Skip to main content
x

ओक, श्याम नीळकंठ

     श्याम नीळकंठ ओक हे चित्रपट समीक्षक व लेखक म्हणून सर्वपरिचित असणारे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. बी.पी. सामंत यांच्या जाहिरात कंपनीत प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहत होते. तसेच जाहिरातीची कॉपी लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता.

     आपल्या लेखणीच्या माध्यमातून चित्रपटाची जाहिरात करणारे ओक शब्दांच्या यथोचित वापराबाबत नेहमी सजग असत, म्हणूनच खलनायकाच्या भूमिकेत वावरणाऱ्या बाबूराव पेंढारकर यांनी हंसच्या ‘देवता’ चित्रपटात त्यांना प्रथमच नायकाची भूमिका केली. त्या प्रसंगी श्यामरावांनी त्या चित्रपटाची जाहिरात करताना म्हटले की, ‘पडद्यावरचा बदमाश सुधारला.’

     ‘प्रतिभा’ या तत्कालीन महत्त्वाच्या साप्ताहिकातून ओक चित्रपटाची परीक्षणे करत. ती परीक्षणेही खास शामराव पद्धतीची असत. त्या वेळेस हंसचा ‘छाया’ हा बोलपट प्रचंड गाजला. त्या चित्रपटाचे परीक्षण करताना शामराव म्हणतात, ‘पांडुरंगाची कृपा लाभल्याने या बोलपटाचे यश निश्‍चित होऊन त्याला सुवर्णपदक लाभले.’ यातील पांडुरंग नाईक या छायाचित्रकाराला आणि त्यांच्या नेत्रसुखकारक छायाचित्रणाला त्यांनी दिलेली ही दाद, अत्यंत समर्पक व परिणामकारक शब्दांच्या मांडणीतून ओक सहजपणे सांगून जातात.

     तसेच प्रभातचा ‘अमरज्योती’ हा दर्यावर्दी चित्रपट म्हणून प्रभात त्याची जाहिरात करत असे. त्या चित्रपटांचे परीक्षण करताना ओक लिहितात, ‘प्रभातच्या या चित्रपटात दर्या फक्त वर्दी लावण्यापुरता दिसतो.’ मिश्कीलपणा हा त्यांच्या लेखणीचा गुण त्यांच्या परीक्षणांमधून सहजगत्या उमटून जातो. प्रतिभामध्ये त्यांनी प्रभातच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटाचे दीर्घ परीक्षण लिहिले होते. पॉप्युलर प्रकाशन संस्थेने ‘धर्मात्मा’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गाणी असणारे दर्जेदार पुस्तक काढले. प्रतिभामध्ये श्यामराव ओक यांनी लिहिलेल्या परीक्षणाचा संपूर्ण भाग त्या पुस्तकात घेतला आहे, हे आवर्जून नमूद केले पाहिजे. पुढे १९३९-४० साली श्यामरावांनी जाहिराती आणि परीक्षण करण्याचे सोडून दिले व उत्तमोत्तम ग्रंथ लिहिण्यास सुरूवात केली. ‘गलोल’, ‘बाभळवनात’, ‘मालगाडी’, ‘परिहास’, ‘हवेवर’, ‘नवमिका’ हे त्यांचे काही ग्रंथ आजही आवर्जून वाचले जातात. ‘शामराई’ या त्यांच्या गाजलेल्या विनोदी संग्रहाला पु.ल. देशपांडे यांची प्रस्तावना आहे.

     परीक्षणे व जाहिरात लेखनाने चित्रपट क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या ओक यांचे पुण्यात निधन झाले.

- संपादित

ओक, श्याम नीळकंठ