Skip to main content
x

मराठे, एम. आर.

          म.आर. मराठे यांनी १९४४मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय पदवी आणि त्यानंतर गाई-म्हशी या रवंथ करणार्‍या प्राण्यांच्या रोगासंबंधी आंतरराष्ट्रीय पदविका प्राप्त केली. त्यांनी १९४४मध्ये मुंबई राज्याच्या पशुवैद्यकीय खात्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीची सुरुवात केली. त्यांची १९४९मध्ये आरे दूध वसाहतीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून प्रतिनियुक्ती झाली.

          आरे दूध वसाहतीत निरनिराळी युनिटस् स्थापनेसाठी योजना व आराखडे तयार करून योजनेप्रमाणे युनिटस् सुरू करण्यात डॉ. मराठे यांचे मोठे योगदान होते. त्यांनी वसाहतीतील म्हशींसाठी नियमित चोवीस तास औषधोपचाराची व्यवस्था केली. त्यांनी मध्यवर्ती ठिकाणी कृत्रिम रेतन केंद्र स्थापन केले. या केंद्रात पैदाशीचे रेडे जोपासले जात. या केंद्रामुळे वसाहतीमध्ये पैदाशीची सोय उपलब्ध झाली. त्यांनी आरे दूध वसाहतीमध्ये पदोन्नती मिळाल्यामुळे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी तथा पशु-संवर्धन अधिकारी म्हणून काम केले. अमेरिकेत १९६५मध्ये झालेल्या जागतिक पशुवैद्यकीय मेळाव्याला डॉ. मराठे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. तेथे त्यांनी म्हशींचे व्यवस्थापन आणि प्रजननातील अडचणी या विषयावर निबंध वाचले. म्हशींमधील प्रजनन, आहार, व्यवस्थापन, औषधोपचार, कृत्रिम रेतन इ. सर्व क्षेत्रातील त्यांच्या मूलभूत योगदानाबद्दल आणि या विषयाचा त्यांचा व्यासंग यामुळे त्यांना ‘भारतीय म्हशींबद्दल तज्ज्ञ माणूस’ (इंडियन बफेलो मॅन) म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हशींच्या पारड्या-रेडके दुर्लक्ष झाल्याने मृत्युमुखी पडत. डॉ. मराठे यांनी योग्य प्रकारे जोपासना करून त्यांना वाढवण्याची योजना सुरू केली. त्यांनी १९६९मध्ये उरळीकांचन येथील भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान या संस्थेत उपसंचालक म्हणून नोकरी स्वीकारली. या संस्थेत उपकेंद्रे स्थापन करून त्यांच्याद्वारे कृत्रिम रेतन कायम विस्तृत स्वरूपात करण्यात त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत. शस्त्रक्रियेद्वारे गाई-म्हशींच्या पोटातून खिळे, तारा इत्यादी वस्तू बाहेर काढणारे डॉ. मराठे हे पहिले भारतीय पशुवैद्य होते.

          - संपादित

मराठे, एम. आर.