Skip to main content
x

पाबळकर, वामन नारायण

वामन नारायण पाबळकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील नारायण यांचे अकाली निधन झाल्यावर आई सावित्रीबाई यांनी अत्यंत कष्टाने दोन्ही मुलांना वाढवले. बालवयापासूनच वामन पाबळकरांना संगीताची रुची होती. त्या काळी चालणार्‍या मेळ्यांमध्ये ते गात व हार्मोनिअमही वाजवत असत.
गोविंद टेंबे यांच्याकडे ते हार्मोनिअमवादन शिकले. मात्र नंतर गायनाची रुची वाढून त्यांनी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा गंडा बांधला. मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या सहवासातून त्यांनी रागसंगीताची मर्मस्थळे जाणून घेतली. गायन व हार्मोनिअमवादनाबरोबरच ते जलतरंग हे वाद्यही उत्तम वाजवत असत.
१९४५ साली हार्मोनिअम या वाद्यास आकाशवाणीवर बंदी घालण्यात आली. ही बंदी उठवण्यासाठी पाबळकरांनी प्रदीर्घ काळ लढा दिला. तत्कालीन प्रसारणमंत्री वसंत साठे व अन्य शासकीय अधिकार्‍यांशी चर्चा घडवून आणल्या व त्यांच्या प्रयत्नांना काही अंशी यशही आले. १९७२ साली इंदिरा गांधी यांनी ही बंदी आंशिक प्रमाणात उठवल्याचे जाहीर केले व त्याप्रमाणे केवळ ‘अ’ दर्जा प्राप्त कलाकारांच्या साथीसाठी हार्मोनिअम वापरण्याची परवानगी देण्यात आली. हा निर्णय पाबळकरांना मोठे समाधान देणारा होता. दिल्ली दूरदर्शनवर १९७८ साली एकल हार्मोनिअम वादनाचा कार्यक्रमही प्रसारित झाला. मुंबई दूरदर्शनवरही त्यांची हार्मोनिअम विषयक मुलाखत प्रक्षेपित झाली.
पाबळकरांनी हार्मोनिअम या वाद्यास मैफलीत प्रतिष्ठा देण्याच्या हेतूने अनेक ठिकाणी सप्रयोग व्याख्याने दिली, तसेच एकल हार्मोनिअम वादनाच्या मैफली केल्या.  पु.ल. देशपांडे हे ‘बटाट्याची चाळ’च्या दरम्यान स्वतंत्र हार्मोनिअम वादनाच्या दृष्टीने पाबळकरांकडे काही शिकत होते. तसेच डॉ. माधव थत्ते व डॉ. अरविंद थत्ते यांनीही काही काळ पाबळकरांचे मार्गदर्शन घेतले.
‘पूना म्युझिकल सर्कल’ या संस्थेची १९३३ साली स्थापना करून पुढची ३५-४० वर्षे पाबळकरांनी अनेक दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम करून रागसंगीताबद्दलची रसिकांची अभिरुची संपन्न करण्याचे मोठे कार्य केले. बडे गुलाम अली, मोगूबाई कुर्डीकर, केसरबाई केरकर, कुमार गंधर्व, आमीर खाँ, गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, इ. गायक व अली अकबर खाँ, रविशंकर, बिस्मिल्ला खाँ, पन्नालाल घोष, विलायत खाँ, सामताप्रसाद, किशन महाराज, इ. वादक आणि नर्तकांमध्ये गोपीकृष्ण, सितारादेवी, बिरजू महाराज, वैजयंतीमाला अशा अनेक कलाकारांचे कार्यक्रम त्यांनी पुण्यात आयोजित केले.
हार्मोनिअम या वाद्यास प्रतिष्ठा मिळवून देण्यास अपार परिश्रम घेणारे पाबळकर व्यवसायाने एक यशस्वी डॉक्टर होते. त्यांचे ‘पाबळकर नर्सिंंग होम’ आजही पुण्यातील सुभाषनगर भागात आहे. मात्र डॉक्टरकीच्या पेशापेक्षा संगीत क्षेत्रासाठी त्यांचे अधिक संस्मरणीय योगदान आहे. हार्मोनिअमला आकाशवाणीवर असलेली बंदी उठवण्यासाठी व एकल हार्मोनिअम वादनाच्या प्रसारासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा मोठा काळ व्यतीत केला. डॉ. पाबळकरांनी संगीताकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून न पाहता एक सांस्कृतिक कार्य म्हणून पाहिले.
त्यांचे निधन पुण्यात झाले. त्यांच्या निधनानंतर १९८३ साली तत्कालीन प्रसारणमंत्री बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या हस्ते पुणे आकाशवाणी केंद्रात त्यांच्या छायाचित्राचे अनावरण पं. भीमसेन जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

चैतन्य कुंटे

पाबळकर, वामन नारायण