Skip to main content
x

कुलकर्णी, रामचंद्र श्रीधर

राम मास्तर

     रामचंद्र श्रीधर कुलकर्णी हे नाशिकमध्ये ‘राम मास्तर’ म्हणून ओळखले जात. नाशिक नगरपालिकेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे जु.स. रूंग्टा विद्यालयामधून ते मॅट्रिक झाले. नाशिक येथील यशवंत व्यायामशाळेत व बडोद्याच्या जुम्मादादा व्यायामशाळेत राम मास्तरांनी व्यायामाचे शिक्षण पूर्ण केले. कांदिवली येथील सरकारी शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला होता. बेळगाव मराठा लाइट इन्फन्ट्री मध्ये त्यांचे लष्करी शिक्षण झाले होते.

     १९२७ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल, नाशिक ह्या शाळेत व्यायाम शिक्षक म्हणून ते रुजू झाले. रूंग्टा विद्यालयाची व्यायामशाळा हे त्यांचे कार्यक्षेत्र झाले. निष्ठापूर्वक शिकविणे हा राम मास्तरांचा छंद होता. मुलांना जोर, बैठका, कुस्ती, मल्लखांब, डबलबार अशा विविध व्यायाम प्रकारांचे उत्तम शिक्षण मास्तर देत. अर्धी खाकी पँट, पांढरा शर्ट खोचलेला, गुडघ्यापर्यंत खाकी पायमोजे, चकचकीत पॉलिश्ड लेदर शूज ह्या पोशाखात ते वावरत. वयाच्या पंचावन्नाव्या वर्षीही नाशिकमधली होळी ते रूंग्टा विद्यालय हे लांबचे वाटावे असे अंतर, हमरस्ते तुडवीत ते रोज शाळेत येत. मास्तर मुलांना शरीर कमावण्याचे बाळकडू पाजत. पण बरोबरीने मनाची शक्तीही वाढावी याकडे ते कटाक्षाने लक्ष देत.

     रोज पहाटे पाच वाजता शाळेच्या व्यायामशाळेत येताना वाटेवरच्या मुलांना हाकारे देत सोबत घेऊन येत. पहाटे व्यायामशाळा मुलांनी फुललेली असायची. तो काळ देशी खेळांचा होता, मैदानी खेळांचा होता. हुतूतू (कबड्डी), खोखो, लंगडी अशा खेळांच्या सामन्यात राम मास्तरांच्या तालमींमुळे रूंग्टा विद्यालयाचे संघ सतत प्रथम क्रमांकावर असत. राम मास्तर स्वत: मुलांबरोबर खेळत. शाळेत हजारएक मुले होती. बहुतेक मुलांची नावे राममास्तरांना तोंडपाठ असत. व्यायाम करताना काही चूक झाली, कार्यक्रमाच्या वेळी कोणी गडबड केली की त्याची मास्तर गय करीत नसत. ते मुलांना रागावत, शिक्षा करीत; पण त्यापेक्षा जास्त त्यांच्यावर प्रेम करीत.

     नाशिकमध्ये झालेल्या पहिल्या शारीरिक शिक्षण परिषदेत रूंग्टा विद्यालयाने मिळविलेल्या यशामुळे ‘आऊट डोअर गेम्स अँड अ‍ॅथलेटिकस् असोसिएशन’चे प्रमुखपद पाच वर्षे राम मास्तरांकडे होते. शिस्त, परिश्रम, कार्याची तळमळ, संघटन-कौशल्य, ध्येयवाद यातून त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. शारीरिक क्षमता परीक्षा, नेतृत्ववर्ग, सांघिक कवायत, संचलन, क्रीडा शिक्षक मार्गदर्शन अशा विकासाच्या विविध योजना मास्तरांनी प्रत्यक्षात आणल्या. शाळेत एन. सी. सी. पथकाची स्थापना केली व १९५५ पर्यंत ते सांभाळले.

     व्यावसायिक कारकिर्दीत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे आजीव सदस्य, सह चिटणीस, नाशिक रोडच्या नवीन मराठी शाळेचे अधीक्षक अशा विविध पदांवर राम मास्तरांनी काम केले. १९७१ मध्ये मास्तर सेवानिवृत्त झाले. पण व्यायामाचे शिक्षण ते देत राहिले.

     नाशिकची यशवंत व्यायामशाळा पूर्वी गोदावरीच्या तीरावर भरायची. शाळेच्या स्थापनेपासून राममास्तर महाबळ गुरुजींचे पट्टशिष्य होते. त्यांच्यासाठी मास्तरांनी स्वयंसेवकापासून ते विश्वस्तापर्यंतची सर्व कामे मोठ्या निष्ठेने केली. यशवंत पटांगणावर भरणाऱ्या यशवंत देव मामलेदारांच्या यात्रा संयोजनात मास्तरांचा मोठा सहभाग असे. गोदावरीच्या पुरात दोन तीन वेळा व्यायामशाळा व यशवंतराव महाराज समाधी मंदिर उद्ध्वस्त झाले. या दोन्ही संस्था पूर्वीपेक्षाही अधिक मजबूतपणे पुन:स्थापित करण्यात राम मास्तर पुढे होते. नंतरच्या काळात म. गांधी मार्गावरील व्यायामशाळेच्या इमारतीस महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांनी भेट दिली. त्यावेळी महाबळ गुरुजींनी व राम मास्तरांनी ‘लाठी छूट’ चे प्रात्यक्षिक दाखविले होते. तेव्हा महाबळ गुरुजींचे वय होते ऐंशी वर्षे व राम मास्तरांचे सत्तर वर्षे. स्वत:च्या पेशावरील अनन्यसाधारण निष्ठेमुळेच हे शक्य झाले.

     - प्रा. सुहासिनी पटेल

कुलकर्णी, रामचंद्र श्रीधर