Skip to main content
x

पांढरीपांडे, श्रीकृष्ण लक्ष्मण

भैयाजी पांढरीपांडे

      श्रीकृष्ण लक्ष्मण तथा भैय्याजी पांढरीपांडे यांचा जन्म नागपूर येथे झाला. मुळात त्यांचे घराणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तहसिलातील धापेवाडा या गावचे होते. त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात नागपुरातील मुन्शीच्या देवळाजवळील एका खाजगी शाळेत झाली आणि नंतर इतवारी दरवाजा येथील प्राथमिक शाळेत दुसऱ्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतला.  १९१० मध्ये नागपूरमधील तत्कालीन निलसिटी हायस्कूलमध्ये (हल्लीचे दादासाहेब धनवटे नगर विद्यालय) पुढील शिक्षण झाले. १९१७ मध्ये अलाहाबाद विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा त्यांनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली त्या वेळच्या पद्धतीनुसार इ.स.१९१९ मध्ये त्यांचा विवाहही झाला. १९२० मध्ये असहकारितेच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला व त्यामुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले; परंतु १९२२ मध्ये टिळक विद्यापीठ पुणे यांची बी.ए. ची पदवी त्यांनी प्राप्त केली.

      भंडारा येथे १९२१ ते १९२३ या काळात ‘लोकमान्य राष्ट्रीय विद्यालया’ची स्थापना होऊन तेथे त्यांनी एक वर्ष शिक्षक व एक वर्ष प्राचार्य म्हणून काम केले. १९२३ मध्ये नागपुरच्या हिस्लॉप महाविद्यालयात प्रवेश घेऊन १९२४ साली नागपूर विद्यापीठाची बी.ए.ची पदवी त्यांनी  प्राप्त केली. त्यानंतर इ.स. १९२४ ते १९३१ या काळात नागपुरच्या सेंट ऊर्सुला मुलींच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. १९२६ मध्ये एलएल.बी.ची पदवी घेतली. आणि १९२७ मध्ये संस्कृत या विषयात एम.ए. ची पदवी घेतली तसेच १९३० मध्ये मराठी या विषयात एम.ए. ची पदवी त्यांनी प्राप्त केली.

      या नंतरचा काळ म्हणजे भैयाजींच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील कार्याच्या सुरुवातीचा काळ म्हणावा लागेल. ज.मा.कायंदे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी कल्चरल एज्युकेशन सोसायटी द्वारा टिळक पुतळ्याजवळच्या पंडितजींच्या वाड्यात दि. १७ जुलै १९३० मध्ये नागपूर महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्याचे पहिले प्राचार्य म्हणून पांढरीपांडे यांची नेमणूक झाली. त्या काळातही गांधीजींच्या प्रभावामुळे राष्ट्रीय चळवळीत त्यांचा भाग होता. त्यातच ते मध्य प्रदेशच्या ‘वॉर कौन्सिल’चे अध्यक्ष होते आणि त्यांनी सत्याग्रहाच्या चळवळीतही भाग घेतला म्हणून सरकारने त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. परंतु मार्च १९३१ मध्ये इतर अनेकांबरोबर त्यांचीही सुटका झाली. १५ जुलै १९३२ रोजी नागपूर महाविद्यालयाला ‘सिटी कॉलेज’ या नावाने सरकारी मान्यता प्राप्त झाली. तेव्हा अर्थातच त्याचे प्राचार्य भैयाजी पांढरीपांडेच झाले.

      संशोधन कार्याकडेही त्यांचे लक्ष होते. १४ जानेवारी १९३४ रोजी ‘मध्य प्रांत वाङ्मयेतिहास संशोंधन मंडळ’ स्थापन झाले. तेव्हापासून १९५२ पर्यंत ते सुरुवातीला या संस्थेचे कार्यवाह आणि नंतर १९३९ पासून या संस्थेचे अध्यक्षही होते. त्यांच्याच पुढाकाराने या संस्थेतर्फे ‘द. सी. पी. अ‍ॅण्ड बेरार’ नावाचे त्रैमासिक सुरू करण्यात आले आणि इ.स. १९३६ ते १९४२ या काळात ते त्याचे संपादक होते.

