Skip to main content
x

काटदरे, माधव केशव

कवी माधव

 

माधव केशव काटदरे यांनी ‘कवी माधव’, ‘एक खेळगडी’, ‘एम.के.के.’, ‘जामदग्न्य’, ‘बाळू’, ‘यशवंताग्रज’, ‘रमाकान्त’, ‘हंस कृष्ण इन्द्रसेन’ अशी टोपण नावे घेतल्याचे आढळते. मात्र ‘कवी माधव’ या नावाने ते ओळखले जातात. माधव काटदरे यांचे प्राथमिक शिक्षण प्रथम घरी व मग गुहागर, हेदवी येथे झाले. इंग्रजी चौथीपासून पुढे ते रत्नागिरी हायस्कूलमध्ये शिकले. १९११ साली ते स्कूल फायनल परीक्षा पास झाले.

मुंबईत किंग जॉर्ज शाळेत वर्षभर ते शिक्षक होते व नंतर त्यांनी कस्टममध्ये नोकरी केली. निवृत्तीनंतर १९४२पासून ते चिपळूणला स्थायिक झाले. कवी माधवांचे कवी, इतिहासाभ्यासी लेखक, बालसाहित्यकार म्हणून मराठीला विशेष योगदान आहे. प्राथमिक शाळेत असतानाच काव्याचे व्यासंगी शिक्षक माधवराव जोगळेकर यांच्यामुळे त्यांना संस्कृत-मराठी काव्याची गोडी लागली. पुढे वॉल्टर स्कॉटच्या ऐतिहासिक कवितेचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला, की कवी माधवांनी शालेय जीवनातच ऐतिहासिक कविता लिहिण्याचा संकल्प केला. नोकरीव्यतिरिक्त बाकीच्या वेळात ते केवळ साहित्यात रमले. व त्यांनी स्वत:चा ग्रंथसंग्रह वाढविला.

न्यायमूर्ती रानडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाकडे पाहण्याची जी नवी दृष्टी दिली, ती कवी माधवांनी, काव्यरचना करताना अंगीकारली. बालकवींचे निसर्गप्रेम, विनायकांचा ओजस्वी देशाभिमान, गोविंदाग्रजांच्या भाषेचा शाहिरी थाट यांचा प्रभाव त्यांच्या काव्यावर झाला व यातून त्यांनी स्वत:ची स्वतंत्र शैली तयार केली.

कवी माधवांची भाषा जुन्या बखरी, शाहिरी कविता, प्राचीन वाङ्मय यांच्या अभ्यासाने समृद्ध झाली. त्यांच्या कवितेतील शब्दयोजना अर्थवाही, वेधक व वेचक आहे. गतइतिहासातील ओजस्वी प्रसंगचित्रणांत व स्फूर्तिदायी चरित्रवर्णनांत त्यांची कविता अधिक फुलली, रमली. चित्रदर्शी शैली व शाहिरी थाटाची काव्यशैली ही त्यांच्या कवितेतील खास वैशिष्ट्ये सांगता येतील.

 ‘ध्रुवावरील फुले’ (१९१५), ‘फेकलेली फुले’(१९२१), ‘कवी माधव यांची कविता’ (१९३५- संपादन ह.वि. मोटे), ‘गीतमाधव’ असे चार स्फुटकवितासंग्रह प्रकाशित झाले. १९१० साली बाजीप्रभूंवर, १९१७ला शिवराज स्तवन, अखेरचा संग्राम, बापू गोखल्यांच्या पराक्रमावर ‘गोकलखा’, घेरियाची लढाई ही त्यांची सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक काव्ये आहेत. ‘सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण’ ही त्यांची गाजलेली कविता होय. शिवकालीन रायगड, शाहूंचे दक्षिणेत आगमन, शाहूराजाचा उमराव, तारापूरचा संग्राम, आंग्य्रांचे आरमार, जिवबाबाबा बक्षी, सवाई माधवरावाचा मृत्यू, रावबाजींचे राज्यदान असा मराठ्यांचा इतिहास त्यांनी सलगपणे काव्यांत चित्रित केला आहे.

विश्वकवी टागोरांच्या सात कवितांचा अनुवाद, ऋग्वेदातील सुक्तांना काव्यरूप, गोल्डस्मिथच्या स्कूलमास्टरवरून लिहिलेली ‘तात्या पंतोजी’ या त्यांच्या अनुवादित रचना उल्लेखनीय आहेत. का.रा. पालवणकरांच्या खेळगडीतील लोककथा, अद्भुतकथा, गोष्टी, कविता, तसेच ‘पाजव्याचा पराक्रम व इतर गोष्टी’, ‘ऊठ सोट्या! तुझेच राज्य’, ‘डोंगरातील काका व इतर गोष्टी’, ‘पर्‍यांची देणगी व इतर गोष्टी’, ‘सोनसाखळी व इतर गोष्टी’, ‘तीन रणयोद्धे’ इत्यादी चित्ताकर्षक बालवाङ्मय प्रसिद्ध आहे. हंस कृष्ण इंद्रसेन या टोपणनावाने त्यांनी हॅन्स अँडरसनच्या परीकथांची भाषांतरे ही मासिक ‘मनोरंजन’मधून प्रसिद्ध केली.

त्यांनी भारताच्या प्राचीन व मध्ययुगाचा अभ्यास करून संस्कृत वाङ्मय, शिलालेख, नाणी यांवर, ‘भासकवी आणि त्याचा राजसिंह’, ‘बालकवी व त्याचा हर्षदेव’, ‘भवगूती’, ‘कालिदास व त्यांचा विक्रमादित्य’, ‘सुवर्णयुगातील सम्राट’ असे लेख ‘रत्नाकर’ व मासिक ‘मनोरंजन’मधून लिहिले. आयुष्यभर कवी माधवांनी इतिहासाप्रमाणे लोकवाङ्मयाचाही व्यासंग केला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाङ्मयक्षेत्रातील पंथ-संप्रदायगट यांपासून ते सदैव अलिप्त राहिले. एक यशस्वी ऐतिहासिक कवी म्हणून महाराष्ट्राच्या कविमंडलात त्यांना गौरवाचे स्थान प्राप्त झाले आहे.

- प्रा.संध्या टेंबे

 

काटदरे, माधव केशव