Skip to main content
x

पारसनीस, दत्तात्रेय बळवंत

     त्तात्रेय बळवंत पारसनीस यांचा जन्म व मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सातारा येथे झाले. शाळेत असल्यापासूनच यांना लेखनवाचनाचा नाद होता व वादविवादसभेतही हे भाग घेत. शिक्षण सुटल्यानंतर यांचे लक्ष इतिहास संशोधनाकडे वेधले. १८८७साली यांनी सुरू केलेले महाराष्ट्र कोकीळमासिक बरेच लोकप्रिय होते. त्यातील लेखांवरून त्यांना ऐतिहासिक माहिती व अस्सल कागदपत्रे गोळा करण्याची आवड तेव्हापासून होती असे दिसते. त्यांना झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे दत्तक पुत्र दामोदरपंत यांचा सहवास लाभला. त्यांच्याकडून सरकारी व बिनसरकारी, देशी-परदेशी माहिती एकत्र करून त्यांनी आपल्या इतिहास संशोधन व लेखन या कार्यास सुरुवात केली. त्यांनी मराठीतून लिहिलेले लक्ष्मीबाईंचे चरित्र अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेव्हापासून त्यांनी अस्सल कागदपत्रे, वस्तू, चित्रे वगैरेंच्या संदर्भात संग्रह संपादन, लेखन, प्रसिद्धी, संकलन वगैरे अनेक दृष्टींनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली. १९०२साली ते कोल्हापूरकर छत्रपतींबरोबर इंग्लंडमध्ये जाऊन आले. तिकडील अनेक संग्रहालये व संस्था पाहिल्या. आपल्याजवळ जमलेला संग्रह रसिकांच्या उपयोगाला यावा या दृष्टीने चांगले ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय काढण्याची खटापट सुरू केली. २९ ऑगस्ट १९१४मध्ये असे संग्रहालय स्थापण्याचा मुंबई सरकारचा ठराव प्रसिद्ध झाला. पण इमारत बांधणे वगैरे काम पहिल्या महायुद्धामुळे तहकूब झाले. ३ नोव्हेंबर १९२५ रोजी मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते सातारा येथे मुद्दाम बांधलेल्या नव्या इमारतीत यांच्या कागदपत्रांच्या विभागाचे उद्घाटन झाले. या पारसनीस म्युझियममध्ये काही हजार मराठी, चार हजार इंग्रजी कागदपत्रे व तीन हजार इंग्रजी ग्रंथ होते. ते लवकरच वारले आणि तो संग्रह आता पुणे येथे डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ताब्यात देण्यात आला आहे.

    पेशवे दप्तरातील निवडक पत्रे अलीकडे ४५ भागात प्रसिद्ध झाली. त्यांपैकी पुष्कळ पत्रे आधीच त्यांनी तेथे नेऊन निवडून व नकलून ठेवली होती. त्या वेळी त्यांना ती प्रसिद्ध करणे शक्य झाले नाही. त्यांच्या इतिहासक्षेत्रातील कार्यास खरे व राजवाडे यांच्या पूर्वीच सुरुवात झाली. त्या क्षेत्रातील यांची कामगिरी बहुविध आणि प्रचंड स्वरूपाची आहे. त्या कामी त्यांचा डेक्कन व्ह.ट्रा. सोसायटीशी घनिष्ठ संबंध होता. संशोधन, संग्रह, प्रकाशन या कामी त्यांनी मुंबईचे पुरुषोत्तम विश्राम मावजीशेठ, राजेमहाराजे व मुंबई सरकार यांचेही साहाय्य मिळवले. यांची राहणी खानदानी, मूलगामी, काम करण्याची पद्धत सुबक व भाषाशैली चित्तवेधक नि मनोहारी असे. इतके प्रचंड काम करताना उपयुक्तता व व्यावहारिक दृष्टी त्यांनी कायम ठेवली. निष्कारण बडेजाव कधी मिरवला नाही. हाती घेतलेले काम संयम राखून तन्मयतेने पार पाडण्याचा त्यांचा गुण वाखाणण्याजोगा होता. त्यांचे वाङ्मय - मराठी - १. कीर्तिमंदिर १८९०, २. झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र १८९४, ३. मराठ्यांचे पराक्रम- बुंदेलखंड प्रकरण १८९५, ४. अयोध्येचे नवाब १८९९, ५. मुसलमानी आमदानीतील मराठे सरदार १९००, ६. महापुरुष ब्रह्मेन्द्रस्वामी धावडशीकर यांचे चरित्र व पत्रव्यवहार १९००, ७. बायजाबाई शिंदे यांचे चरित्र १९०२, ८. दिल्ली अथवा इन्द्रप्रस्थ १९०२, ९. मराठ्यांचे आरमार १९०४, १०. सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार १९०५, ११. स्वल्पमूल्यचरित्रमाला; (अ) परशुरामपंत प्रतिनिधी; (आ) नाभाजी; (इ) मुधोळ संस्थानचे घोरपडेचरित्रे १२. पं. अयोध्यानाथ १८९२, १३. वामन शिवराम आपटे, १४. ए. ओ. ह्यूम १८९३, कविता १५. वाक्पुष्पांजली १८८९, १६. भारतभाग्योदय. ऐतिहासिक कागदपत्रे- १७. महेश्वर दरबारची बातमीपत्रे भाग १-२, कारकिर्द-अहिल्याबाई होळकर १९१०, १९११, १८. पेशवे दप्तरातील निवडक उतारे, खंड १-२, शिवाय दिल्लीचे राजकारण वगैरे अनेक अस्सल पत्रव्यवहार त्यांनी इतिहाससंग्रहातून प्रसिद्ध केले. १९. बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी, भाग १-२, २०. कैफियत यादी (दक्षिणेतील सरदारांच्या) १९०८, २१. वतनपत्रे, निवाडपत्रे १९०९, २२. सनदापत्रे १९१३, २३. तह करारमदार १९१४, (हा सर्व पेशवे दप्तरातील भाग सरकारी नोकर रा. ब. गणेश चिमणाजी वाड यांच्या साहाय्याने निवडून मावजी वगैरेंच्या साहाय्याने त्यांनी प्रसिद्ध करवला.) ग्वाल्हेर दरबारपत्रे- २४. महादजी शिंदे यांचा अस्सल पत्रव्यवहार व राजकारण खंड १-५, (यांपैकी पहिल्या खंडावर १९१५ हे साल असून पाचव्या खंडावर प्रायव्हेट (खासगी) असे छापले आहे.

     मासिके - १. सुभाष्यचंद्रिका (हस्तलिखित १८८७), २. महाराष्ट्र कोकीळ (ऑक्टोबर १८८७-१८९२), ३. भारतवर्ष (सन १८९६पासून २४ अंक), ४. इतिहाससंग्रह (ऑगस्ट १९०८-ऑक्टोबर १९१६).

     इंग्रजी ग्रंथ - १. Notes on Satara, २. Mahabaleshwar, ३. Sangali State, ४. Panhala, ५. Poona in bygone days, ६. History of the Maharashtra (किंकेड व पारसनीस, दुसरा खंड १९२२)

- संपादित

पारसनीस, दत्तात्रेय बळवंत