      महात्मा गांधींच्या विचारपरंपरेतील भैयाजींना मागासवर्गीय आणि दलितांविषयी आपुलकी आणि जिव्हाळा होता. त्याच प्रेरणेतून १९३४ मध्ये त्यांनी दलितवर्गीय मुलींसाठी डीप्रेस्ड क्लास गर्ल्स होस्टेल या संस्थेची स्थापना करून ते तिथे अध्यक्ष झाले. ६ डिसेंबर १९३६ रोजी ‘सहभोजन समिती’चे उपाध्यक्ष या नात्याने अस्पृश्य सहभोजनात पुढाकार आणि सहभाग  घेतला म्हणून  काही वर्षे त्यांना बहिष्कृत करण्यात आले. या त्यांच्या कार्यामुळेच शासनाने त्यांना दलित - मित्र म्हणून गौरविले.

     तत्कालीन शिक्षण व्यवस्थेला नवीन वळण देण्यासाठी संघटनात्मक स्तराला जे प्रयत्न करण्यात आले त्यात पांढरीपांडे यांचा सक्रीय सहभाग होता. डिसेंबर १९३६ मध्ये ‘अखिल भारतीय शिक्षण परिषदे’चे अधिवेशन झाले. त्याचे ते कार्यवाह होते. तसेच १९३७ मध्ये अखिल भारतीय शिक्षण समिती संघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. १९४० मध्ये अखिल भारतीय शिक्षण परिषद उदयपूर येथे झाली. तिच्या ‘नैतिक व धार्मिक’ विभागाचे ते अध्यक्ष होते. यांना तत्त्वज्ञानाचाही व्यासंग होता. १९४१ मध्ये अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषद नागपूरचे ते सहकार्यवाह होते. आणि १९५५ मध्ये पुन्हा याच संस्थेचे कोषाध्यक्ष झालेत. १९५४ मध्ये पाटणा येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या ‘विद्यापीठ शिक्षण’ विभागाचे ते अध्यक्ष होते.

     सिटी कॉलेजला १९४५ मध्ये आईन्दानजी बिंझाणी यांनी देणगी दिल्यामुळे त्याचे नामकरण बिंझाणी सिटी कॉलेज असे झाले. त्यात विज्ञान शाखा सुरू करावी म्हणून भैयाजींनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येवून मथुरादासजी मोहता यांनी देणगी दिली आणि १८ जुलै १९४९ रोजी ‘मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय’ सुरु झाले. मात्र सुरुवातीला ती एस.बी.सिटी महाविद्यालयाची शाखा होती आणि भैयाजीच तिथे प्राचार्य होते. सप्टेंबर १९६० मध्ये ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले. जुलै १९६० ला श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालय सुरू झाले. त्याचेही पहिले प्राचार्य पांढरीपांडे होते. १० नोव्हेंबर १९६१ ला ते सेवानिवृत्त झाले.

     नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठ कोर्ट (आताचे सिनेट) व अ‍ॅकॅडमिक कौन्सिल यांचे ते पदसिद्ध सदस्य होते. विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सहा वर्षे ते सदस्य होते. मराठी विषयाच्या अभ्यासमंडळाचे सदस्य व विषय तपासणी समितीचे सदस्य अध्यक्ष होते. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात नागपूर विद्यापीठाच्या ४६ समित्यांचे सदस्य/अध्यक्ष होते. राष्ट्रीय स्तराच्या ८ शैक्षणिक समित्यांवर सदस्य होते. महाराष्ट्र राज्याने नेमलेल्या मिडियम इन्स्ट्रक्शन कमिटीचेे सदस्य म्हणून काम करताना त्यांनी एकट्यानेच प्रादेशिक भाषेच्या माध्यमाची बाजू प्रभावीपणे मांडली. जुन्या मध्यप्रदेशात फेडरेशन ऑफ रेक्झनाईझड् एज्युकेशनल इन्स्टिटयूशन्स एम. पी. ही संस्था त्यांच्या पुढाकाराने १९३४ मध्ये स्थापन झाली. आणि १९३९ पर्यंत ते तिचे कार्यवाह व अध्यक्ष होते. नागपूर, उस्मानिया व चेन्नई विद्यापीठांचे ते मराठी विषयाचे परीक्षक होते व नागपूर विद्यापीठाकडे पीएच.डी. साठी येणाऱ्या प्रबंधांचेही परीक्षक होते.

      त्या काळी मध्य प्रांत - वऱ्हाडात नागपूर, अमरावती व जबलपूर येथेच काय ती महाविद्यालये होती आणि तीही सरकारी होती. नागपूरला ख्रिस्ती मिशनने चालविलेले हिस्लॉप महाविद्यालय होते. या महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि प्राचार्य इंग्रजी धर्तीचा पोषाख करून सिव्हिल लाईन्स भागात बंगल्यात राहणारे होते.

