माणके, भाऊराव शंकर
भाऊराव शंकरराव माणके यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील आर्वी या लहानशा खेड्यात झाला. त्यांचे वडील कोरडवाहू शेती करत. त्यांचे इयत्ता ७वीपर्यंतचे शिक्षण आर्वी येथेच झाले. वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणाकरता धुळे येथे मराठा बोर्डिंगमध्ये पाठवले, परंतु दरमहा होणारा खर्च भागवणे कठीण जाऊ लागले. म्हणून त्यांनी बोर्डिंगच्या प्रमुखांना भेटून काही तरी काम देण्याची विनंती केली. प्रमुखांनी त्यांना कोठीवर काम दिले. अशा रीतीने ‘कमवा आणि शिका’ हा प्रकार सुरू झाला. भाऊराव माणके १९५९मध्ये चांगले गुण मिळवून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि १९६३ साली बी.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. त्यांनी १९६५मध्ये जेनेटिक्स व प्लँट ब्रीडिंग या विषयात चांगल्या गुणांनी एम.एस्सी. पदवी मिळवली. नंतर माणके यांची कृषी विभागात कृषि-अधिकारी म्हणून निवड झाली आणि त्यांनी वैजापूर येथे कृषी संशोधन केंद्रातील बाजरी-पैदास विभागात कामास सुरुवात केली. या ठिकाणी सुमारे ३ वर्षे काम केल्यानंतर भाऊराव माणके यांना नागपूर येथील कृषी महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. तेथून भाऊराव माणके यांना धुळे येथे कृषी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. थोड्याच कालावधीत धुळे येथून सोलापूर येथील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पात रोप-पैदासकार म्हणून १९७२मध्ये भाऊराव माणके यांची नेमणूक झाली.
डॉ. माणके यांनी कोरडवाहू शेतीत करडई पिकावर जास्त भर दिला. सोलापूर केंद्राने यापूर्वी करडई हे स्वतंत्र पीक घ्यावे, अशी शिफारस केली होती. अवर्षणप्रवण परिस्थितीत योग्य वाण निवडण्याच्या दृष्टीने डॉ. माणके यांनी काही वाणांची चाचणी घेतली. त्यातील काही वाण निवड पद्धतीने अलग करून त्यांच्या स्वतंत्र चाचण्या घेतल्या. त्यातील एस ४ हा वाण आशादायक वाटल्याने त्या वाणाच्या विस्तृत चाचण्या घेऊन शेवटी या वाणाची शिफारस करण्यात आली. हा वाण ‘भीमा’ या नावाने प्रसारित केला. हा वाण (एन ६२-८ व तारा यांच्या तुलनेत) प्रचलित वाणापेक्षा अधिक उत्पादन देणारा व साठवलेल्या ओलीवर येणारा व अवर्षणप्रवण भागात उपयुक्त ठरला. त्याची फुले वाळल्यानंतर राखाडी गुलाबी होत असल्याने इतर वाणांपेक्षा हा ओळखण्यास सुलभ होता. त्यांच्या मुळांची वाढ विपुल आणि पानांची जलधारणा जास्त होती. या गुणांमुळे हा वाण यशस्वी ठरला.
डॉ. भाऊराव माणके यांनी कोरडवाहू शेतीमध्ये महत्त्वाच्या हुलगा व मटकी पिकांच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली. पुढील काळात याच पिकांचे नवीन वाण प्रसारित झाले. डॉ. भाऊराव माणके यांना १९७८मध्ये पीएच.डी. पदवी अभ्यासाकरता लुधियाना येथील कृषी विद्यापीठात पाठवण्यात आले. तेथून त्यांनी १९८१मध्ये पीएच.डी. पदवी मिळवली. पुढील काळात डॉ. माणके यांनी गहू-विशेषज्ञ म्हणून काम पाहिले व १९९६मध्ये ते सेवानिवृत्त झाले.