Skip to main content
x

खुपेरकर शास्त्री, बाळाचार्य माधवाचार्य

     राष्ट्रीय पंडित बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकर शास्त्री यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचा विवाह रमा या बेळगावच्या खासबाग घराण्यातील कन्येबरोबर झाला. त्यांची मातृभाषा कानडी होती. त्यांना चार अपत्ये म्हणजे तीन मुली व एक मुलगा होती.

     खुपेरकर हे घराणे मूळ कर्नाटक अथणी तालुक्यात होते. थोर विद्वान पंडितांचे घर म्हणून ते प्रसिद्ध होते. या घरात वैभव व सात्त्विक आनंद होता. ज्ञानाच्या बळावर त्यांच्या पूर्वजांना कोल्हापूरच्या राजेसाहेबांनी सन्मानाने आश्रय दिला होता. अथणीची खुपेरकरांची एक शाखा कालगावला गेल्यामुळे त्या शाखेने कालगावकर हे आडनाव लावले होते. त्या शाखेतील विद्वान संस्कृत पंडित, समर्थ भक्त अण्णाबुवा कालगावकर हे होते. या घराण्यात प्रखर विद्वत्ता व कमालीचे शुचित्व असा सुंदर संगम होता. या घराण्यात श्रीप्रभू रामचंद्रांची उपासना, पारमार्थिक ग्रंथांचा अभ्यास, वेदाभिमानी अशा मंडळींमधूनच कुशाग्र बुद्धीला आदित्याचे तेज लाभले होते. असे थोर घराणे, त्याच घराण्यात श्यामाचार्य हे फार मोठे विद्वान होते, त्यांना महाभारत हा ग्रंथ मुखोद्गत होता.

     श्री. बाळाचार्यांना सुरुवातीचे संस्कृतचे पाठ घरातून मिळाले हेाते. घरात सर्व जण संस्कृत बोलत असत. त्यानंतरचे संस्कृतचे अध्ययन हे आत्मारामशास्त्री पित्रे व बाळशास्त्री अध्यापकर यांच्या पाठशाळेत झाले. त्यापुढे त्यांनी पुण्यात वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्याकडे संस्कृत भाषा, वाङ्मय व तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. त्यानंतर कुंभकोणम येथे त्यांनी ‘पूर्व मीमांसे’ची परीक्षा दिली. अशा प्रकारे त्यांनी संस्कृत भाषेतील वाङ्मय, काव्य व व्याकरण यांचे समृद्ध शिक्षण घेतले व जीवनभर ज्ञानदानाचे कार्य केले. पुढे धुळे येथे गरुड हायस्कूलमध्ये बाळाचार्यांची शास्त्री म्हणून नियुक्ती झाली. तेथे त्यांनी २४ वर्षे संस्कृत अध्यापनाचे कार्य केले.

     बाळाचार्यांच्या जीवनातील एक रहस्य असे होते, की त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध धोरण असताना सरकारी नोकरी केली. याचे कारण असे, की ब्रिटिश राजवटीत गव्हर्नरांनी संस्कृत शिक्षणाची केंद्रे देशातील प्रत्येक राज्यात काढावीत ही योजना आखली होती. तेव्हा यात महाराष्ट्राचाही समावेश होता. त्यांच्या मनात संस्कृतचे महाविद्यालय मुंबईत काढावे अशी योजना होती. त्यासाठी त्यांनी ही नोकरी केली. पुढे सातारा, पुण्यात डेक्कन कॉलेज, पुन्हा सातारा व मग ३० ऑगस्ट १९४१ रोजी सेवानिवृत्त होऊन ते कोल्हापूरला स्थायिक झाले. निवृत्तीच्या काळात संस्कृत व मराठी भाषेचा व्यासंग, अध्ययन व अध्यापन पुन्हा विविधतेने नटले होते. त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. संस्कृत भाषेवर जरी त्यांचे प्रेम होते, तरी त्यातून त्यांनी मराठी वाङ्मय समृद्धच केले.

बाळाचार्य जुन्या-नव्या आचारधर्मांचे, विचारांचे समन्वयक होते. त्यांनी ‘पूर्णप्रज्ञदर्शन’, ‘वात्स्यायन कामसूत्रे’, ‘सनत्सुजापर्व’ या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर केले होते. ते कामशास्त्राचे शिक्षण शिक्षणसंस्थेतून दिले पाहिजे या मताचे होते. त्याचप्रमाणे, त्यांनी कवी मोरोपंतांचे संस्कृत काव्य टीपा व विवरण, महाभारत, रामायण, कृष्णविजय, स्फुट कविता अशा एकूण दहा हजार काव्यपंक्तींवर टीपा, विवेचन व प्रस्तावना लेखन केले. त्यासाठी त्यांनी साहित्यशास्त्रांतर्गत छंदोपरचनेचा संपूर्ण व सखोल अभ्यास केला. त्याबरोबर ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ (ले. करंदीकर), ‘छंदोपरचना’ (प्रा. मा.त्र्यं. पटवर्धन), ‘सुश्लोक गोविंद’, ‘सुश्लोक मेध’, ‘सुश्लोक कुमार’ (डॉ. रा.चिं. श्रीखंडे) इ. ग्रंथांवर परीक्षणात्मक लेख लिहिले. ‘भास’ या संस्कृत कवीवर स्वतंत्र प्रबंध लिहिला. त्यात त्यांनी स्थल निर्णय, काल निर्णय व काव्य विवरण यांवर विविध संशोधनात्मक लेखन केले. महाराष्ट्र शासनाने ज्ञानेश्वरी ग्रंथाची संशोधनात्मक आवृत्ती काढण्याचे ठरविले, त्या वेळी त्या संपादक मंडळात बाळाचार्य होते. त्या कामात त्यांनी व्याकरण, साहित्य व तत्त्वज्ञानविषयक भागाचे काम पाहिले होते. पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या ‘दिव्यामृतधारा’ या ग्रंथाची योग्यता जाणून बाळाचार्यांनी त्यातील संस्कृतवचने तपासून दिली होती. त्या वेळी त्यांचे वय ८५ होते.

     ‘भारतीय दर्शन विकास’ व ‘वेदान्त’ यांवर त्यांनी शंभर व्याख्याने दिली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला झाल्यावर पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठाचे पहिले दोन ग्रंथ, वनमाली मिश्रांचे ‘श्रुतिसिद्धान्तदीपिका व श्रुतिसिद्धान्तप्रकाश’, यांचे बाळाचार्यांद्वारे संशोधन करून घेऊन ते अप्रकाशित ग्रंथ, प्रा. निपाणीकर यांच्या सहकार्याने प्रसिद्ध केले. बाळाचार्य म्हणजे मराठी सारस्वतातील अखंड झराच होता.

     सन १९७० साली बाळाचार्यांचा ‘राष्ट्रीय पंडित’ म्हणून गौरव झाला होता. अनेक ठिकाणी विद्वान पंडित म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. धर्मशास्त्रीय शंका, समस्या, धर्म-निर्णय घेण्यात सबंध भारतातून लोक त्यांच्याकडे येत असत. त्यांचा प्रचंड लोकसंग्रह होता. त्यांचे अनेक मान्यवर विद्यार्थी होते. अशा प्रकारे जीवनभर संस्कृत भाषेची सेवा करता करता बाळाचार्य यांचे  देहावसान झाले.

डॉ. अजित कुलकर्णी

खुपेरकर शास्त्री, बाळाचार्य माधवाचार्य