Skip to main content
x

मांडरे, वामन तुकाराम

सूर्यकांत

     चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आपल्या स्वाभाविक अभिनयाने आणि अभिनयावरील निष्ठेने स्वतंत्र स्थान निर्माण करणारे कलावंत म्हणून वामन उर्फ सूर्यकांत तुकाराम मांडरे यांनी आपली खास ओळख निर्माण केली. कोल्हापूरला त्यांचा जन्म झाला. त्यांची आई तानुबाई तुकाराम मांडरे आणि वडील तुकाराम नारायण मांडरे यांच्या मायेच्या आणि शिस्तीच्या छताखाली, मोठे बंधू चंद्रकांत उर्फ गोपाळ मांडरे यांच्यासह कुळाचार आणि परंपरा जपणार्‍या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. कोल्हापुरात सुरुवातीला सरस्वती विद्यालयात आणि त्यानंतर हरिहर विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतले. वडिलांच्या आग्रहाखातर नियमितपणे केलेल्या व्यायामाने शरीर कमावले. सूर्यकांत यांचे उमदे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व भालजी पेंढारकरांसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या नजरेस पडले आणि १९३८ साली वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ‘ध्रुव’ या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. शालेय शिक्षण एकीकडे सुरू होते, पण अभिनयाकडे, कलेकडे मन ओढ घेत होते. १९४३ साली मात्र शिक्षणाची वाट थांबली आणि बाबा गजबर या एका जाणकार चित्रकाराकडे ते चित्रकलेचे धडे गिरवू लागले. दरम्यान शिवचरित्रावर आधारित ‘बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बालशिवाजीची भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी वामन मांडरे यांचे नाव ‘सूर्यकांत’ ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटांत ते ‘सूर्यकांत’ याच नावाने पडद्यावर दिसू लागले.

     व्यायामाने कमावलेले शरीर, मर्दानी आणि रांगडे व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी ग्रामीण बाजाच्या चित्रपटातील भूमिका हुबेहूब वठवल्या. १९५० साली राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘केतकीच्या बनात’ या चित्रपटामध्ये ‘सर्जेराव’ ही टर्रेबाज आणि रगेल नायकाची भूमिका केली. चित्रपट मंडळाकडून ‘फक्त प्रौढांसाठी’ असे शिफारसपत्र मिळालेला हा पहिला मराठी बोलपट होता. सूर्यकांत यांना एकामागून एक चित्रपटांसाठी विचारणा होत गेली. त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात अभिनय केला. या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी मुख्य नायक, खलनायक, साहाय्यक अभिनेता, चरित्र भूमिका, पाहुणा कलाकार, तर काही चित्रपटात विनोदी भूमिकाही साकारल्या. अस्सल कोल्हापुरी ग्रामीण भाषा बोलणार्‍या व धाडसी, कणखर, मर्दानी बाण्याच्या या नायकाने ग्रामीण चित्रपटात एक वलय निर्माण केले. ‘स्त्रीजन्मा तुझी कहाणी’, ‘गृहदेवता’, ‘बाळा जो जो रे’ या चित्रपटातून त्यांनी ब्राह्मणी नायकही रंगवला. त्यांची जयश्री गडकर या अभिनेत्रीबरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली. या जोडीने एकंदरीत सत्तावीस चित्रपट केले. सूर्यकांत यांनी सुलोचना आणि उषाकिरण यांच्याबरोबरही केलेले चित्रपटही नावाजले गेले. ‘शिकलेली बायको’ (१९५९) या चित्रपटात, डॉक्टर असलेल्या सुशिक्षित पत्नीबरोबर पूर्वग्रहाने आणि आकसाने संसार करणारा नायक ‘रघुनाथ’ ही त्यांची उत्कृष्ट भूमिका होती.‘साधी माणसं’ या चित्रपटात रंगभूषेशिवाय साकारलेला ‘शंकर लोहार’ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. १९६५ साली या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘सांगत्ये ऐका’ (१९५९) या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले.‘कन्यादान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सूर्यकांत यांना १९६० साली राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. चित्रपटसृष्टीमध्ये तारखा आणि वेळा पाळणारे सूर्यकांत हे एक निर्व्यसनी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व होते. सूर्यकांत आणि त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत (गोपाळ) यांच्या अतिशय निखळ आणि पारदर्शक बंधुप्रेमाचे दाखले चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनुभवले आहेत. या दोन्ही बंधूंनी चौदा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘लग्नाला जातो मी’ (१९६०) या चित्रपटामध्ये त्यांनी नायक आणि खलनायक अशी दुहेरी भूमिकाही सहजतेने साकारली. प्रभाकर पणशीकर यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या ‘भाव तेथे देव’ (१९६१) या चित्रपटात दर्शनी सरळ स्वभावाचा, पण दुष्ट मनोवृत्तीचा खलनायक उभा केला. चित्रपटात स्वीकारलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षक स्वीकारतील की नाही, अशी शंका वाटत असतानाच त्यांच्या सहजसुंदर आंगिक अभिनयाचे कौतुक झाले. याशिवाय ‘अंतरीचा दिवा’, ‘कलंकशोभा’, ‘माणसाला पंख असतात’, ‘गरिबाघरची लेक’, ‘तू सुखी रहा’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. सूर्यकांत यांना १९६५ साली ‘मल्हार मार्तंड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘शिलंगणाचे सोने’, ‘जय भवानी’, ‘महाराणी येसूबाई’, ‘थोरातांची कमळा’, ‘पावनखिंड’, ‘स्वराज्याच्या शिलेदार’, ‘गनिमी कावा’ या ऐतिहासिक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी एक नवा मापदंड उभा केला. पाणीदार, बोलके डोळे, मर्दानी बलदंड शरीर आणि रुबाबदार वावरणे, यामुळे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सूर्यकांत हुबेहूब उठून दिसत. चित्रपटातील साहसदृश्यात डमी कलाकार न वापरता, त्यांनी घोडेस्वारीची कठीण व जीवावर बेतणारी दृश्ये स्वत: मेहनतीने वठवली. ‘रत्नघर’ या हिंदी चित्रपटात त्यांनी वाघाबरोबरची झुंज असे प्रत्यक्ष दृश्य दिले. चित्रपटसृष्टीचे रंगढंग अनुभवत समर्पणाने अभिनयकला जोपासली. ‘वारणेचा वाघ’ या चित्रपटात सत्तू भोसला ही भूमिका करत असतानाच दिग्दर्शक वसंतराव पेंटर यांनी पटकथा आणि संवादलेखनामध्ये सूर्यकांत यांना सहभागी करून घेतले. सूर्यकांत यांनी १९७८ साली ‘ईर्षा’ या चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले.

