Skip to main content
x

पेंढारकर, मारुती सीताराम

     मारुती सीताराम तथा दादासाहेब पेंढारकर एम.ए.एम.एड होते. मराठी, संस्कृत व इंग्रजी या भाषांचे ते उत्तम अध्यापक होते. मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीस सुरुवात केली आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून १९६२ पर्यंत उत्तम काम केले. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासू वृत्ती वाढावी यासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरू केले. ‘मुलांची संसद’ होती, तिचे त्यांनी ‘छात्र समिती’ मध्ये रूपांतर करून कामास चालना दिली. खंडित झालेले खेळांचे उपक्रम त्यांनी सुरू केले. विविध क्रीडास्पर्धांसाठी शाळेचे संघ पाठवून खेळाडू तयार केले, शाळेचे नाव क्रीडाक्षेत्रातही मोठे केले.

     १९४५ ते १९४७ पर्यंत पेंढारकर कराचीच्या ‘मराठा विद्यालया’चे मुख्याध्यापक होते. त्यांचे विद्यार्थी ग. ना.सप्रे, प्र.शं. जोशी व व. दि.कुलकर्णी हेही या शाळेत होते. मिशनरी वृत्तीने कराचीतील या विद्यालयातील मुलांमध्ये त्यांनी बदल घडवून आणला, त्यांचा आत्मविश्‍वास जागा केला. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटत गेले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रवेश, प्राज्ञ परीक्षांचे वर्ग तेथे सुरू झाले.

     ऑगस्ट १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली. पेंढारकर आपला मौल्यवान ग्रंथसंग्रह घेऊन सप्टेंबर महिन्यात भारतात परतले व पार्ले टिळक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी श्रीमती सुलभा पाणंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.एड. पदवी मिळविली होती. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा सखोल अभ्यास करून त्यांचे शास्त्र त्यांनी तयार केले होते. त्यांचा उपयोग शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते करीत. त्यांच्याबरोबर आलेले ग. न. सप्रे पुढे १९६३ ते ६५ या काळात लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह झाले. व. दि. कुलकर्णींनी पुढे पार्ले महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. तेथील मराठी विभागाचेही ते प्रमुख होते. लोकमान्य सेवा संघाचे ते १९६७ ते ७१ या काळात उपाध्यक्षही होते.

      १९६२ मध्ये मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होताच फेडरेशन ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स ऑफ विलेपार्ले या संस्थेने आपला शैक्षणिक विभाग त्यांच्यावर सोपविला. त्यांनी प्राथमिक विभागाची आखणी केली. तसेच शाळांमधील स्वच्छतेविषयी सुद्धा त्यांनी बहुमोल सूचना केल्या. त्याची फेडरेशनने महापालिकेच्या मदतीने प्रत्यक्ष कार्यवाही केली. स्थानीय ‘लोकमान्य सेवा संघाचे ते आजीव’ सदस्य होते.

      पार्ल्यातील काही नागरिकांनी एकत्र येऊन लोकमान्य टिळकांचे स्मारक म्हणून १९२३ मध्ये लोकमान्य सेवा संघाची स्थापना केली. समाजामध्ये सामाजिक, राजकीय व धार्मिक जागृत करण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली. १९८२ मध्ये त्यांच्या स्मरणार्थ लोकमान्य सेवा संघाने कै. मा.सी.पेंढारकर वाचनालय व अभ्यासिका सुरू केली. पेंढारकरांचा मोठा ग्रंथसंग्रह संस्थेस मिळाला.

      - वि. ग. जोशी

संदर्भ
१.      पार्ले टिळक विद्यालय - हीरक महोत्सव स्मरणिका
२.      कुलकर्णी,  डॉ. व. दि. ‘माझे गुरुकुल ’- सोहम् प्रकाशन
पेंढारकर, मारुती सीताराम