Skip to main content
x

कोल्हटकर, श्रीपाद कृष्ण

     श्रीपाद कृष्ण कोल्हटकराचा जन्म बुलढाणा येथे झाला. अकोला व पुणे या ठिकाणी बी.ए.(१८९१), एलएल.बी. (१८९७)पर्यंतचे शिक्षण घेतले आणि खामगाव, तेल्हारा, जळगाव, जामोद येथे त्यांनी वकिली केली.

     इ.स. १८८८ मध्ये त्यांनी ‘सुखमालिका’ हे पहिले नाटक लिहिले. इ.स.१८९२ मध्ये त्यांनी ‘विक्रमशशिकला’ या नाटकाचे परीक्षण करणारा पहिला टीकालेख लिहिला. इ.स.१९०२मध्ये त्यांनी ‘साक्षीदार’ हा पहिला विनोदी लेख लिहिला. तो ‘विविधज्ञानविस्तार’मधून प्रसिद्ध झाला. ‘वीरतनय’(१८८४), ‘मूकनायक’ (१८९७), ‘गुप्तमंजुषा’ (१८९८-९९), ‘मतिविकार’ (१८९९), ‘प्रेमशोधन’ (१९०८), ‘वधूपरीक्षा’ (१९१२), ‘सहचारिणी’(१९१७) ‘परिवर्तन’ (१९१७), ‘जन्मरहस्य’ (१९१८), ‘शिवपावित्र्य’ (१९२१), ‘श्रमसाफल्य’ (१९२८), ‘मायाविवाह’ (१९२८) ही नाटके त्यांनी लिहिली.

      ‘तो दिन’ ही त्यांची पहिली कविता प्रथम विविधज्ञानविस्तारामधून आणि नंतर मासिक मनोरंजनमधून प्रसिद्ध झाली. त्यानंतर मनोरंजनमधून त्यांच्या ‘अनुपम सुख’, ‘खरी भाऊबीज’, ‘तुळशीचे लग्न’, ‘छत्रीचे उपकार’, ‘भयंकर जागृती’, ‘एका स्त्रीची पर्जन्यविषयक कल्पना’, ‘मृत अपत्याचे शेवटचे चुंबन’, ‘सुखकर जागृती’, ‘स्थित्यंतर’, ‘विलक्षण न्यायसभा’ इत्यादी कविता प्रसिद्ध झाल्या.

     १९१० साली त्यांनी ‘गाणारे यंत्र’ ही पहिली कथा लिहिली. पुढे बर्‍याच कालावधीनंतर त्यांनी ‘बबीची तयारी’ (१९३२), ‘मोत्याचा पापा’ (१९३३), ‘आजोबांचे काम’ (१९३४) या कथा लिहिल्या. त्यांच्या ‘श्यामसुंदर’ आणि ‘दुटप्पी की दुहेरी’ या कादंबर्‍यांचे प्रकाशन १९२५ मध्ये झाले. त्यांनी १९०२मध्ये साक्षीदार हा पहिला विनोदी लेख लिहिला. १९१०मध्ये ‘अठरा धान्यांचे कडबोळे’ आणि ‘सुदाम्याचे पोहे’ हे त्यांचे विनोदी लेखन प्रसिद्ध झाले. विनोदी लेखनाची परंपरा मराठी साहित्यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून सुरू झाली, असे मानले जाते. याच परंपरेत पुढे राम गणेश गडकरी, आणि नंतरच्या काळात चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे हे विनोदी लेखक आले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे विनोदी लेखन ‘विविधज्ञानविस्तार’ आणि ‘मनोरंजन’ यांमधून प्रसिद्ध झाले. आपल्या उपहासगर्भ लेखनासाठी त्यांनी सुदामा, पांडुतात्या व बंडूनानन ही पात्रे निर्माण केली.

