किंजवडेकर, वामनशास्त्री रामचंद्र
वामनशास्त्री रामचंद्र किंजवडेकर यांचा जन्म पणजी येथे झाला. बालपणीच मातापित्यांचे छत्र हरपल्याने बालपण हालात गेले. कष्टांवर मात करून जेथे मिळेल तेथून शिक्षण घेतले. तेवीसाव्या वर्षांपर्यंत व्याकरण, न्याय, वेदान्त या संस्कृत अभ्यासशाखांमध्ये प्राविण्य मिळवले. बंगळुर संस्कृत महाविद्यालयाचे थोर मीमांसक पंडित वैद्यनाथशास्त्री यांच्याजवळ पूर्वमीमांसा या यज्ञयागाचे विश्लेषण करणाऱ्या शास्त्राचे सखोल व सांगोपांग अध्ययन केले व यातील ‘मीमांसकशिरोमणी’ आणि ‘सरस्वतीभूषण’ या उच्च पदव्या मिळवल्या.
पूर्वमीमांसेच्या सखोल अध्ययनाने त्यात आवड निर्माण झाल्याने मीमांसाशास्त्राचे अध्ययनदृष्ट्या व प्रत्यक्ष पुनरूज्जीवन करुन यज्ञयागांना पुन्हा एकदा स्थान प्राप्त करून देणे हे ध्येय त्यांनी समोर ठेवले. यज्ञयागातील प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी नागपूर येथे १९१५ साली सोमयाग व १९३४ मध्ये कुरूंदवाड येथे आप्तोर्यामयाग असे दोन याग करविले. त्यांचे पूर्ण निरीक्षण करून मीमांसाशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले व संपादित केले. आधानपद्धती, पश्वालंभनमीमांसा, आप्तोर्यामयाग, संस्कारमीमांसा ही त्यातील काही महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत.
पूर्वमीमांसाशास्त्राचा प्रसार म्हणजे यज्ञयागात रूची निर्माण करुन ते इतरांना शिकवणे होय. पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात (तेव्हाचे न्यू पूना कॉलेज) पं. वामनशास्त्री संस्कृत शिकवीत.
महाविद्यालयात म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर फर्गसन कॉलेजात संस्कृत शिकवायला होते. पूर्वमीमांसेचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी शिक्षण प्रसारक मंडळीने पं. वामनशास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली मीमांसा विद्यालयाची स्थापना केली.
पं. वामनशास्त्रींनी महाराष्ट्रभर हिंडून विद्यालयाची इमारत, ग्रंथशाळा यासाठी निधी जमा केला. तेथे अग्निहोत्र सतत चालू राहावे यासाठी एक ठेवही ठेवली. विद्यालयात पूर्वमीमांसेच्या अध्यापनाबरोबर हिंदू धर्मशास्त्रातील प्रश्नांची उकल व्हावी यासाठी एका विद्वत्परिषदेची स्थापना केली. या विद्वत्परिषदेचे अध्यक्ष म. म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर होते. अग्निहोत्र चालवण्यासाठी व मीमांसाशास्त्राच्या अध्ययनासाठी उपयुक्त पुस्तके त्यांनी लिहिली. पुण्याच्या आनंदाश्रम संस्थेने ती प्रसिद्ध केली. या पुस्तकांचा परिचय व्हावा यासाठी पं. वामनशास्त्रींनी केसरीमधून लेखही लिहिले.
त्यावेळी महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठ हे एकच विद्यापीठ होते. संस्कृत एम. ए. साठी मीमांसाशास्त्र हा एक अभ्यासविषय असावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना यश येऊन मुंबई विद्यापीठाने मीमांसाशास्त्र हा विषय एम. ए. साठी नव्याने सुरू केला. अभ्यासासाठी नेमलेला कुमारिलभट्टांचा तंत्रवार्तिक हा आधारग्रंथ दुर्मीळ होता. ग्रंथाचे संपादन त्यांनी पं. सुब्बावधानीशास्त्री यांच्या मदतीने केले, कारण पं. वामनशास्त्रींना मीमांसा विद्यालयासाठी निधी जमा करण्यासाठी फिरावे लागे. त्यांना ग्रंथाच्या संपादनासाठी वेळ देता येत नव्हता. तंत्रवार्तिकाचे हे ग्रंथ आनंदाश्रम संस्थेने प्रकाशित केले.
मीमांसा विद्यालयाला १९३४ पासून अध्ययन- अध्यापन केंद्र म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे विद्यार्थिसंख्याही वाढत गेली. दूरदूरच्या गावांहून विद्यार्थी येत. यात परदेशी विद्यार्थी देखील होते. फ्रँकलीन एजर्टन यांनी पं. वामनशास्त्रींकडे शिकून मीमांसान्यायप्रकाश हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याच्या प्रस्तावनेतून पं. वामनशास्त्री किती विद्वान होते हे लक्षात येते. ते संस्कृतमधूनच विद्यार्थ्यांना शिकवीत असत.
त्यांनी मीमांसा विद्यालयाच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात ‘मीमांसाप्रकाश’ नावाची पत्रिका काढण्याचा प्रयत्न केला. तसेच मीमांसाविषयक पुस्तके, प्रकाशित करण्यासाठी स्वत:ची प्रकाशनसंस्था काढली. पण हे दोन्ही प्रयत्न असफल ठरले.
अखिल भारतीय संस्कृत विद्यापीठ असावे अशी त्यांची इच्छा होती. यासाठी लाहोर येथील पं. भंडारी यांच्या साहाय्याने समाजाचा पाठिंबा मिळण्यासाठी प्रयत्न केले. अशा सततच्या प्रवासात त्यांना थंडीची बाधा झाली. उपचारांकरिता त्यांना मिरज येथील दवाखान्यात ठेवले. पण तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
मीमांसाशास्त्राचे पुनरूज्जीवन हे ध्येय पं. वामनशास्त्रींनी ठेवले. मीमांसा विद्यालयाची स्थापना व उत्कर्ष, मुंबई विद्यापीठामध्ये मीमांसाशास्त्र हा संस्कृत एम. ए. साठी एक अभ्यासविषय अशा मार्गांनी त्यांची धैयपूर्ती झाली.