      नागपूर महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून भैयाजी पांढरीपांडे यांनी कार्यभार सांभाळला. तेव्हा खादीचे धोतर, सदरा, टोपी, उपरणे घालणारा आणि साध्या चपला घालून वावरणारा पहिला गांधीवादी प्राचार्य  केवळ नागपुरातच नव्हे, तर संपूर्ण मध्य प्रांत वऱ्हाडाच्या लोकांना दिसला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे ते प्रतीकच होते. उच्च शिक्षणासाठी प्रवेशाला होणाऱ्य गर्दीवर लोक टीका करीत पण भैयाजी त्यास स्वागतार्ह  मानीत असत. 

      सुमारे ४० वर्षांच्या अध्यापनाच्या काळात पांढरीपांडे यांच्या दृष्टिने विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा मध्यबिंदू होता. त्याच्या हिताच्या-अहिताच्या, सोयी - गैरसोयीच्या, प्रगती व उत्कर्षाच्या विचाराला सर्व शैक्षणिक विचारात प्रमुख स्थान द्यावयास हवे असे ते म्हणत.

      गांधीजींच्या अनेक तत्त्वांना त्यांनी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आणि न्यायमूर्ती मंगळमूर्ती ह्यांनी श्रमदान करून ‘मालवीय कुटी’ बांधली. तसेच हस्तव्यवसायातून कागद निर्माण करण्यासाठी त्यांनी सेवानिवृत्तीच्या काळापर्यंत पेपरविभागाचे काम पाहिले आणि त्यानंतरही त्या कार्यात लक्ष घातले. मुलांसाठी ‘हॉबी सेंटर’ निर्माण करून व्यवसाय - शिक्षणाचीही सुरुवात केली. साधन - शुचिता कटाक्षाने सांभाळणारे भैयाजी स्वतः मात्र सामान्य परिस्थितीत जीवन जगले. या त्यांच्या जीवन प्रणालीत आणि कार्यात त्यांच्या पत्नी रमाबाई यांचीही त्यांना सतत उत्तम साथ लाभली. विविध क्षेत्रातील भैयाजींच्या या उपक्रमासोबतच जनसामान्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी त्यांनी होमिओपॅथीचे वैद्यकीय शिक्षण घेऊन दाखला मिळविला. हा औषधोपचार ते विनामूल्य करीत व त्यासाठी स्वतः खर्च करीत. त्यासाठी  भाऊजी दफ्तरी यांनी स्थापना केलेल्या सच्चिकित्सा महाविद्यालयाच्या व्यवस्थापक मंडळाचे उपाध्यक्ष व प्रमुख सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले. सेवानिवृत्तीनंतर नागपूर जवळील वाठोडा या लहानशा गावी त्यांच्या कुटुंबाची शेती करण्यासाठी ते गेले आणि शेती बरोबरच त्यांनी स्वतःचे खेडेगाव एक वर्षाच्या आत एक आदर्श खेडे बनवले. ‘खेड्यात चला’ हे  गांधींचे तत्त्व त्यांना मान्य होते. परंतु खेडी कायम ठेवून सोव्हिएट रशियासारखी समाज रचना खेड्यात व्हायला हवी. श्रीमंती नसली तरी सर्वांना पुरेसे मिळाले पाहिजे असे ते म्हणत.

      त्यांनी अनेक शोधनिबंध आणि ग्रंथ लिहिले आणि ते प्रकाशितही झाले. ललित वाङ्मय, समीक्षात्मक लिखाण, तत्त्वज्ञान, ज्ञानेश्‍वरी व यथार्थ दीपिका, भगवद्गीता, श्री समर्थ रामदासांचे वाङ्मय, मराठी भाषा आणि देवनागरी लिपी इत्यादी विविध विषयांवर त्यांनी लिखाण केले. कर्मयोगावरील त्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी करण्यात आले.

      भैयाजींचे विद्यार्थी ईश्‍वर देशमुख यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन १९५५ मध्ये ‘नागरिक शिक्षण मंडळ’ ही संस्था स्थापन केली आणि पांढरीपांडे ह्यांना त्याचे अध्यक्ष केले. या संस्थेतर्फे दोन विद्यालये, एक शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि एक पंचायत राज्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. नंतर भैयाजी पांढरीपांडे यांचे नाव देऊन समाजकार्य महाविद्यालयही सुरू केले, संस्थेच्या परिसरात भैयाजींचा अर्धपुतळा उभारला.

- डॉ. एस. जी. देवगावकर

पांढरीपांडे, श्रीकृष्ण लक्ष्मण