     विनोदी लेखक म्हणून श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना आद्य स्थान आहे. नाटककार म्हणूनही त्यांची कारकिर्द लक्षणीय आहे. डेक्कन महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्यांनी ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकात शकाराच्या विटाची भूमिका केली होती. त्या वेळी सुरू असलेल्या पारशी नाटकमंडळींच्या नाट्यप्रयोगाचे आणि त्यातल्या संगीताचे त्यांना आकर्षण वाटू लागले आणि तसे नाट्य मराठी रंगभूमीवर आणावे, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. ते पदवीधर विद्वान होते, लेखक आणि टीकाकार म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळू लागली होती. भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्याजवळ शैक्षणिक पदवी होती, आणि व्यवसायिक प्रतिष्ठाही होती. या सार्‍यांच्या आधारावर त्यांचा किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश झाला. १९०० ते १९१० या दशकात विशी-पंचविशीतल्या तरुण विद्यार्थांना आणि वाङ्मयप्रेमी लोकांना नाटकांबद्दल विलक्षण आकर्षण होते. किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नाटकमंडळीची धुरा वाहिली ती प्रामुख्याने देवल आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी! आगरकरांच्या समाजसुधारणाविषयक विचारसरणीचे दर्शन कोल्हटकरांनी आपल्या नाटकांमधून घडवले. परंतु त्यांना नाटकाच्या संविधानकात गुंतागुंत निर्माण करण्याची हौस होती. त्यामुळे त्यांच्या नाटकांना रहस्यमय, चमत्कृतिजन्य असे स्वरूप मिळाले. एकीकडे या नाटकांमध्ये वेषांतर, नामांतर, प्रतिज्ञा या गोष्टी होत्या. तर दुसरीकडे आगरकरांच्या सुधारणावादाच्या प्रभावातून केशवपन, भू्रणहत्या, पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण, जातिभेद-निवारण, घटस्फोट या गोष्टीही आल्या होत्या.

     त्यांच्या ‘प्रेमशोधन’ या नाटकात राजाराणीचे कथानक होते, तर ‘मूकनायक’ नाटकात कल्पनारम्यतेचा आभास होता. ‘मतिविकार’ या नाटकातून त्यांनी मध्यमवर्गीयांचे चित्रण केले, ‘जन्मरहस्य’ नाटकात प्रतिलोम विवाह, प्रीतिविवाह, पुनर्विवाह यांचा विचार मांडला. ‘शिवपावित्र्य’ हे एकुलते एक ऐतिहासिक नाटक त्यांनी लिहिले. ‘सहचारिणी’ हे प्रहसन लिहिताना दोन बायकांचा दादला आणि त्यांची मुले यांची कथा रंगवली. एकीकडे चमत्कृतीजन्य कथानके रंगवताना कोल्हटकरांनी स्त्रीशिक्षण, भ्रूणहत्या, मद्यपान निषेध या सुधारणावादी विचारांना आपल्या नाटकांत स्थान दिले. नाटककार म्हणून श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे नाव आदराने घेतले जाते.

     समीक्षक म्हणूनही त्यांचे कर्तृत्व लक्षणीय आहे. समीक्षा-लेखनाने त्यांंच्या लेखनाचा श्रीगणेशा झाला. १८९३मध्ये ‘विविधज्ञानविस्तार’ मधून त्यांचा ‘विक्रमशशिकला’ या नाटकावरील टीकालेख प्रसिद्ध झाला. तसेच १९१२ साली ‘मराठी कथात्मक वाङ्मय’ या लेखात हरिभाऊंच्या कथालेखनाचा त्यांनी विस्ताराने परामर्श घेतला. त्यांचे साहित्यविषयक विचार चार प्रकारांनी व्यक्त झाले. १.पुस्तक परीक्षणे २.स्वतंत्र निबंध ३.संमेलनांमधून त्यांनी केलेली विविध भाषणे ४.काही पुस्तकांच्या प्रस्तावना.  ‘कोल्हटकरांचा लेखसंग्रह’ यात त्यांचे एकवीस टीकालेख आहेत. नाटक, कथा, चरित्र यांवरील टीका तसेच काही वाङ्मयविषयक निबंध यांचा त्यात समावेश आहे. काही प्रस्तावनाही त्यामध्ये अहेत. परखडपणा, परिश्रमशीलता आणि इतर कलाविषयक विचार, वाङ्मय आणि मानवी जीवनाचे चिंतन ही त्यांच्या समीक्षा-लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. मनोविकारास भावना म्हणतात. त्यांचा रसिकांच्या दृष्टीने विचार केल्यावर रस ही संज्ञा प्राप्त होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी आपल्या टीकालेखनातून हा रसविचार अधिक बारकाईने मांडला.

