद कोणताही असला, तरी न्या. कांटावाला त्याच्या मुळाशी जाऊन त्याची अलगद सोडवणूक करीत.

     डिसेंबर १९७६मध्ये राज्यपाल अलीयावर जंग यांचे निधन झाले. त्यावेळी काही महिने आणि नंतर एकदा काही काळ, असे दोन वेळा न्या.कांटावाला यांनी हंगामी राज्यपाल म्हणून काम पाहिले. न्या.कांटावाला यांना गणिताप्रमाणेच भारतीय तत्त्वज्ञानाची आवड होती. संपूर्ण भगवद्गीता त्यांना मुखोद्गत होती.

- शरच्चंद्र पानसे

कांटावाला, रमणलाल माणेकलाल