Skip to main content
x

कनोडिया, नयना

       व्या पिढीतली स्त्री-चित्रकार म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या नयना कनोडिया या चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या स्वयंशिक्षित चित्रकार आहेत. त्यांच्या आईचे नाव सरला व वडिलांचे नाव मोहनप्रकाश गोयल असून त्यांचा विवाह १९७० मध्ये विजय कनोडिया यांच्याशी झाला. ‘नाईव्ह आर्ट’ या प्रकाराचे मूळ भारतात रुजवणार्‍या त्या पहिल्या चित्रकार होत. नयना कनोडियांचा सुरुवातीचा वास्तव्याचा आणि शिक्षणाचा काळ दिल्लीमध्ये व्यतीत झाला.

       नवी दिल्ली येथील लेडी श्रीराम कॉलेजातून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये विशेष श्रेणी मिळवून पदवी प्राप्त केली. त्यांना भारत सरकारची शिष्यवृत्तीही मिळाली. मात्र, नयना कनोडिया यांनी अर्थशास्त्रामध्ये आपली पुढील करिअर न करता आपल्या छंदविषयाला, पेंटिंगला आपली पूर्णवेळेची करिअर बनवण्याचा निश्‍चय केला. प्रसिद्ध स्त्रीचित्रकार अंजली ईला मेनन यांच्याकडे त्यांनी चित्रकारितेची वर्षभर केलेली उमेदवारी सोडली तर पेंटिंगचे इतर कोणतेही प्रशिक्षण नयना कनोडियांनी घेतलेले नाही.

       त्यांनी १९८६ मध्ये स्वत:च्या चित्रांचे पहिले स्वतंत्र प्रदर्शन मुंबईच्या सिमरोझा आर्ट गॅलरी आणि त्यानंतर दिल्लीच्या ललित कला अकादमीमध्ये भरवले. त्यानंतर देश-परदेशांमध्ये त्यांनी अनेक स्वतंत्र, तसेच एकत्रित प्रदर्शने भरवली. आतापर्यंत स्वतंत्र प्रदर्शनांपैकी दहा प्रदर्शने भारतात आणि सहा प्रदर्शने परदेशांमध्ये भरवली गेली आहेत.

       मुख्यत्वे मानवाकृतिप्रधान (फिगरेटिव्ह) शैलीतली चित्रे काढणाऱ्या नयना कनोडियांच्या चित्रांमधून अनघड (नाईव्ह) स्वरूपाच्या भारतीयत्वाचा नाजूक आविष्कार उमटलेला दिसतो. स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे बदलत गेलेले स्वरूप नयना कनोडियांच्या चित्रांमधून दृग्गोचर होत जाताना दिसते. पाश्‍चात्त्य प्रभावाचा परिणाम होत असतानाही आपल्या भारतीयत्वाचे मूळ जपण्याचा प्रयत्न करणारी नवी पिढी कधी सहानुभूतीच्या, तर कधी उपहासात्मक चित्रणातून नयना कनोडिया आपल्या कॅनव्हासवर रंगवतात. शहरी आयुष्याचे प्रतिबिंब या चित्रांमधून यथार्थतेने उमटते. त्यांच्या चित्रांमध्ये प्रसिद्ध व्यक्तींच्या रूपरेखा दिसतात, शहरी भागांमध्ये नावलौकिक मिळालेल्या सेलिब्रिटिजच्या प्रतिमा दिसतात आणि साधीसुधी, रस्त्यावर नेहमी दिसणारी माणसेही दिसतात.

       त्यांच्या चित्रांमध्ये अनेकरंगी बाजार असतो, वाहने असतात, समुद्रकिनाऱ्यावरचे वातावरण असते, तर कधी आजच्या आणि पूर्वीच्या जीवनशैलीचे चित्रण असते, कधी प्राचीन खेळ असतात. त्यांच्या चित्रांमधून होत असलेला आविष्कार हा स्वयंशिक्षणामुळे आलेल्या मर्यादा व कलाशिक्षणाच्या संस्कारांपासून मुक्त अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळेच त्यांच्या चित्रांचे स्वरूप ‘नाईव्ह’ आर्ट या प्रकाराकडे झुकलेले दिसते.

       झळाळते, शक्तिमान रंगलेपन हे त्यांच्या चित्रांचे जाणवणारे वैशिष्ट्य. रंगांच्या जाड थरांनी चित्र रंगवण्याच्या त्यांच्या शैलीमधून जीवनाचे विविध पदर उलगडत जातात. लंडनच्या कॉमनवेल्थ इन्स्टिट्यूटतर्फे भरवल्या गेलेल्या कॉमनवेल्थ देशांमधल्या चित्रकारांच्या प्रदर्शनामध्ये त्यांच्या चित्राची निवड झाली. लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमनेही त्यांना चित्रकलेच्या प्रात्यक्षिकाकरिता आमंत्रित केले होते.

       तरुण चित्रकारांना स्वयंस्फूर्तीने चित्र काढण्याकरिता प्रोत्साहन मिळावे या हेतूने नयना कनोडिया देशात आणि परदेशात सातत्याने चित्रशिबिरांत सहभागी होतात. नयना कनोडिया या विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य मुंबईत आहे.

- शर्मिला फडके

कनोडिया, नयना