     कोल्हटकरांनी समाजजीवनाचे अवलोकन आणि चिंतन  अनेक अंगांनी केले होते. त्याला त्यांच्या विनोदबुद्धीची जोड मिळाली होती. त्यामुळेच त्यांचे उपहासप्रधान लेखन फार श्रेष्ठ दर्जाचे झाले. समाजात प्रचलित असलेले अनेक धार्मिक आचारविचार, गैरसमजुती कसे हस्यास्पद आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. सुदाम्याच्या रूपातून सनातनी धर्माच्या अभिमान्यांचे, बंडूनानाच्या रूपातून अंधश्रद्धाळूपणाचे आणि भित्रेपणाचे दर्शन त्यांनी घडवले, तर समाजातल्या ना सनातनी ना सुधारकी अशा वृत्तींचे प्रतिनिधित्व पांडूतात्यांच्या पात्राने केले. ही पात्रे वाचकांना आपलीशी वाटू लागली. मनुष्यस्वभावातल्या विविध दौर्बल्यांचे दर्शनही त्यांनी सुदाम्याच्या रूपातून घडवले. कोट्या करणे हेही त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. ‘साहित्यबत्तिशी’ आणि ‘सुदाम्याचे पोहे’ हे त्यांचे विनोदी लेखन मराठी साहित्यातला मानदंड ठरले. पाश्चात्त्य देशातील व्हॉल्टेअर, मोलिअर, स्टर्न, मार्क ट्वेन, पास्कल इत्यादी अनेक विनोदी लेखकांच्या साहित्याचा आभ्यास कोल्हटकरांनी केला होता. आणि त्यांचा प्रभावही कोल्हटकरांवर  होता. जेरोम के. आणि मार्क ट्वेन यांच्यासारखे लेखन आपणही करावे, या हेतूने आपण १९०१ मध्ये ‘साक्षीदार’ हा पहिला विनोदी लेख लिहिला, असे त्यांनी ‘आत्मवृत्त’ या आपल्या आत्मकथनात म्हटले आहे.

     महाराष्ट्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि मराठी भाषा यांच्याविषयी कोल्हटकरांना अपार अभिमान होता. ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे त्यांनी लिहिलेले महाराष्ट्र-गीत अजरामर झाले आहे. आजही आनेक सार्वजनिक कार्यक्रमांमधून ते अभिमानाने गायले जाते. हे गीत ‘किर्लोस्कर’ मासिकातून १९२६ च्या सुमारास प्रसिद्ध झाले.

    संगीत आणि ज्योतिष हे त्यांच्या आवडीचे विषय होते. लहानपणी पक्षघाताचा झटका आल्यावर शरीर बेडौल आणि अनाकर्षक झाले. अशा वेळी वाचन, संगीत आणि ज्योतिषाचा अभ्यास हाच त्यांचा विरंगुळा बनला. १९०६ साली त्यांनी ज्योतिषशास्त्रविषयक ग्रंथाचे लेखन सुरू केले. ज्योतिषाला गणिताच्या अध्ययनाची जोड मिळाली आणि त्यांचा ‘भारतीय ज्योतिर्गणित’ हा निबंध दामोदर सावळाराम यंदे यांच्या ग्रंथमालेतून १९१३ साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथामुळे ज्योतिषाच्या अभ्यासकांमध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. आणि १९२० साली सांगली येथे भरलेल्या तिसर्‍या ज्योतिष संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. यानिमित्ताने त्यांच्या ज्योतिष विषयक व्यासंगाचा आणि लेखनाचा गौरव झाला. १९२७ साली पुणे येथे भरलेल्या बाराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

     मार्मिक निरीक्षणशक्ती आणि डोळस वाचन असणार्‍या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी समीक्षेच्या आणि विनोदी साहित्याच्या क्षेत्रात जी पायवाट निर्माण केली, तिचाच पुढे राजरस्ता झाला.

- डॉ. जोत्स्ना कोल्हटकर

संदर्भ
१.  कुलकर्णी वा.ल.; ‘श्रीपाद कृष्ण वाङ्मयदर्शन’ ; पॉप्युलर बुक डेपो; १९५९.
२.  खानोलकर गं. दे.; ‘साहित्य सिंह’; भारत गौरव ग्रंथमाला, १९७२.
३. जोग रा. श्री., संपादक; ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ महाराष्ट्र राज्य साहित्य खंड ५ भाग, १ व २ - संस्कृती प्रकाशन; १९७३.
४. मराठी विश्वकोश खंड ४; महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ; १९७६.
कोल्हटकर, श्रीपाद कृष्ण