Skip to main content
x

पाटणकर, बाळकृष्ण गोविंद

     बाळकृष्ण यांचे वडील गोविंदराव भोरच्या राजाकडे मामलेदार हुद्द्यावर कार्यरत होते. बाळकृष्ण यांचे इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण भोर येथे झाले. त्यांना व्यायामाची अतिशय आवड होती. त्यांची शरीरयष्टी अत्यंत दणकट व मजबूत होती. त्यांना लष्करात नोकरी मिळाली होती, परंतु चांगली कामगिरी करूनही केवळ हिंदुस्थानी म्हणून इंग्रजांनी त्यांना बढती नाकारली.  स्वाभिमानी व कर्तृत्वसंपन्न पाटणकरांनी ती नोकरी सोडली.

      नंतर पुणे येथे लिमये महाराजांकडे मसाज करण्याचे शिक्षण घेऊन ते विलेपार्ले, मुंबई येथे स्थायिक झाले. तेथेच पार्ले टिळक विद्यालयात व्यायाम शिक्षक म्हणून त्यांनी २८ वर्षे सेवा- केली. कांदिवली, मुंबई येथे शारीरिक प्रशिक्षणाची (पी.टी) चे नियमित शिक्षण घेतले.  शाळेला विस्तृत मैदान लाभले होते व शाळेची व्यायाम शाळाही होती. रोज सकाळी पाटणकर व्यायाम शाळेत मुलांना शिक्षण देत. त्यांनी मुलांमध्ये व्यायाम व खेळाची आवड उत्पन्न करून त्यांना सूर्य नमस्कार, बैठका, धावकी, मल्लखांब, हुतुतू, खोखो, लंगडी, बास्केटबॉल यांचे विशेष शिक्षण देऊन या सर्व प्रकारांचे संघ तयार केले. हुतुतू व खोखोच्या संघांनी शाळेला अनेक ढाली व बक्षिसे मिळवून दिली. बास्केट बॉलसाठी प्रशिक्षक आणवून, स्वत: शिक्षण घेऊन त्यांनी मुलांची व मुलींची शास्त्रशुद्ध तयारी करवून घेतली. पाटणकरांच्या बास्केटबॉल संघाने शाळेचे नाव महाराष्ट्रातच नव्हे, तर दिल्लीतही राष्ट्रीय पातळीवर गाजवले. 

      मंगला जनार्दन भिडे (आता वैशाली विजय दामले) ही बास्केटबॉलच्या राष्ट्रीय पातळीवर खेळलेली खेळाडू होय. १९५५ च्या पार्ले चॅलेंजर संघात हुतुतू साठी पार्ले टिळक विद्यालयाच्या खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. त्यापैकी नलिनी फडणीस, वेणू कुंटे (आता मराठे, प्रभावती नवाथे, नलिनी सहस्रबुद्धे ही काही नावे.) पाटणकर सर सकाळी लवकर उठून खेळाडूंना त्यांच्या घरी जाऊन उठवत व शाळेच्या मैदानावर त्यांना आणून त्यांची कसोशीने तयारी करून घेत. त्यांनी अनेक प्रसंगी स्वत:च्या पैशांनी मुलामुलींना खायला-प्यायला दिले. प्रशिक्षणासाठी त्यांना कोणतेही भत्ते वा वेतन मिळत नसे. पाटणकरांचे एकच व्यसन ते म्हणजे व्यायाम व खेळ.

       शाळेचे मैदान हीच त्यांची कर्मभूमी. शाळेला नाव मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या जिवाचे रान केले. त्यांच्या कारकिर्दीत शाळेला अनेकदा हिंद पारितोषिक  मिळाले. त्यांच्या पत्नी सुशीला या देखील शिक्षिका होत्या. शिक्षणाची मनस्वी आवड असणाऱ्या पाटणकरांनी लग्नानंतर आपल्या पत्नीला बी. ए बी. एड. केले. सुशीलाबाईंची आपल्या पतीला मोलाची साथ मिळाली. पाटणकर यांचा आवाज धारदार व खडा होता.  २६ एप्रिल १९६८ रोजी ते निवृत्त झाले, त्यानंतरही त्यांनी बास्केटबॉल, खोखो, हुतुतू चे प्रशिक्षक या नात्याने अनेक संघ तयार केले. हे करत असताना त्यांनी होमिओपॅथीचे व आयुर्वेदिक औषधांचे शिक्षण घेतले. ते नावाजलेले मसाजिस्ट व बोन सेटर होते. सरकारी दरबारी ‘व्यायाम पाटणकर’ अशीच त्यांची ख्याती होती. 

      - वि. ग. जोशी

संदर्भ
१.बर्वे, रा. ग. , फणसळकर र. ब.,संकलक व लेखक ; ‘विलेपार्ले अमृत स्मृती ग्रंथ’ :
पाटणकर, बाळकृष्ण गोविंद