नारखेडे, मधुकर नामदेव
मधुकर नामदेव नारखेडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण दुधलगाव येथेच झाले आणि माध्यमिक शिक्षण शेलगाव बाजार येथे झाले. १९६०मध्ये त्यांनी मॅट्रिक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आणि नंतर नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी १९६४ मध्ये प्रथम श्रेणीत चौथ्या क्रमांकाने मिळवली. त्यांनी एम.एस्सी.(कृषी) पदवी वनस्पतिशास्त्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. त्या वेळी त्यांना माधवराव देशपांडे सुवर्णपदक देऊन गौरवले. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.त प्रवेश घेऊन १९७४ मध्ये पीएच.डी. मिळवली. त्यांच्या संशोधनाचा विषय गव्हाच्या अन्युप्लॉइडशी संबंधित होता. या संशोधनामधून त्यांनी ५ संशोधनपर लेख जपान, जर्मनी आणि हंगेरी या देशांच्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांनी गॉटिगन विद्यापीठामध्ये (जर्मनी) १९७४ ते १९७६ या काळात सायटोजेनेटिक्स विषयात पोस्ट डॉक्टरेटसाठी संशोधन केले व पुन्हा याच संस्थेत १९९४मध्ये जीव-तंत्रज्ञानशास्त्रामध्ये संशोधन केले. वनस्पतिशास्त्रामध्ये संशोधन क्षेत्रात त्यांनी म्युुटेशन ब्रीडिंग व सायटोजेनेटिक्स या विषयात मूलभूत काम केले. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ७५ शास्त्रीय लेख लिहिलेले आहेत. त्यांनी गॉटिगन विद्यापीठात ३ युरोपीयन गव्हाच्या जातींमध्ये मोनोसोमिक्स विकसित केले आणि त्याचा उपयोग गव्हाच्या गेरवा रोग प्रतिबंधित जाती निर्माण करण्यामध्ये झाला. याच संस्थेमध्ये त्यांनी ‘पॉलन कल्चर’ व ‘प्रोटोप्लास्ट हायब्रिडायझेशन’ या विषयावर संशोधन केले. तसेच त्या वेळी मोहरी पिकाच्या संशोधनावर त्यांचे काम चालू होते. या संशोधनामुळे मोहरी पिकाच्या संकरित जाती निर्माण करण्यात मदत झाली.
डॉ. नारखेडे १९७४ सालापासून डॉ. पं.दे.कृ.वि.मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अमरावती विद्यापीठामध्ये सहयोगी प्राध्यापक पदावरही काही काळ काम केले. ते १९९८ मध्ये परत डॉ. पं.दे.कृ.वि.मध्ये वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झाले व नंतर तेथूनच ते निवृत्त झाले. त्यांना १९७९-१९८० साली उत्तम शिक्षक म्हणून गौरवण्यात आले. तसेच त्यांना १९८७ मध्ये डॉ. के.जी. जोशी उत्कृष्ट संशोधक पुरस्कार देऊन डॉ. पं.दे.कृ.वि.ने गौरवले आहे.