Skip to main content
x

कंगले, रमाकांत पंढरीनाथ

         नाशिक जिल्ह्यातील येवले या गावी रमाकांत पंढरीनाथ कंगले यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे पार पडले व उच्च शिक्षण - संस्कृत वाङ्मय पारंगत एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई येथून एम.. पदवीचे प्रथम श्रेणीतील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी  पूर्ण केले. शिक्षणानंतर उपजीविकेसाठी १९२३ ते १९५४ या कालखंडात ते सरकारी महाविद्यालयातून संस्कृत अध्यापक म्हणून कार्यरत राहिले. अध्यापन क्षेत्रातील कार्यबाहुल्यामुळे व अध्ययनाच्या गोडीमुळे निवृत्तीनंतर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखनकार्याला सुरुवात केली. त्यांच्या लेखनकार्यातून अनेक विद्वत्तापूर्ण पुस्तकरूपी रत्ने संस्कृत खाणीत विराजमान झाली.

. कालिदासांची नाटके’ (१९५७), . प्राचीन भारतीय राजनीती’ (१९६९), . रसभावविचार’ (१९७२), . दशरूपकविधान’ (१९७४), . प्राचीन काव्यशास्त्र’ (१९७४), . कौटिलीय अर्थशास्त्र’ (१९८२), . सर्वदर्शनसंग्रह’ (१९८५), . उद्भट आणि त्यांचा काव्यालंकार सारसंग्रह’ (१९८७).

कंगले यांच्याकडे जर्मन, फ्रेंच, रशियन व इटालियन इ. भाषांचे ज्ञान होते, तर संस्कृतचे ते व्यासंगी ज्ञानोपासक होते. इंग्रजी भाषेवरच नव्हे, तर मराठीवरही त्यांचे प्रभुत्व अप्रतिम होते हे त्यांच्या लेखन साहित्याकडे बघितले की जाणवते.

कालिदासांची नाटकेनामक पुस्तकामध्ये कालिदास रचित सर्व नाटकांचा म्हणजे मालविकाग्निमित्रम्’, ‘अभिज्ञानशाकुंतलम्विक्रमोर्वशीयम् यांचा समावेश आहे. त्यामध्ये कवीविषयक माहिती, कालिदास रचित सर्व नाट्यांचे कथानक, नाट्यातील पात्रांचे स्वभाव, गुणवैशिष्ट्य, तसेच वाङ्मयीन टीका अशा प्रकारे नाट्यकुसुमांचे रसभरित सौंदर्यास्वाद व विवेचनात्मक वर्णन दिसते.

प्राचीन काव्यशास्त्रयात प्राचीनतम असलेल्या काव्यशास्त्र विषयक विविध पैलूंवर प्रकाश टाकत संस्कृत साहित्यशास्त्रविषयक निर्माण झालेल्या अनेक प्रश्न व तत्त्वांविषयी यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राचीन काव्यशास्त्राचे स्वरूप व मर्यादा यांच्याबाबत विचारमंथन करीत असताना व तौलनिक दृष्टिकोनातून मांडताना आवश्यक तेथे पाश्चात्त्य विचारांनाही  त्यांनी प्राधान्य दिले. कौटिलीयम् अर्थशास्त्रम्या प्राचीन संस्कृत ग्रंथावर प्रा. कंगले यांनी मूळ संहितेसह इंग्रजी भाषांतर आणि अभ्यासकोपयोगी विवेचक प्रस्तावना व टीपायुक्त राजनीतीपर ग्रंथाची निर्मिती केली. या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ग्रंथाचे इंग्रजी व मराठी असे दोन्ही भाषांमधून अनुवाद झाले. विषयाच्या सखोलतेसह काटेकोर, अभ्यासपूर्ण विचारांच्या मुद्देसूद मांडणीमुळे या ग्रंथाची मूळ संहिता, टिपा व इंग्रजी भाषांतरासह त्रिखंडात्मक आवृत्ती १९६०-१९६५ मध्ये मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केली. या ग्रंथावर आधारित प्राचीन भारतीय राजनीतीनामक ग्रंथाची निर्मिती त्यांच्या ज्ञानोपसेवी हातांमधून झाली. कौटिलीयम् अर्थशास्त्रम् या इंग्रजी भाषांतरित ग्रंथाचा मराठी अनुवाद ज.. करंदीकर व य. हिवरगावकर यांनी केला व त्याचे दोन खंड १९२७-१९२९ मध्ये प्रकाशित झाले होते.

