Skip to main content
x

कवीश्वर, दत्तात्रेय धुंडिराज

त्तात्रेय धुंडिराज कवीश्‍वर यांचा जन्म कोल्हापुरातील नृसिंहवाडी येथे झाला. त्यांचे पिता धुंडिराज महाराज व आजोबा वक्रतुंड महाराज प्रवचनकार म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत. लहानपणी दत्तमहाराजांना श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या चरणावर घालण्यात आले. तेव्हापासून श्री वासुदेवानंद सरस्वतींची कृपादृष्टी श्री दत्तमहाराजांवर होती. श्री दत्तमहाराजांचे बालपण नृसिंहवाडीत गेले. प्राथमिक शालेय शिक्षण तेथेच झाले. उपनयनानंतर त्यांच्या वेदाध्ययनास प्रारंभ झाला. त्यांनी नृसिंहवाडीतील जेरेस्वामींच्या संस्कृत पाठशाळेत काव्य, व्याकरण यांचे अध्ययन केले.

व्याकरणातील उरलेले अध्ययन सांगलीला पूर्ण केले. याच काळात श्री वासुदेवानंद सरस्वतींचे शिष्य श्री दीक्षित स्वामींनी अमरापूर येथे आपल्या गुरूंच्या पीठाची स्थापना केली. तिथे पहिला भागवत सप्ताह पूर्ण झाल्यावर श्री दीक्षित महाराजांनी शाल व संध्यापात्र देऊन त्यांचा सत्कार केला. तेव्हापासून - १९२५पासून १९६५पर्यंत असा भागवत सप्ताह अमरापूर येथे सतत चालू राहिला. त्यानंतर ते पुण्यातच श्री वासुदेव निवासात होते.

सांगली येथे व्याकरणशास्त्राचे अध्ययन पूर्ण झाल्यावर ते धारवाड येथे नागेशशास्त्री उप्पिनबेटिगेरी यांच्याकडे गेले. तेथे त्यांनी न्याय व वेदान्त या शास्त्रांचे अध्ययन केले. पुण्यात मीमांसा विद्यालयात पं. सुब्बाशास्त्री यांच्याकडे मीमांसाशास्त्राचे त्यांचे अध्ययन झाले. अध्ययन पूर्ण झाल्यावर १९३७ साली पुण्यातील शंकरमठात ते न्याय व वेदान्त यांचे अध्यापन करू लागले.

श्री दत्तमहाराज १९४८ साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठात न्याय व वेदान्त विषयांचे अध्यापक म्हणून आले. तेथे असताना त्यांनी निम्बार्काचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील टीकेच्या-वेदान्तपरिजातसौरभ’-संशोधनाचे काम केले. हा ग्रंथ १९६५मध्ये टिळक विद्यापीठाने प्रकाशित केला. भारतीय तत्त्वज्ञान, भागवतधर्म, भक्तिमार्ग इत्यादींचे विवेचन करणारी विस्तृत, अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना त्यांनी या ग्रंथाला जोडली आहे आणि मराठी भाषेत अनुवाद केला आहे. माधवाचार्यांच्या सर्वदर्शनसंग्रहावर त्यांनी टीकाही लिहिली आहे. वासुदेवानंद सरस्वती हे श्रीदत्तमहाराजांचे परमगुरू. श्री वासुदेवानंद सरस्वतींनी संन्यस्त काळातील चोवीस चतुर्मासांमध्ये श्रीदत्तस्तुतिपर वाङमय रचले. ते सर्व श्री दीक्षित महाराजांनी अमरापूर येथे संग्रहित केले. श्री गुळवणी महाराज व श्री दत्तमहाराज या दोघांनी ते प्रकाशित करण्याचे काम पार पाडले. ते सर्व प्रकाशित होण्यासाठी ८-९ वर्षांचा काळ लागला. श्री दत्तमहाराजांनी संपादन, मुद्रितशोधन इत्यादी सर्व कामे केली आणि आपल्या सदगुुरूंची ही वाङ्मयमूर्ती बारा खंडांमध्ये प्रकाशित केली.

दत्त संप्रदायातील अधिकारी पुरुष श्री गुळवणी महाराज यांनी आपल्या गुरूंच्या स्मृतीसाठी पुणे येथे श्री वासुदेव निवास स्थापन केला. त्यांच्या निर्वाणानंतर श्री दत्तमहाराज त्यांचे उत्तराधिकारी झाले. वासुदेवानंद सरस्वतींच्या रचना, भगवद्गीता, ज्ञानेश्‍वरी, उपनिषदे यातील एखादा विषय घेऊन त्यावर प्रवचने देण्याची सेवा त्यांनी चालवली.

कांची कामकोटी पीठाने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले, तर द्वारकेच्या श्रीशंकराचार्य यांनी महामहोपाध्यायही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रीय संस्कृत पंडितहे सन्मानपत्र व गौरवराशी देऊन सन्मानित केले आहे. श्री दत्तमहाराजांच्या एक्क्याऐंशीव्या जन्मदिनी सहस्रचंद्रदर्शन शांती करून त्यांना प्रसन्नपारिजातहा विद्वज्जनांनी लिहिलेला ग्रंथ अर्पण करण्यात आला. त्यांचे कार्य व चरित्र याबद्दलचे मराठी ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

संपादित

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].