Skip to main content
x

नागवडे, शिवाजी नारायण

शिवाजी नारायण नागवडे यांचा जन्म श्रीगोंदा येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण श्रीगोंदा येथेच झाले. शिक्षण संपताच त्यांनी पारंपरिक शेती व्यवसायाला सुरुवात केली. परंतु त्यात मन न रमल्यामुळे त्यांनी सामाजिक कार्य करण्याचे ठरवले. राजकारणाची अजिबात पार्श्वभूमी नसलेल्या नागवडे यांनी आपल्या गावामध्ये सहकार चळवळ उभारली. त्यातून त्यांनी शेतकरी वर्गाचा व एकूणच तालुक्याचा विकास घडवून आणला. अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग दुष्काळी म्हणून ओळखला जाई. पाण्याच्या अभावी हा प्रदेश मागास राहिला. म्हणून नागवडे यांनी 1952 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी विशाल कुकडी पाणी परिषद भरवली व घोड कुकडीचे पाणी आणून श्रीगोंदा तालुक्याचा कायापालट केला. त्यांनी कुकडी धरणातील पाणी विसापूर धरणांत सोडण्याकरीता 16 कि.मी.  लांबीच्या कालव्याचे काम करून घेतले व डॉ. शिवाजीराव निलंगेकर (माजी मुख्यमंत्री) यांच्याकडून खास मान्यता मिळवून विसापूर धरणांत पाणी सोडले. तसेच घोड धरणातील पाणी जास्तीत जास्त लाभधारकांना मिळावे व सिंचन क्षेत्र वाढावे याकरीता त्यांनी बारमाही धोरणाची तरतुद करून घेतली. कृष्णा खोरे विकास महामंडळा अंतर्गत असणार्‍या 18.15 कि.मी. लांबीच्या व 100 कोटी रु. खर्चाची ऐतिहासिक भोसा खिंड योजना त्यांनी मंजूर करून घेतली व काम युद्धपातळीवर सुरू करण्यात ते यशस्वी झाले. या क्रांतीकारी योजनेमुळे 31 गावातील 8500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. नागवडे यांनी डबघाईला आलेल्या कारखान्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न केले. जयभवानी सहकारी साखर कारखाना मर्या. गेवराई येथे 2 वर्ष मार्गदर्शक म्हणून काम केले. शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या शेती कर्जावरील व्याज दर कमी करण्याकरीता शेकडो शेतकर्‍यांसह रिझर्व बँक कार्यालय, मुंबई येथे मोर्चा व निदर्शने काढली. 1983 मध्ये दिल्ली येथे झालेल्या किसान मेला कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांसह ते सहभागी झाले. श्रीगोंदा तालुक्यातील विविध रस्ते, नदीवरील पुलांची बांधणी करून दळणवळण वाढीसाठी व रहदारी सुलभ होण्याकरता त्यांनी बहुमोल असे योगदान दिले. नगर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला व वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना 1957 ते 1972 या काळात पद मिळाले.

नागवडे वागंदरी या गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच होते. तसेच त्यांनी 1958 ते 1968 या कालावधीत वागंदरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्षस्थान भूषविले. ते श्रीगोंदा पंचायत समितीचे सदस्यही होते. त्यांनी ‘दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन’ या संस्थेचे प्रथम उपाध्यक्ष व नंतर अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी 1992 ते 1996 या काळात नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्लीचे संचालकपद सांभाळले. त्याचबरोबरीने त्यांनी नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑप. मर्या; वसंतदादा शुगर इन्स्ट्यिूट मांजरी; महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ; दि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.; आदींचे संचालक म्हणूनही काम पाहिले.

श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना हा आधी खाजगी मालकीचा होता. नागवडे यांनी रंगरावबाबा बंदरकर, आण्णा पाचपुते, आबासाहेब लगड, खासेराव काका वाबळे आदींच्या सहकार्याने  तो कारखाना विकत घेतला. त्यांनी 1973 ला श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची पुन:उभारणी केली व पहिला गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला. या कारखान्याच्या उभारणीमुळे श्रीगोंदा येथील कामगार, सभासद व शेतकरी यांचा आर्थिक विकास झाला. शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य भाव मिळवून द्यावा व त्यांचे आर्थिक नुकसान टळावे या उद्देशाने नागवडे यांनी श्रीगोंदा तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. ची स्थापना ढोकराई येथे केली. या संघाचे ते संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शेतकर्‍यांच्या मुलांचा सजगपणे विचार करून नागवडे यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था स्थापन केल्या व या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी निष्ठेने व प्रामाणिकपणे भूषविले. त्यांनी 1983 मध्ये पदविका तंत्रनिकेतनची स्थापना केली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हे पहिले तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. तसेच त्यांनी 22 माध्यमिक विद्यालये व दोन बालवाड्या सुरू करण्याचे कामही आस्थेने केले.

सामाजिक कार्याचा व्यासंग असणार्‍या नागवडे यांनी राजकारणही तितक्याच तत्त्वनिष्ठेने केले. त्यांनी वसंतदादा पाटील, शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण व सहकार यांच्या तत्त्वांचे धडे गिरवले. त्यांचे कार्य केवळ श्रीगोंदा तालुक्यापुरते सीमित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. म्हणूनच डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली व त्यांनी नंतर त्याचे अध्यक्षस्थानही भूषविले होते. त्यांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास लक्षात घेऊन त्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, राज्यस्तरीय खरेदी समिती व नॅशनल फेडरेशन, नवी दिल्ली अशा महत्त्वपूर्ण संस्थांवर निवड झाली.

नागवडे यांची सातत्यपूर्ण कामे लक्षात घेऊन त्यांना इंटरनॅशनल फे्रंडशिप सोसायटीतर्फे ‘विजयरत्न’ हा प्रतिष्ठित पुरस्कार अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल माताप्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फ्रेंडशिप फोरम ऑफ इंडिया यांच्याकडून त्यांना ग्लोरी ऑफ इंडिया इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड देण्यात आले, तर महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनतर्फे जेष्ठ पत्रकार मधुकर भावे व कवी अरुण दाते यांच्या उपस्थितीत विद्याभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला गेला.

- भाऊसाहेब बांदल

नागवडे, शिवाजी नारायण