Skip to main content
x

मेश्राम, भुजंग

     किनवट तालुक्यातील तुळशी-मलकागुडा या गावात जन्मलेले भुजंग मेश्राम यांचे प्राथमिक शिक्षण याच गावी, तर माध्यमिक शिक्षण किनवट येथे झाले. किनवटच्या आदिवासी वसतिगृहात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मातृभाषा गोंडी असलेल्या मेश्राम यांनी शालेय जीवनापासूनच गोंडी भाषेत काव्यलेखनास प्रारंभ केला. नांदेड येथे बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात उच्चशिक्षणासाठी आले. पत्रकारिता करता-करता गोंडी भाषेसंबंधी संशोधन व लेखनाचे कामही त्यांनी केले.

      ‘ऊलगुलान’ (१९९०) या पहिल्याच कवितासंग्रहातून आपले वेगळेपण दाखवणार्‍या या कवीचा हा संग्रह अत्यंत गाजला तो प्रमाण मराठीसह गोंडी, परधानी, गोरीमाटी, अशा बोलीभाषेतल्या कवितांमळे. ‘ऊलगुलान’ म्हणजे सर्व पातळ्यांवरून केलेला सार्वत्रिक उठाव. बिरसा मुंडा या आदिवासी चळवळीचे नेतृत्व करताना केलेली ‘ऊलगुलान’ ही घोषणा त्यांच्या कवितेचे स्वरूप स्पष्ट करते. एका जंगलातून दुसर्‍या जंगलाकडे जाणार्‍या माणसांचा जीवनाशी चाललेला संघर्ष हे त्यांच्या कवितेचे विश्व असून ते सर्वथा अनोखे असे आहे. ‘बिरसा मुंडा’, ‘भेटलेल्या कविता’, ‘भेदिक’, ‘गावबांधणी’, ‘पांडवानी’, यांसारख्या कविता उपरोधिक आणि वेदना व्यक्त करणार्‍या आहेत.

     ‘अभुज माड’ (२००८) हे भुजंग मेश्राम यांच्या ‘ऊलगुलान’ या पहिल्या संग्रहानंतरच्या बहुतेक सर्व प्रकाशित आणि अप्रकाशित कवितांचे संकलन आहे. अरण्यवसतीतून आलेल्या आणि पन्नाशीच्या आतच हे जग सोडून निघून गेलेल्या भुजंग मेश्राम यांच्या या कविता समकालीन मराठी कवितेतला प्रखर आणि अनन्यसाधारण टप्पा आहे.

      प्रचंड सर्जनशक्ती अद्भुत भाषासामर्थ्य, कुठल्याही कवितेत प्रमाण भाषेतून बोलीभाषेत आणि बोलीभाषेतून प्रमाण भाषेत अगदी सहजपणे होणारी अकृत्रिम स्थित्यंतरे, विलक्षण शब्दयोजना आणि नव्या व अर्थसंपृक्त शब्दरूपांची निर्मिती, समकालीन जागतिक वास्तवाची जाण, भावात्मकतेतून बौद्धिकतेत होणारे संक्रमण, बौद्धिक आकलनातून येणारी चिंतनशीलता, साशंकतेतून आणि सतर्कतेतून येणारा खोलवरचा व तीव्रतर उपहास-उपरोध, अनुभवांनाच ज्ञानतंतू करण्याचा प्रयत्न, अढळ बांधिलकी इत्यादी अनेक गुणवैशिष्ट्यांनी त्यांची कविता महत्त्वाची झाली आहे. समकालीन जगण्यातल्या एकूणएक घटनांचे, विकारांचे आणि विचारांचे धागेदोरे राजकीय वास्तवाशीच जोडलेले आहेत, या त्यांच्या दृढ विचारामुळे त्यांची कविता अनन्य होते.

- प्रा. सुहास बारटक्के

मेश्राम, भुजंग