Skip to main content
x

दाणी, श्रीकृष्ण गोपाळ

     गणित अध्ययनाची मुळीच पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात श्रीकृष्ण गोपाळ दाणी यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गणितज्ञाचा बेळगाव येथे जन्म झाला. इंटर सायन्सपर्यंत बेळगावात शिक्षण घेतलेल्या दाणींनी १९६५ साली मुंबईच्या विज्ञान संस्थेत प्रवेश घेतला व पुढे मुंबई विद्यापीठाच्या बी.एस्सी. (१९६७) व एम.एस्सी. (१९६९) परीक्षेत प्रावीण्य संपादन केले, तर एम.एस्सी.नंतर त्यांनी मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील (टी.आय.एफ.आर.) नामवंत गणिती प्रा.एम.एस. रघुनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली (१९७५). यानंतरचे संशोधन (पोस्ट डॉक्टरेट रिसर्च) करण्यासाठी अमेरिकेतील न्यू जर्सी प्रांतातील प्रिन्स्टन येथील इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीजमध्ये (१९७६-७७) डॉ. दाणी यांना संधी मिळाली. तद्नंतर दाणी मुंबईच्या टी.आय.एफ.आर.मध्ये अध्यापन व संशोधनकार्य करत असून आता वरिष्ठ प्राध्यापकपदी कार्यरत आहेत.

      गणिताच्या भिन्न-भिन्न शाखांमध्ये दाणी यांनी उच्च दर्जाचे संशोधन केले आहे. एरगॉडिक सिद्धान्त, गतिशास्त्र, ली-गट, डायोफेटीय आसन्नीकरण आणि गटांवरील संभाव्यतामान यांत डॉ. दाणींची विशेषता आहे. थोड्या अधिक तपशिलात सांगायचे तर, ली-गटाच्या एकविध अवकाशावर होणाऱ्या एकशक्तिमान ओघाचा अभ्यास व ली-गटावरील संभाव्यतामान, तसेच एकविध अवकाशावरील कक्षांच्या वर्तणुकींच्या संदर्भात संवृत्ती, वितरण, पुनरावर्तन, परिबद्धता व अपसरण यांसंबंधात दाणींच्या एकसमान पुनरावर्तनातील निष्कर्षांची, राटनर यांच्या रघुनाथन तार्किकेच्या सिद्धतेच्या संदर्भात महत्त्वाची मदत झालेली आहे. तसेच राटनर यांच्या एक समान वितरण प्रमेयात व ओपनहेम तार्किकेचे संख्यात्मक रूपांतर सिद्ध करण्यात, गणितात नोबेल पारितोषिकाच्या तोडीचे असलेले ‘फील्ड्स मेडल’ मिळवणारे जी. ए. मार्गूलीस यांच्याबरोबर डॉ. दाणी यांनी लक्षणीय सुधारणा सुचवलेली आहे. १९८० सालापासून त्यांनी अभिजात संभाव्यतेच्या सापेक्ष प्रमाणात वाढ करून ती अधिक व्यापकपणे स्थानीयत: संहत गटावरील खास करून ली-गटांवरील संभाव्यतामान काढण्यात रस घेतला. या क्षेत्रात दाणी यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर काम करून सतत एक प्राचलीय वळणाऱ्या अर्धगटात अनंतत: विभाज्य संभाव्यतामानाची अंत:स्थापना करण्यासंबंधीच्या प्रश्‍नांवर नमुनेदार निष्कर्ष मिळविले आणि या विषयांच्या स्पष्टीकरणार्थ अथवा परीक्षणार्थ बरेच लेख लिहिले आहेत.

     डॉ. दाणी यांनी आतापर्यंत केलेल्या संशोधनाचे महत्त्व ओळखून त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झालेले आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या भारतातील तीनही अकॅडमींचे ते फेलो आहेत. तसेच त्यांना इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचा तरुण शास्त्रज्ञासाठीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे (१९७६). याव्यतिरिक्त मानाचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना १९९० साली मिळाला आहे. झूरिच येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय गणितज्ञांच्या परिषदेत ते निमंत्रित व्याख्याते होते (१९९४). विकसनशील देशांसाठी असलेल्या -ट्वॉस-थर्ल्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे नोव्हेंबर २००७ साली जाहीर झालेला गणितासाठीचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. ‘मेझर्स अँड डायनॅमिक्स ऑन ग्रूप्स अँड होमोजीनियस स्पेसेस’ या विषयावर १७ ते २२ डिसेंबर २००७ च्या दरम्यान टी.आय.एफ.आर.मध्ये भरलेली परिषद, त्या वर्षाच्या जूनमध्ये झालेल्या डॉ. दाणींच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या सन्मानार्थ आयोजित केलेली होती.

     युरोप व अमेरिकेतील बऱ्याच विद्यापीठांतून, तसेच संशोधन संस्थांमधून डॉ. दाणी यांना अभ्यागत व्याख्याते व इतर शैक्षणिक कारणांमुळे वेळोवेळी पाचारण करण्यात आलेले आहे. अशा संशोधन संस्थांत केंब्रिजची सर आयझॅक न्यूटन इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज, प्रिन्स्टन इत्यादी, तर विद्यापीठांत शिकागो, मँचेस्टर, गॉटिंगेन, न्यू कॅसल (ऑस्ट्रेलिया) इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, हंगेरी, पोलंड, इस्रायल, इटली, ब्राझील इत्यादी देशांत झालेल्या चर्चासत्रांत किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांतून निबंधवाचन अथवा वक्ते म्हणून दाणी सहभागी झालेले आहेत.

      १९९६ सालापासून डॉ. दाणी राष्ट्रीय उच्च गणित मंडळाचे (नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथेमॅटिक्स) सभासद असून २००६ सालापासून ते त्या मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पेलत आहेत. अशाच प्रकारे गणिताशी संबंधित देशी-विदेशी संस्थांनी त्यांच्यावर वेळोवेळी सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्यादेखील ते कुशलतेने सांभाळत असतात. आंतरराष्ट्रीय गणित संघाच्या विकास व आदानप्रदान करणाऱ्या आयोगाचे दाणी हे २००२ सालापासून सभासद असून आता इ.स. २००६ ते २०१० या कालावधीसाठी त्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे.

      गणिताच्या विविध अंगांवर डॉ. दाणी यांचे नव्वदच्यावर शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. विविध देशी-विदेशी गणिती संशोधन नियतकालिकांच्या संपादक मंडळांत त्यांचा समावेश असून त्याद्वारेदेखील डॉ. दाणींनी गणिती प्रकाशनकार्यात योगदान दिलेले आहे. आयोजनात त्यांचा सहभाग असलेल्या गणितविषयक आंतरराष्ट्रीय कृतिसत्रे/परिषदांशी निगडित ग्रंथांच्या संपादनाचे कार्यही दाणींनी केलेले आहे. 

प्रा. स. पां. देशपांडे

दाणी, श्रीकृष्ण गोपाळ