     भालजी पेंढारकर, अनंत माने, दत्ता माने, कमलाकर तोरणे, अनंत ठाकूर, गजानन जागीरदार अशा अत्यंत प्रतिभाशाली दिग्दर्शकांच्या चित्रपटातून त्यांना अभिनयाचा अनुभव घेता आला. त्यांनी चित्रपटांच्या बरोबरीने रंगभूमीही गाजवली. त्यांनी पाच ऐतिहासिक, अकरा सामाजिक आणि वीस ग्रामीण नाटकात अभिनय केला. ‘बेबंदशाही’, ‘झुंजारराव’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘लग्नाची बेडी’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘पाठलाग’, ‘दसरा उजाडला’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ अशा कितीतरी नाटकांचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर साधारणपणे २/३ चित्रपटांनंतर, म्हणजे २६ डिसेंबर १९४७ साली सूर्यकांत मांडरे यांचा सुशीला पिसे यांच्याबरोबर विवाह झाला. अभिनयक्षेत्रातील कारकिर्दीच्या काळात कलाकाराला अनेक चढउतार पाहावे लागतात. या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नीने त्यांना अतिशय खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या पत्नीने उदय, किरण आणि प्रकाश या तिन्ही मुलांची जबाबदारी समर्थपणे पेलली. आपल्या व्यस्त वेळापत्रकातही कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी सूर्यकांत तत्पर होते.

     स्वत:मधील चित्रकलाही शक्य तेव्हा त्यांनी जोपासली. चित्रकलेत फिंगर ड्रॉइंगमध्ये आणि पावडर शेडींगमध्ये त्यांचा हातखंडा होता. सूर्यकांत यांनी कोल्हापूरमध्ये राजाराम आर्ट गॅलरी आणि चित्रनगरी व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले. रोजची दैनंदिनी लिहिण्याच्या सवयीतून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा बराचसा भाग लिहून ठेवला होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रोत्साहनाने या दैनंदिनी लेखनाचे ‘धाकटी पाती’ या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकामध्ये रूपांतर झाले. या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्यांनी ‘कोल्हापुरी साज’ आणि ‘कलामहर्षी बाबूराव पेंटर’ या दोन पुस्तकांचेही लेखन केले. प्रतापगडवरील एका कार्यक्रमाच्या दरम्यान एका व्याख्यानातून सूर्यकांत यांच्यातील ‘वक्ता’ हा पैलूही रसिक प्रेक्षकांसमोर आला. सूर्यकांत यांनी पडद्यावरील आपल्या ऐटबाज रुबाबदार उपस्थितीने, स्वच्छ, खणखणीत शब्दोच्चाराने आणि कलेवरील निष्ठेने चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत मोठे काम उभे केले. त्यांच्या एकूण कारकिर्दीसाठी त्यांना १९७३ साली ‘पद्मश्री पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पुढे १९९० साली त्यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ही मिळाला. (चांगल्या) दृश्यासाठी तडजोड न करता किंवा मानवतावादावर अपार श्रद्धा ठेवत, त्यांनी नाटकातील व चित्रपटातील आपला ठसा कायम ठेवला. वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

- नेहा वैशंपायन

संदर्भ
१) मांडरे सूर्यकांत, 'धाकटी पाती', पुरंदरे प्रकाशन, पुणे; १९८६.
२) मांडरे सूर्यकांत, 'कोल्हापुरी साज', पुरंदरे प्रकाशन, पुणे; १९९३.
मांडरे, वामन तुकाराम