कौटिलीय अर्थशास्त्र हा मूळ १५ अधिकरणांचा संस्कृत ग्रंथ असून मराठी भाषांतराचा ६८५ पानांचा विस्तार झाला. आधुनिक टीकाकार व अभ्यासकांच्या मतांना विचारात घेऊन हे भाषांतर व टीपा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. शब्दश: भाषांतरासह राजनीतीपर कठीणतम विषय अतिशय सुबोधतेने या ग्रंथामध्ये मांडला गेला. कौटिलीय अर्थशास्त्र म्हणजे जणू राजनीतीशास्त्रच होयजे केवळ तत्कालीन परिस्थितीलाच नव्हे, तर आधुनिक काळालाही उपयुक्त ठरेल अशा अनेकविध विषयांवर सखोल विचार प्रतिपादन केले आहेविवाद्य मतांच्याबाबत आपल्या अभ्यासपूर्ण मतांमधून योग्य वाटणार्या अर्थांचे ग्रहण केले आहे.

रमाकांत कंगले यांनी रस-भाव-विचारया शीर्षकांतर्गत भरतमुनींच्या नाट्यशास्त्रया संस्कृत ग्रंथातील रससिद्धान्तविषयक असलेल्या अध्याय ६ व ७ चे भाषांतर, तसेच अभिजात संस्कृत साहित्यातील नाटक व नाट्यशास्त्रविषयक असलेल्या दहा रूपक प्रकारांचे वर्णन असलेला नाट्यशास्त्रातील अध्याय १८-१९ चे अभिनवगुप्तांच्या अभिनवभारतीटीकेसह मराठी भाषांतर केले, ज्यामध्ये दशरूपक प्रकारांचे वर्णन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांनी केले. उपरोक्त दोन्ही पुस्तकांचे प्रस्तुत भाषांतर प्रा. कंगले यांनी अभिनवभारती टीकेच्या आधारे शब्दश: करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकाणी सुबोधता येण्यासाठी टीपांचा भरपूर उपयोग केला आहे.

सर्वदर्शनसंग्रहनामक, मध्वाचार्य लिखित चौदाव्या शतकामधील तत्त्वज्ञानाधिष्ठित ग्रंथाच्या सोळा सिद्धान्तांचे विस्तारपूर्वक विवेचन कंगले यांनी मराठी भाषेमध्ये केले. .. वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या दर्शनाङ्कुर व्याख्येचा समावेश या ग्रंथात मराठीमध्ये केला गेला. तो ग्रंथ आजमितीला संदर्भग्रंथ म्हणून ओळखला जातो.

उद्भट आणि त्यांचा काव्यालंकार सारसंग्रह हा.पं. कंगले यांच्या लेखणीतून अवतरलेला परिचयग्रंथ. संस्कृत काव्यशास्त्रामध्ये आचार्य भामहांचे काव्यालंकार अतिशय प्रसिद्ध आहेत. या मौलिक ग्रंथावर उद्भटाने काव्यालंकार-सारसंग्रहनामक टीका लिहिली. भामहांच्या संकल्पना स्पष्ट करताना त्यात स्वमते व इतर भर घातली.

उद्भटाचे हे भाष्यदेखील नंतर आलेल्या अनेक संस्कृत साहित्य शास्त्रकारांना उपयुक्त ठरले. या ग्रंथकाराच्या कृतीवर प्रा. कंगले यांनी लिहिलेला परिचय ग्रंथ संस्कृत व मराठी साहित्यशास्त्राचा अभ्यास करणार्या व्यक्तींना मार्गदर्शकच आहे. त्यांनी होमरच्या इलियडया ग्रीक महाकाव्याचा सुरस मराठी अनुवाद केला आहे. अभ्यासकांसाठी कंगले यांनी अतीव मोलाचे संदर्भग्रंथ प्रदान केले आहेत.

प्रा. सुचित्रा ताजणे

कंगले, रमाकांत पंढरीनाथ